'तडीपाराला अध्यक्ष करणाऱ्यांना यशोमती ठाकूर यांचा राजीनामा मागण्याचा काय अधिकार?'

atul londhe criticized bjp on yashomati thakur resignation issue in nagpur
atul londhe criticized bjp on yashomati thakur resignation issue in nagpur

नागपूर : सध्या भाजप राज्याच्या महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांच्या मागे लागलेला आहे. यशोमती ठाकूर यांना एका जुन्या प्रकरणात अमरावती जिल्हा न्यायालय शिक्षा काय सुनावली आणि हे कामी लागले. चिक्की घोटाळ्यापासून ते उंदरांनी कुरतडलेल्या मंत्रालयातील फाईल्सपर्यंतच्या सर्व प्रकरणांना क्लिन चिट देणारे आणि एका तडीपाराला आपला अध्यक्ष करणाऱ्यांना यशोमती ठाकूर यांचा राजीनामा मागण्याचा काय अधिकार, असा प्रश्‍न महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ता अतुल लोंढे यांनी केला आहे.

यशोमती ठाकूर या सामान्य लोकांमध्ये मिसळून काम करणाऱ्या महिला कार्यकर्त्या आहेत. त्यांचा राजीनामा मागण्याचा अधिकार या लोकांना नाही. त्यांनी चूक केली असेल तर ते न्यायालय ठरवेल. चळवळीतील कार्यकर्ता बनून महिलांचे विषय सोडविणाऱ्या महिलेच्या मागे प्रदेशाध्यक्षांसह संपूर्ण भाजप लागला आहे. त्यांची ही मानसिकता द्वेषाने पछाडलेली आहे. मुंबईचे फुफ्फूस असलेले आरे जंगल वाचविल्याबद्दल महाविकास आघाडी सरकारचे अभिनंदन करण्याऐवजी कांजुरमार्ग जमिनीचे प्रकरण काढून मेट्रोच्या कामाला अडथळा कसा निर्माण करता येईल, हा प्रयत्न भाजपकडून केला जात आहे, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.

महाराष्ट्रासाठी भाजपची भूमिका विकासविरोधी आहे. महाराष्ट्रात चांगलं काम होऊ नये, असे यांचे प्रयत्न आहेत. नशीबाने अन्याय केलेली एक महिला आपल्या मुलांचा सांभाळ करुन जनसेवा करते आहे, राज्यात चांगलं काम करते आहे. तिला प्रोत्साहन देण्याऐवजी, निरुत्साही कसे करता येईल, असे प्रयत्न भाजप करत आहे. काल अमरावती जिल्ह्यातील तिवसा येथे जाऊन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी जे केले, ते त्यांची महिलाविरोधी मानसिकता दर्शविते. महिलांना दुय्यम दर्जा देणारी मानसिकता भाजपवाल्यांची असल्याचा आरोप लोंढे यांनी केला.

कायद्याच्या पुढे कुणीही नाही. अर्णब गोस्वामीने गुन्हा केला आहे. त्याच्यामुळे दोन निष्पाप जीव गेले आहेत. त्याच्या पाठीशी पत्रकार उभे राहत नाही. पण भाजपचे कार्यकर्ते उभे राहतात. याचा अर्थ गोस्वामींची संपूर्ण पत्रकारिता इतर राजकीय पक्षांना बदनाम करून भाजपच्या पाठीशी कसे उभे राहता येईल, यासाठी खर्ची घातली आहे. भाजपच्या नेत्यांना न्यायालयावर विश्‍वास नाही का? न्यायालयामध्येही लाईव्ह करण्याचा प्रयत्न केला जातो आणि न्यायालयाला समन्स द्यावा लागतो, अशा प्रवृत्ती लोकशाहीला घातक असतात. त्यामुळे गुन्हेगाराला वाचविण्याचा कुणी प्रयत्न करीत असेल, तर तो सुद्धा गुन्हेगारच आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला झाल्याचे जे गळे काढून ओरडत आहेत, त्याला काही अर्थ नाही. कारण गुन्हा करायचा आणि अशी ओरड करायची, हे अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या कक्षेत येत नाही. अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे गुन्हा करण्याची परवानगी द्यावी, असे भाजपचे म्हणणे आहे का आणि अर्णबकडे एवढी मग्रुरी आली कुठून, असा प्रश्‍न अतुल लोंढे यांनी केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com