काहीही हं... प्रेमापोटी महिला पोलिसाने प्रियकरालाही केले क्‍वारंटाईन

Quarantine with female police officer boyfriend
Quarantine with female police officer boyfriend

नागपूर : महिला पोलिस कर्मचारी रूपाली (बदललेले नाव) ही नागपूर शहर पोलिस दलातील एका "विशेष' असलेल्या शाखेत कार्यरत आहे. तिच्या कार्यालयातील वरिष्ठांना कोरोना झाल्यामुळे अन्य कर्मचाऱ्यांनाही क्‍वारंटाईन करण्याचे आदेश होते. त्यामुळे पोलिस कर्मचारी रूपाली आणि तिच्या संपर्कात आलेल्यांना क्‍वारंटाईन करण्याची प्रक्रिया सुरू झाली. रूपालीच्या संपर्कात तिचा प्रियकरही आला. दुरावा सहन होत नसल्याने तिने चक्‍क प्रियकरालाही क्‍वारंटाईन करून घेतले. यासाठी तिने जी शक्‍कल लढवली ती पुढीलप्रमाणे... 

पोलिस ठाण्यात असलेल्या तक्रार अर्जानुसार, रूपाली ही तिचा प्रियकर अभिजित (बदललेले नाव) याच्या संपर्कात आली होती. कोरोनाच्या भीतीमुळे रूपालीला क्‍वारंटाईन करण्यात येणार होते. आपल्याला क्‍वारंटाईन केल्यास अभिजितला भेटता येणार नाही, याची चिंता तिला होती. त्यामुळे तिने अभिजितला कोरोनाची भीती असल्याचे सांगून सोबतच क्‍वारंटाईन होण्याचा सल्ला दिला. यानंतर रूपाली आणि अभिजित हे दोघेही पोलिस प्रशिक्षण केंद्रात क्‍वारंटाईन झाले.

तीन दिवसांपासून पती घरी येत नसल्यामुळे चिंतेत असलेल्या अभिजितची पत्नी उर्मिला यांना काळजी वाटली. तिने आपल्या पतीच्या नेहमी संपर्कात असलेली रूपालीचा पत्ता काढला. ती पोलिस प्रशिक्षण केंद्रात असून, तिच्यासोबत आपला पती असल्याची माहिती मिळाली. यानंतर तिने पोलिस प्रशिक्षण केंद्रात धाव घेतली. तेथील अधिकाऱ्यांना सत्यस्थिती कथन केली. मात्र, अधिकाऱ्यांनी कोणतेही सहकार्य केले नाही. त्यामुळे तिने थेट बजाजनगर पोलिस ठाण्यात तक्रार करण्याचा निर्णय घेतला. तिने पोलिसात लेखी तक्रार केल्यानंतर पोलिस आयुक्‍त डॉ. उपाध्याय यांचीही भेट घेतल्याचे कळते. 

पत्नीमुळे उघडकीस आला प्रकार

नागपूर पोलिस दलातील महिला पोलिस कर्मचाऱ्याच्या प्रेमप्रकरणाची शहरात चांगलीच चर्चा रंगत आहे. महिला पोलिस कर्मचाऱ्याच्या सहवासात आलेल्या प्रियकराला चक्‍क पोलिस प्रशिक्षण केंद्रात क्‍वारंटाईन करून घेतले. प्रियकराला क्‍वारंटाईन करण्यासाठी तिने अभिजित आपला पती असल्याचे वरिष्ठांना सांगितले. अभिजितच्या पत्नीला याची माहिती मिळताच हा प्रकार पुढे आला.

असे झाले प्रेमप्रकरण सुरू

महिला पोलिस रूपाली ही शहराच्या मध्यभागी असलेल्या शाखेत कार्यरत आहेत. अभिजित हा केंद्र सरकारच्या एका विभागात कार्यरत आहे. ऑक्‍टोबर 2019 मध्ये पोलिस नियंत्रण कक्षात केंद्र सरकारच्या योजनेअंतर्गत एक शिबिर आयोजित करण्यात आले होते. त्या शिबिरात रूपाली आणि अभिजितची ओळख झाली होती. तेव्हापासून या दोघांचे प्रेमप्रकरण सुरू झाले. 

प्रियकराला सांगितले पती

रूपालीने पोलिस प्रशिक्षण केंद्रातील क्‍वारंटाईन केंद्रात अभिजित हा प्रियकर नसून पती असल्याची नोंद रजिस्टरवर केली आहे. त्यामुळे पोलिसांनी तिच्यासोबतच अभिजितचीही केंद्रात राहण्याची व्यवस्था केली. अभिजित विवाहित असल्याचे माहित असतानाही रूपालीने कार्यालयाला पती म्हणून नोंद केल्यामुळे तिच्या अडचणीत वाढ होण्याची शक्‍यता आहे.

अहवाल चार दिवसांत सादर करण्याचे निर्देश

एका महिला पोलिस कर्मचाऱ्याने प्रियकराला पती असल्याचे दाखवून पोलिस प्रशिक्षण केंद्रात क्‍वारंटाईन केल्याच्या प्रकरणाची पोलिस आयुक्‍त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी गांभीर्याने दखल घेतली आहे. त्यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश पोलिस उपायुक्‍त विवेक मासाळ यांना दिले आहे. या प्रकरणाचा चौकशी अहवाल चार दिवसांत सादर करण्याचे निर्देश दिल्याची माहिती आहे. त्यामुळे आता प्रियकराला पीटीएसमध्ये दाखल करून घेणारे आणि महिला पोलिस कर्मचाऱ्याच्या अडचणीत वाढ होणार आहे. 

संपादन - नीलेश डाखोरे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com