सत्तर वर्षीय आजोबांनी घेतली पत्रकार पिरषद; भूखंड हडपल्याप्रकरणी गृहमंत्र्यांकडे केली तक्रार

राजेश चरपे
Thursday, 5 November 2020

कंपाऊंडचे काम सुरू असताना ११ सप्टेंबरला कलीम नावाचा एक व्यक्ती तेथे आला. त्यांनी शिवीगाळ करून काम रोखले. सिराजभाई चप्पलवालेने भेजा है असे सांगितले. त्यानंतर एका कारमधून काही लोक आले. त्यांनी टिनाचे कंपाऊंड पाडण्यास सुरुवात केली.

नागपूर : गृहमंत्र्यांनी एसआयटी जाहीर केल्यानंतरही माफियांचे भूखंड बळकावण्याचे प्रकार सुरूच असल्याचे दिसून येते. वाठोडा येथील ज्येष्ठ नागरिकाने काही गुंडांनी आपला भूखंड बळकावल्याची तक्रार वाठोडा पोलिस ठाण्यात केली. मात्र, त्याची दखल घेतली जात नसल्याचा आरोप पत्रकार परिषदेत केला.

गृहमंत्री अनिल देशमुख तसेच सहायक पोलिस आयुक्तांकडे याची सविस्तर तक्रार केली असल्याचे सांगून भूखंडधारक एकनाथ पाटील यांनी पोलिसही या व्यवहारात गुंतले असल्याचा आरोप केला. भूखंडधारक एकनाथ पाटील सत्तर वर्षांचे आहेत. त्यांनी वाठोडा परिसरातील साडेनऊ हजार चौरस फुटांचे एकूण पाच भूखंड घेतले होते.

सविस्तर वाचा - प्रवासादरम्यान नेहमी मळमळ आणि उल्टीचा त्रास होतो? घाबरू नका पुढील उपाय नक्की करून बघा

मुरलीधर निमजे यांच्याकडून हे भूखंड २००४ मध्ये विकत घेतल्याचे एकनाथ पाटील यांनी सांगितले. त्यापैकी एका भूखंडावर एका खोलीचे बांधकाम करण्यात आले आहे. तेथे गोदामात चार कामगार राहत होते. आपल्या भूखंडावर कोणी कब्जा करू नये म्हणून सप्टेंबर महिन्यात चारही बाजूने टिनाचे कंपाऊंड टाकण्यात येत होते. यापैकी काही भूखंडावर जोशी नावाच्या वक्तीने दावा केला आहे.

कंपाऊंडचे काम सुरू असताना ११ सप्टेंबरला कलीम नावाचा एक व्यक्ती तेथे आला. त्यांनी शिवीगाळ करून काम रोखले. सिराजभाई चप्पलवालेने भेजा है असे सांगितले. त्यानंतर एका कारमधून काही लोक आले. त्यांनी टिनाचे कंपाऊंड पाडण्यास सुरुवात केली. आपल्याला धमक्याही दिल्या. आपण शंभर नंबरवर फोन करून पोलिसांना कळविले. पोलिसांनी दिलीप जोशी, जोएल जोशी यांच्यासह आपणासह पोलिस ठाण्यात नेले.

अधिक वाचा - कर्जबाजारी झाल्यामुळे युवकाने केली आत्महत्या; मृत्यूपूर्वी मैत्रिणीला बोलावले होते भेटायला

दोघांनाही अधिकृत कागदपत्रे मागितली. त्यावेळी १२ सप्टेंबरला कागदपत्रे घेऊन तक्रार द्यायला येतो असे सांगितले. त्या दरम्यान जोशी यांनी भूखंडावरच्या आपल्या नावाच्या पाटीवर स्वतःचे नाव टाकले. येथील खोलीला असलेले कुलूप तोडून बळजबरीने कब्जा केल्याचे पाटील यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला भीम आर्मीचे जिल्हाध्यक्ष प्रफूल शेंडे आणि शहर अध्यक्ष मुकेश खडतकर उपस्थित होते.

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Attempt to grab senior citizen's land in Nagpur