Video : चक्‍क वाहतूक पोलिसांनीच नेमले वसुलीभाई, वाचा काय आहे प्रकार...

Auto driver was inspecting the vehicles
Auto driver was inspecting the vehicles

खापरखेडा (जि. नागपूर) : पोलिस म्हटले की वसुली आलीच. त्यातही वाहतूक पोलिस वसुलीत अग्रेसर असतात. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांचा जरब असणे गरजेचे असून, नियमबाह्य वाहतूक करणाऱ्यांकडून दंडवसुली करणे गरजेचे आहे. तरीही वसुलीसाठी काहीपण असे धोरण पोलिसांकडून अवलंबले जात असल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला. त्यामुळे महामार्गाने जाताना तुम्हाला वाहतूक पोलिसांनी अडवले तर एक नागरिक या नात्याने तुम्हीही पोलिसांची संपूर्ण शहानिशा करणे गरजेचे आहे.

त्याचे झाले असे की, 13 जुलै 2020, सोमवार रोजी सकाळी साडेअकरा वाजताच्या सुमारास टी पॉइंट जुना गोधनी नाका चौक, नागपूर रोड येथे वाहतूक पोलिस कर्मचारी वाहनांच्या तपासणीसाठी उभे होते. त्यांच्यासोबत खाकी पॅन्ट व काळे बूट घातलेले दोन व्यक्तीसुद्धा उभे राहून व्हिसल व हाताचा इशारा करून नागपूरकडे जाणारी वाहने थांबवत होते. तसेच वाहतूक कर्मचारी त्यांचे चालान करीत होते. परंतु, त्या दोन्ही व्यक्‍तींनी अंगावर पांढऱ्याऐवजी काळा शर्ट घातला होता.

माहिती अधिकार कार्यकर्ते महासंघाचे राज्य कार्याध्यक्ष शेखर कोलते नागपूरला जात असताना हा बेकायदेशीर प्रकार असल्याचे त्यांच्या लक्षात आले. विशेष म्हणजे त्यांनी विचारपूस करण्यापूर्वी संपूर्ण संभाषणाचे व्हिडिओ शूटिंगही करून घेतले. त्यानंतर तेथे उपस्थित वाहतूक पोलिस कर्मचाऱ्यांना या प्रकरणाबाबत सविस्तर विचारपूस करून त्या दोघांची नावे व त्यांचे पद याबाबत माहिती घेतली. तर त्यांनी सांगितले की, कोरोनामुळे मनुष्यबळ कमी असल्याने त्या दोन व्यक्तींना आम्ही सहकार्यासाठी सोबत घेतले आहे. ते दोघेही पोलिस नाहीत, यावर कोलते यांनी हे बेकायदेशीर असल्याचे सांगून त्या दोन्ही व्यक्तींना बोलावून त्यांची विचारपूस करण्याचा प्रयत्न केला.

त्यावेळी वाहतूक पोलिस कर्मचाऱ्यांपैकी एकाने त्यांना निघून जाण्याचा इशारा केला व ते दोघेही दोन्ही दिशेने झपाट्याने पळू लागले. हा सर्व प्रकार कोलते यांनी व्हिडिओ शूटिंगमध्ये कैद केला. त्यातील एकाचा पाठलाग करून व्हिडिओ शूटिंगवर विचारपूस केल्यावर त्याने आपण पोलिस कर्मचारी नसून ऑटोचालक असल्याचे सांगितले. पोलिसांसारखा खाकी पॅंट व बुटांबाबत विचारले असता त्यांनी उडवाउडवीचे उत्तर दिले. याविषयी कोलते यांनी डीसीपी ट्रॅफिक, तसेच पोलिस आयुक्‍त भूषणकुमार उपाध्याय यांच्या व्हॉट्‌स ऍपवर संपूर्ण व्हिडिओसह तक्रार दाखल केली. कोलते यांनी कारवाईबाबत विचारले असता, वाहतूक पोलिस विभागाच्या उपायुक्तांनी या प्रकाराविषयी चौकशी करून सांगतो, असे उत्तर दिल्याचे प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना कोलते यांनी सांगितले.

तक्रार करताच चेकिंग बंद

याबाबत कोलते यांनी वाहतूक पोलिस विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना व पोलिस आयुक्त भूषणकुमार उपाध्याय यांच्याकडे व्हिडिओसह तक्रार केल्यावर व वाहतूक पोलिस उपायुक्त साळी यांच्याकडे मोबाईलवर तक्रार केल्यावर लगेच एका तासात गोधनी बोखारा टी पॉइंटवर सुरू असलेली वाहनांची चेकिंग त्वरित बंद करण्यात आली. मागील वर्षी याच ठिकाणी घडलेली अशीच घटना खूप चर्चेत होती. त्यामुळे संबंधितांवर कारवाई होऊन वाहन तपासणी त्वरित बंद करण्यात आली. पुढील तीन ते चार महिन्यांपर्यंत चेकिंग बंद ठेवण्यात आली होती, अशी चर्चा होती.

चौकशी करून सांगतो

घडलेल्या प्रकाराची माहिती देऊन वाहतूक पोलिस विभागाच्या उपायुक्‍तांना प्रकाराविषयी विचारले असता चौकशी करून सांगतो, असे उत्तर त्यांनी दिले.
शेखर कोलते, माहिती अधिकार कार्यकर्ते

संपादन : अतुल मांगे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com