कोरोनामुळे बहुरूपी समाजावर उपासमारीची वेळ 

मनोहर घोळसे  
Saturday, 19 September 2020

व्यवसायासाठी ते बायको मुले व वृद्ध मंडळी सोडून गावोगावी भ्रमंती करतात. गाणे, पोवाडे, दोहे व इतर बहुरूपी सोंगाची नृत्यकला सादर करून लोकांचे मनोरंजन करतात. लोकही त्यांना मदत करतात. यावरच ते संसाराचा गाडा चालवितात.

सावनेर (नागपूर) : ऊन, वारा, पावसाची पर्वा न करता गावोगावी भ्रमंती करून किंगरीच्या तालावर गाणे, पोवाडे, दोहे आदी नृत्यकलेने तर कधी सोंग घेऊन लोकांचे मनोरंजन करणाऱ्या बहुरूपी समाजावर कोरोनामुळे उपासमारीची वेळ आली आहे. 

सावनेर तालुक्यातील नंदाजी बावा हेटी सुरला गावातील झुडपी जंगलाच्या जागेवर नाथपंथीय डवरी गोसावी समाजाची वस्ती आहे. या ठिकाणी १९९६ पासून सुमारे ७० ते ८० कुटुंबे राहत आहेत. वेशांतर करून भिक्षा मागणे हा त्यांचा परंपरागत व्यवसाय आहे. व्यवसायासाठी ते बायको मुले व वृद्ध मंडळी सोडून गावोगावी भ्रमंती करतात. गाणे, पोवाडे, दोहे व इतर बहुरूपी सोंगाची नृत्यकला सादर करून लोकांचे मनोरंजन करतात. लोकही त्यांना मदत करतात. यावरच ते संसाराचा गाडा चालवितात. मात्र, आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउनपासून आमचा व्यवसाय ठप्प पडल्याने कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आल्याचे प्यारेलाल शिंदे, एकनाथ अय्यर, विजेंद्र जगताप, अर्जुन शिंदे, शिवाजी तांबे आदी मंडळी सांगतात. 

झुडपी जंगलाच्या वास्तव्यामुळे जागेचा प्रश्न मार्गी लागणे बाकी आहे. मात्र, क्षेत्राचे आमदार व राज्याचे पशुसंवर्धन मंत्री यांच्या सहकार्यामुळे त्यांना रेशन कार्ड, मतदानाचा अधिकार व मुलांना शिक्षणाच्या सोयीसुविधा उपलब्ध झाल्याचे सांगतात. 

हेही वाचा : माजी ऊर्जामंत्र्यांचा सरकारवर थेट आरोप! वाचा नेमके काय म्हणाले

मुले घेत आहेत शिक्षण 
हेटी सुरला येथील हा नाथपंथीय डवरी समाज मूळचा अहमदनगर जिल्ह्यातील. उपजीविकेसाठी भ्रमंती करीत असताना १९९६ ला हेटी सुरला गावात त्यांचा पाडाव होता. पुढे गावकऱ्यांच्या सहकार्यामुळे या गावातच स्थायिक झाले. नाथपंथीय समाज होळी व शिवरात्रीला एकत्र येतो. शिक्षणाचा गंध नसल्याने ते आपला परंपरागत व्यवसाय चालवतात. मात्र, मुलांच्या वाट्याला वणवण फिरणे येऊ नये, यासाठी त्यांना शिक्षण देत असल्याचे चित्र दिसू लागले आहे. 

संपादन : मेघराज मेश्राम


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bahuroopi unemployed due to corona