पाठ दुखतेय? असे करा उपाय

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 जून 2020

वर्क फॉर्म होम करताना कॉम्पुटर किंवा लॅपटॉप समोर तासनतास बसून काम करतात. मात्र बसण्याच्या चुकीच्या पद्धतीमुळे कंबर, पाठ आणि मानेच्या समस्या उद्भवत आहे. त्यामुळे एकाच ठिकाणी तासनतास बसून काम न करता 50 ते 60 मिनिटानंतर उठून शरीराची हालचाल करणे आवश्‍यक आहे.

नागपूर : अलिकडे कामाचा प्रत्येकावरच ताण असतो. बहुतेकांची कामे संगणकावर चालतात. परिणामी पाठदुखी ही जवळपास सगळ्यांच्याच पाठी लागली आहे. हे व्यावसायिक दुखणे आहे. नोकरी आणि व्यवसय सोडता येत नाही, मात्र योग्य व्यायाम, आहार आणि विहाराने आपण या दुखण्यावर मात करू शकतो. ती कशी करायची हे जाणून घेऊया.

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने देशव्यापी लॉकडाउन सुरु आहे. या दरम्यान काही लोक वर्क फॉर्म होम करताना कॉम्पुटर किंवा लॅपटॉप समोर तासनतास बसून काम करतात. मात्र बसण्याच्या चुकीच्या पद्धतीमुळे कंबर, पाठ आणि मानेच्या समस्या उद्भवत आहे. त्यामुळे एकाच ठिकाणी तासनतास बसून काम न करता 50 ते 60 मिनिटानंतर उठून शरीराची हालचाल करणे आवश्‍यक आहे.

घरून काम करत असताना तासनतास एकाच ठिकाणी आणि एकाच अवस्थेत बसावे लागते हे आरोग्याच्या दृष्टीने हानिकारक आहे. यामुळे मोठ्या प्रमाणावर पाठ, मान आणि कंबरेच्या समस्या उद्भवतात. त्यामुळे वर्क फॉर्म होम करताना थोड्या-थोड्या वेळाने हालचाल करीत राहिले पाहिजे. घरामध्ये एखादा फेरफटका मारायला हवा. थोड्या-थोड्या वेळात शरीराची हालचाल केल्यास ते फायदेशीर ठरते. तसेच काम करताना वाकून काम करू नका. यामुळे पाठ किंवा मान दुखीची समस्या उद्भवू शकते. तसेच अनेक तास वाकून काम केले तर खांदे दुखी किंवा छातीत दुखण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. त्यामुळे वाकण्यापेक्षा वापरत असलेले उपकरण उंचावर घेवून काम केल्यास आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.

हालचाल करीत रहा
दीर्घकाळ एकाच ठिकाणी बसून काम करताना पायाची आणि पाठीशी काळजी घेणे अत्यंत गरजेच आहे. त्यासाठी थोड्या-थोड्या वेळाने जागेवरून उठून हालचाल करीत राहा. जेणेकरून हात, पाय, कंबर, पाठ मानेच्या स्नायूंवर ताण असल्यास तो हलका होण्यास मदत होईल. वेळोवेळी हालचाल करीत रहा. नियमित व्यायाम करा. काम करीत असताना दर 20 ते 30 मिनिटांनी शरीराची हालचाल करा.

महिलांमध्ये पाठीच्या सर्वाधिक तक्रारी
पाठीच्या तक्रारींमध्ये 60 टक्के प्रमाण हे महिलांचे आहे. खूप कमी वयात गरोदर राहिलेल्या महिलेला याचा भविष्यात अधिक त्रास होतो. घरातील व ऑफिसमधील काम करताना त्यांना समस्या अधिक जाणवतात. यासाठी महिलांनी सकाळी व्यायाम करणे गरजेचे आहे.

सविस्तर वाचा - ठकबाज प्रीती दास जेलमध्ये क्‍वारंटाईन

पाठीदुखी वर उपाय काय?

  • चांगला सकस आहार घ्या.
  • रोज न विसरता दूध प्या.
  • जेवणात पालेभाज्यांचे जास्त सेवन करा.
  • "डी' जीवनसत्वाची कमतरता भासू लागल्यास डॉक्‍टरांच्या सल्ल्यानुसार काही सप्लीमेंट्‌स घ्यावीत.
  • दररोज 15 ते 20 मिनिटे व्यायाम करणे गरजेचे.
  • वारंवार पाठ, कंबर दुखत असेल तर तात्पुरती पेन किलर न घेता ऑर्थोपेडिक डॉक्‍टरांचा सल्ला घ्यावा.
  • तासनतास बसून काम करीत असाल तर 5 ते 10 मिनिटे चाला.

महिलांना का होतो पाठदुखीचा त्रास?
मूल झाल्यावर किंवा गरोदरपणात सर्वात जास्त ताण हा पाठीवर येतो. पाठीच्या मणक्‍यात बरेचदा चमक किंवा अचानकच पाठीत जोरात दुखू लागते. सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे, अतिरिक्त कामाचा ताण, प्रत्येक गोष्टीत धावपळ आणि अपुरे कॅल्शिअम. त्यामुळे पाठीची हाडे ठिसूळ होतात. ज्यामुळे उठायचा, वाकायचा त्रास होतो.

व्यायाम आवश्‍यक
एकाच जागी तासनतास बसल्याने पाठीचा, मानेचा त्रास होतो. घरून काम करतांना बसण्याची खुर्ची योग्य उंचीवर आणि बॅक सपोर्ट असलेली हवी. ऑफीसच्या ऑनलाइन मीटींगही मोबाईलवर न करता शक्‍यतोवर लॅपटॉप किंवा संगणकावर कराव्यात. याशिवाय एक तासाच्या गॅपनंतर फेरफटका मारावा, थोडावेळ मानेचे, डोळ्याचे व्यायाम करावेत. दररोज सकाळी सूर्यनमस्कार घातले पाहिजे यासोबतच दुध घेणेही फायदेशीर ठरेल.
- डॉ. मोहम्मद फैजल, अस्थिरोगतज्ज्ञ, नागपूर.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Back pain? these are the remedies