Video : साक्षात हनुमान अवतरले अन् वाचला हा चालिसा...

hanuman
hanuman

नागपूर : अचानक गदाधारी हनुमान अवतरतो आणि चक्क मराठीत बोलू लागतो. वाटले ना आश्‍चर्य! एवढ्यावरच तो थांबत नाही, तर घराबाहेर पडू नका. तोंडाला मास्क बांधा. वारंवार हात धुवा. एकमेकांपासून अंतर ठेवा, अशी कोरोनापासून बचावाची चालिसाच बखान करू लागला. 

हे हनुमान आहेत प्रसिद्ध बहुरूपी कलावंत राजेश औंधकर. त्यांनीच हनुमानाचे सोंग घेतले. जनजागृतीसाठी प्रयत्न करू लागले. राजेश हे अमरावती जिल्ह्यातील भातकुली तालुक्‍यातील वलगावहून दहा किमी अंतरावरील टाकरखेडाशंभू या गावचे. येथून जवळच आष्टी हे गाव आहे. या दोन्ही गावांमध्ये बहुरूपी समाजाचे साडेसहाशे लोक वास्तव्यास आहेत. विशेष म्हणजे, बहुतेकांचा पारंपरिक व्यवसाय बहुरूपी म्हणून देवीदेवतांचे सोंग घ्यायचे आणि लोकांचे मनोरंजन करायचे हाच आहे. त्या बदल्यात मिळेल ती बक्षिसी स्वीकारायची आणि त्यावर आपल्या कुटुंबाची गुजराण करायची. महाराष्ट्र तसेच गुजरात राज्यातील सूरत, बडोदा, राजकोट, गांधीग्राम आदी शहरांमध्ये जात कधी हनुमानाचे, कधी शंकराचे तर कधी रावणाचे रूप धारण करायचे. त्यांच्या शैलीत काही खास ठेवणीतले "डायलॉग' मारायचे. समोरच्याची नाडी ओळखून त्याला आवडेल असे डायलॉग मारले की अनेकदा "वन्स मोअर'ची फर्माईश होते. मग हातात नोट मिळाली की आशीर्वाद देत पुढे निघायचे.

बहुरूपी बांधवांची लोकजागृती 
पावसाळ्यातील काही महिने वगळले तर बाराही महिने यासाठी सतत भटकंती सुरू असते. परंतु, लॉकडाउनमुळे उपजीविकेची ही व्यावसायिक कलाकारी बंद झाली. राजेश औंधकर गावी परतले; परंतु अनेक कलाकार गुजरातमध्येच अडकले आहेत. राजेश औंधकर यांनी "सकाळ'जवळ त्यांच्या वस्त्यांची स्थिती मांडली. ते म्हणाले, ""घरात होते नव्हते ते सर्व संपत आले. सर्वांना रेशनचे धान्य मिळाले नाही. परंतु, सरकारही स्वतः संकटात आहे. या घडीला सरकारवर टीका करणे योग्य नाही. सरकारलाच पाठबळ देणे हे आपले काम आहे. हेच समजून मी हनुमानाच्या वेशात कोरोनाबाबत जागृती करण्याचा प्रयत्न करीत आहे.'' 

कोरोनाविषयी जनजागृतीमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी आम्हा बहुरूपी कलाकारांची मदत घ्यावी. आम्ही अत्यंत नाटकी अंदाजात जागृती करून लोकांच्या काळजाचा ठाव घेऊ शकतो. 
- राजेश औंधकर, प्रसिद्ध बहुरूपी कलावंत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com