esakal | Success story : सोशल मीडियावर स्क्रोलिंग करताना सापडला उद्योगाचा मार्ग, आता महिन्याला कमावतोय लाखो रुपये
sakal

बोलून बातमी शोधा

youth earns lakh rupees from camphor production in yavatmal

सुरू असलेला रोजगार गेल्याने अनेक तरुण गावाकडे परत आलेत. त्यात मयूरही पुणे येथून ब्रम्ही येथे गावी आला. महिना, दोन महिने झाल्यानंतरही लॉकडाउन उघडण्याची स्थिती दिसत नव्हती. घरी राहून काहीच काम नसल्याने मयूरला करमत नव्हते. काही तरी करायचे, असा विचार त्याच्या मनात सातत्याने येत होता. याकाळात समाजमाध्यमांवर सर्च करीत असताना एक उद्योग सुरू करण्याचा विचार त्यांच्या मनात आला.

Success story : सोशल मीडियावर स्क्रोलिंग करताना सापडला उद्योगाचा मार्ग, आता महिन्याला कमावतोय लाखो रुपये

sakal_logo
By
चेतन देशमुख

यवतमाळ : 'उद्योगाच्या घरी, रिद्धीसिद्धी पाणी भरी', अशी म्हण आहे. धडपड करणाऱ्या तरुणांना उद्योग नेहमीच आकर्षित करीत असला, तरी नोकरी सोडून त्यात उतरण्याचे धाडस फारच कमी जणांकडे असते. असेच धाडस दाखवत दारव्हा तालुक्‍यातील ब्रम्ही येथील दोन भावांनी काकांच्या मदतीने कापूर उत्पादननिर्मितीचा व्यवसाय उभा केला. विशेष म्हणजे सोशल मीडियावर सर्च करत असताना त्याला या उद्योगाचा मार्ग सापडला आहे.

हेही वाचा - दुकानदारांनो मास्कच्या किमतीचे फलक मराठीतच लावा, अन्यथा होणार कारवाई

ब्रम्ही येथील मयूर ज्ञानेश्‍वर गावंडे यांच्या कुटुंबीयांची पिढ्यांपिढ्या शेती करून उपजीविका करण्याची परंपरा. परंतु, मयुरने शिक्षणाचा वसा घेतला. प्राथमिक, माध्यमिक ते थेट बी.ई. मॅकेनिकल ही उच्चपदवी प्रथमश्रेणीत उत्तीर्ण केली. त्यानंतर पुणे येथील एका नामांकीत कंपनीत क्वॉलिटी इंजिनिअर या पदावर दोन वर्षे सेवा दिली. याठिकाणीही मयूरची मेहनत कामी आली. दोन वर्षांत मयूरने उत्कृष्ट शेरा मिळविला. फेब्रुवारीत कोरोनाची सुरुवात झाली. पुणे येथेही पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. त्यानंतर देशभरात रुग्णांची वाढती संख्या पाहता देशभरात लॉकडाउन करण्यात आले. त्यात अनेक कंपन्या बंद झाल्या. सुरू असलेला रोजगार गेल्याने अनेक तरुण गावाकडे परत आलेत. त्यात मयूरही पुणे येथून ब्रम्ही येथे गावी आला. महिना, दोन महिने झाल्यानंतरही लॉकडाउन उघडण्याची स्थिती दिसत नव्हती. घरी राहून काहीच काम नसल्याने मयूरला करमत नव्हते. काही तरी करायचे, असा विचार त्याच्या मनात सातत्याने येत होता. याकाळात समाजमाध्यमांवर सर्च करीत असताना एक उद्योग सुरू करण्याचा विचार त्यांच्या मनात आला. या उद्योगाबाबत घरी कुटुंबासोबत चर्चा करून व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. कुटुंबातील सर्वांनीच मयूरच्या निर्णयाला पाठिंबा दिला. 

हेही वाचा - धक्कादायक! अमरावतीत एकाच महिन्यात दगावली १७ बालके

बाजारपेठेतील गोठविलेल्या उत्पादनांची सध्याची मागणी, भविष्यातील संधी जाणून घेतल्या. व्यवसायातील बारकाव्यांसाठी जाणकारांसोबत चर्चा केली. त्यातून आत्मविश्वास वाढत गेला. विविध बॅंकांकडे जाऊनही वेळेवर कर्ज मिळत नसल्याने अडचणी आल्या. तेव्हा घरच्यांकडे असलेल्या रकमेतून प्रकल्पांच्या कामांना जून व जुलै 2020पासून सुरुवात केली. त्यानंतर 'माऊली प्रॉडक्‍ट्‌स' या नावाने उत्पादनाला सुरुवात केली.

कच्चा माल दुसऱ्या जिल्ह्यांतून आणून घरीच उत्पादन सुरू केले. त्यानंतर तयार केलेल्या मालाची मार्केटींग मयूर व प्रवीण यांनी स्वत:च केली. दुचाकीवर फिरून अनेकांशी त्यांनी संपर्क साधला. काही ठिकाणी सकारात्मक प्रतिसाद मिळाला, तर काही ठिकाणी नकारात्मक प्रतिक्रियाही आल्या. नकारात्मक गोष्टींना विसरून गावंडे बंधूंनी ध्येयाने पुढे वाटचाल सुरू ठेवली. सुरुवातीला तालुका, जिल्हा व आता बाहेरील जिल्ह्यांत दोन्ही भाऊ मार्केटींग करीत आहेत. त्यांच्या मेहनतीला चांगला प्रतिसाद मिळाला असून, सध्या यवतमाळ जिल्ह्यासह वाशिम जिल्ह्यातील कारंजा, नांदेड जिल्ह्यातील माहूर, किनवट, हदगावनंतर आता वर्धा जिल्ह्यात गावंडे बंधूंचा "माऊली' ब्रॅण्ड पोहोचला आहे. उच्चशिक्षित तरुणाने कसलीही लाज न बाळगता अत्यंत कुशलपणे व्यवसायात पाऊल टाकले आहे.

हेही वाचा - पर्यटकांची पेंचकडे धाव, नेमक्या कोणत्या प्रवेशद्वारावरील पर्यटकांना होतेय वाघाचे दर्शन?

चार महिन्यात १८ लाख उत्पन्न -
पुणे येथील नोकरी सोडल्यानंतर व्यवसाय सुरू करण्याचा मयूरचा विचार होता. आम्हाला त्याची कल्पना पटली. बाजारपेठेत काय विकले जाऊ शकते, याचा विचार करून कापूर तयार करण्याचा व्यवसाय सुरू केला. जवळ असलेल्या रक्कमेतून मशनरी व इतर साहित्यांची खरेदी केली. घरीच आम्ही उत्पादन सुरू केले. मार्केटींग स्वतः करीत आहोत. सुरुवातीला प्रतिसाद कमी होता. मात्र, आता बऱ्यापैकी व्यवसाय स्थिर होत आहे. तीन-चार महिन्यांत 18 लाख रुपयांपर्यंत उत्पन्न पोहोचले आहे.
- प्रवीण गावंडे, युवा उद्योजक, ब्रम्ही