बाबासाहेबांनी मूकनायकच्या माध्यमातून मुक्‍या समाजाचा "आवाज' बनून अस्पृश्‍य समाजाला नायकत्व केले बहाल

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 31 जानेवारी 2020

तो काळ अस्पृश्‍यांसाठी भयावह होता. कंबरेला झाडू आणि गळ्यात गाडगे लटकवावे लागायचे. रस्ता बाटू नये, रस्ता स्वच्छ करीत होता. थुंकीमुळे कोणी बाटू नये, यासाठी गाडग्यात थुंकत होता. असा हा "मुका' समाज. मात्र, हाच या देशाचा खरा मालक आहे, हे बाबासाहेबांनी हेरले. बाबासाहेबांच्या लेखणीतून 31 जानेवारी 1920 रोजी "मूकनायक'चा पहिला अंक प्रकाशित झाला. त्या काळच्या वृत्तपत्रांचे दोन मुख्य उद्देश दिसून येतात.

नागपूर  : भारतीय घटनेचे शिल्पकार, समाजशास्त्रज्ञ, कायदेपंडित, अर्थतज्ज्ञ म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जगात छाप आहे. नॉलेज ऑफ सिम्बॉल म्हणून बाबासाहेब सर्वज्ञात आहेत. परंतु, पत्रकार डॉ. आंबेडकर म्हणून जी दृष्टी बाबासाहेबांना होती, त्या दृष्टीची दखल वृत्तपत्र सृष्टीने घेतली नाही. बाबासाहेबांच्या पत्रकारितेला सामाजिक तसेच राष्ट्रीयत्वाची किनार होती. या देशातील तथाकथितांची नजर बाबासाहेबांच्या पत्रकारितेकडे वळलीच नाही. मराठी पत्रसृष्टीच्या पहिल्या टप्प्यातील संपादक म्हणून बाबासाहेबांचे योगदान अनमोल आहे. मुक्‍या समाजाचा "आवाज' बनून अस्पृश्‍य समाजाला नायकत्व बहाल करणाऱ्या "मूकनायक'पासून सुरू झालेली बाबासाहेबांची पत्रकारिता खऱ्या अर्थाने आंबेडकरी चळवळीचे भाष्यकार दिवंगत डॉ. गंगाधर पानतावणे यांनी "पत्रकार आंबेडकर'मधून जगासमोर मांडली. बाबासाहेबांचे "मूकनायक' हे त्या काळातील केवळ पाक्षिक किंवा वृत्तपत्र नसून, परिवर्तनासाठीचे शस्त्र होते, असे प्रभावी मत "पत्रकार आंबेडकर'मधून पुढे आले होते.

अवश्य वाचा - युवतीने केला ‘स्पीड चेक’ अन घडले हे

तो काळ अस्पृश्‍यांसाठी भयावह होता. कंबरेला झाडू आणि गळ्यात गाडगे लटकवावे लागायचे. रस्ता बाटू नये, रस्ता स्वच्छ करीत होता. थुंकीमुळे कोणी बाटू नये, यासाठी गाडग्यात थुंकत होता. असा हा "मुका' समाज. मात्र, हाच या देशाचा खरा मालक आहे, हे बाबासाहेबांनी हेरले. बाबासाहेबांच्या लेखणीतून 31 जानेवारी 1920 रोजी "मूकनायक'चा पहिला अंक प्रकाशित झाला. त्या काळच्या वृत्तपत्रांचे दोन मुख्य उद्देश दिसून येतात. पहिला म्हणजे स्वातंत्र्याच्या आंदोलनाला गती देणे आणि दुसरा म्हणजे समाजसुधारणा करणे. बाबासाहेबांची पत्रकारिता मात्र यापेक्षा वेगळी म्हणजेच संपूर्ण मानवमुक्तीचा धगधगता अंगार होती. वरपांगी समाजसुधारणा बाबासाहेबांना मान्य नव्हती. एका बाजूला राजकीय स्वातंत्र्यासाठी आकाशपाताळ एक करणारे नेते याच देशात माणसाला माणसासारखी वागणूक मिळावी, यासाठी तोंडातून शब्दसुद्धा काढायला तयार नव्हते. अशा परिस्थितीत दुसऱ्या बाजूला माणसाला माणुसकीचे निसर्गदत्त हक्क मिळवून देण्याचा, त्याला त्याच्या हक्कांची जाणीव करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न बाबासाहेबांच्या मूकनायकातून केला जात होता. व्यवस्थेने हजारो वर्षांपासून दाबलेल्या आवाजाचा पहिला हुंकार मूकनायकमधून मिळाला. बाबासाहेबांनी मूकनायकातून मानवमुक्तीची मशाल पेटविण्यास सुरुवात केली.

अस्पृश्‍यांना त्यांचे हक्क मिळावेत व समाजातील विषमता दूर करून सामाजिक समता प्रस्थापित व्हावी, हा त्यांच्या पत्रकारितेचा हेतू असला, तरी अस्पृश्‍यांना मानवी हक्क नाकारणाऱ्या परंपरेविरुद्ध बंड पुकारण्यासाठी पत्रकारिता सुरू केली होती. एखादी जात अवनत झाली तर तिच्या अवनतीचा डाग इतर जातीस बसल्याशिवाय राहणार नाही. समाज ही एक नौकाच आहे. ज्याप्रमाणे आगबोटीत बसून प्रवास करणाऱ्या उतारूने जाणूनबुजून इतरांचे नुकसान करावे म्हणून किंवा त्यांची त्रेधा कशी उडते ही गंमत पाहण्यासाठी म्हणा किंवा आपल्या विनाशक स्वभावामुळे म्हणा, जर का इतरांच्या खोलीस छिद्र पाडले, तर सर्व बोटीबरोबर त्यालाही आधी नाही तर मागाहून का होईना जलसमाधी घ्यावी लागणार आहे. यावरून बाबासाहेबांच्या मूकनायकातील व्यापक दृष्टीची कल्पना येते. बाबासाहेबांच्या पत्रकारितेचा प्रारंभ 1920 साली "मूकनायक' नियतकालिकापासून सुरू झाल्यानंतर बदलत्या काळाचा वेध घेत बहिष्कृत भारत (1927), जनता (1930) सुरू करून अस्पृश्‍य समाजाने प्रबुद्ध भारत (1956) निर्माण करावा, असा संकेत देणारी नियतकालिके सुरू केली. बाबासाहेबांच्या लेखणीचे पैलूही यातून स्पष्ट होतात. बाबासाहेबांची पत्रकारिता आक्रमक, संयमी होती.

आजच्या पत्रकारिता विश्‍वाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता अभ्यासण्याची नितांत आवश्‍यकता आहे. आजच्या काळाशी बाबासाहेबांचे "मूकनायक' प्रासंगिक आहे. ते कोट्यवधी जनतेचे नेते असूनही त्यांनी लेखनात व्यावसायिक तडजोड केली नाही. आजचा वर्तमान अस्वस्थ आहे. अशा वेळी चळवळीतील पत्रकार अर्थात अस्वस्थ नायकांनी बाबासाहेबांमधील पत्रकारितेची कास धरावी.
-सुनील सारिपुत्त, समता सैनिक दल, महाराष्ट्र

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Babasaheb became the "voice" of the main community through Muknayak and made the untouchable community a hero.