वस्तीत राहणाऱ्या ओळखीच्या युवतीला आमिष दाखवून बलात्कार

अनिल कांबळे
Sunday, 8 November 2020

२२ तारखेला त्याने बाईकवरून लॉंग ड्राईव्हला जाण्यासाठी विचारले. तिने होकार दिला. परंतु, तासाभरात परत सोडण्याबाबत ठरले. त्याने पानठेला बंद केला आणि रात्री साडेआठ वाजता अंबाझरीत दुचाकी घेऊन आला.

नागपूर : वस्तीत राहणाऱ्या ओळखीच्या युवतीला गाडीवर बसून फिरून येण्याचे आमिष दाखवून युवकाने झाडाझुडपात नेत बलात्कार केला. याप्रकरणी युवतीच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल करून युवकाला अटक केली. रोशन अजय हावरे (वय २३, रा. पांढराबोढी, हिलटॉप) असे आरोपी युवकाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १८ वर्षीय युवती रिया (बदललेले नाव) ही अंबाझरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहते. ती बारावीची विद्यार्थिनी आहे. तिला वडील नसून आईसह राहते. तिची रोशन हावरे या पानठेला चालविणाऱ्या युवकाशी ओळख झाली. दोघांची मैत्री होती तसेच एकमेकांशी मोबाईलवर बोलणे सुरू होते. रोशन याने तिला अनेकदा बाहेर फिरण्यासाठी म्हटले. परंतु, ती वारंवार नकार देत होती.

अधिक वाचा - शेतातील पडक्या खोलीतून येत होती दुर्गंधी; मित्राच्या सांगण्यावरून जाऊन बघितले असता आढळला महिलेचा कुजलेला मृतदेह

२२ तारखेला त्याने बाईकवरून लॉंग ड्राईव्हला जाण्यासाठी विचारले. तिने होकार दिला. परंतु, तासाभरात परत सोडण्याबाबत ठरले. त्याने पानठेला बंद केला आणि रात्री साडेआठ वाजता अंबाझरीत दुचाकी घेऊन आला. त्याने सोबत दारू घेतली. रियाला त्याने बाईकवर बसवले आणि थेट जयताळ्यातील आर्बीटल अंपायरसमोरील मोकळ्या मैदानात नेले. त्यानंतर तिला झाडाझुडपात नेऊन बलात्कार केला.

रात्रभर त्याने तिच्यावर अत्याचार केला आणि सकाळच्या सुमारास घरासमोर सोडले आणि कुणालाही सांगितल्यास ठार मारण्याची धमकी दिली. अत्याचार झाल्यामुळे रिया नैराश्‍यात गेली. जेवण करीत नव्हती तर रूममध्ये एकटीच राहायला लागली.

जाणून घ्या - Success story : सोशल मीडियावर स्क्रोलिंग करताना सापडला उद्योगाचा मार्ग, आता महिन्याला कमावतोय लाखो रुपये

ही बाब आईच्या लक्षात आली. तिने आस्थेने विचारपूस केल्यानंतर पानठेलाचालक रोशनने बलात्कार केल्याचे रियाने सांगितले. तिने एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली.

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Atrocities on young girl by showing lure