गृहमंत्री अनिल देशमुखांच्या घरासमोर बारमालकाचा आत्महत्येचा प्रयत्न; पोलिसांमुळे वाचले प्राण 

अनिल कांबळे 
Sunday, 8 November 2020

सितीबर्डी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयूर जयस्वाल याचा छोटा ताजबागमध्ये एम्पायर नावाने बार आहे.

नागपूर ः घरमालकाशी झालेला घरभाड्याचा वाद आणि आर्थिक विवंचनेतून एका बारमालकाने गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरासमोर अंगावर रॉकेल घेऊन पेटवून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र, वेळीच पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळावर धाव घेत रॉकेलची कॅन हिसकावून घेत ताब्यात घेतल्यामुळे युवकाचा प्राण वाचल्याने मोठा अनर्थ टळला. सीताबर्डी पोलिसांनी या प्रकरणी बारमालक मयूर सुरेंद्र जयस्वाल (जुनी वस्ती, खामला) याच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला.

अधिक वाचा - शेतातील पडक्या खोलीतून येत होती दुर्गंधी; मित्राच्या सांगण्यावरून जाऊन बघितले असता आढळला महिलेचा कुजलेला मृतदेह

सितीबर्डी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयूर जयस्वाल याचा छोटा ताजबागमध्ये एम्पायर नावाने बार आहे. लॉकडाऊनपासून बार बंद आहे. त्यामुळे आर्थिक विवंचनेत सापडला. या दरम्यान त्याला पत्नी माहेरी राहायला गेली. तो गेल्या तीन महिन्‍यापासून खामल्यातील एका फ्लॅटमध्ये भाड्याने राहतो. भाड्यावरून घरमालकीनीशी त्याचा वाद झाला. ठरलेल्या भाड्यापेक्षा जास्त भाडे मागत असल्याचा आरोप मयूरने केला आहे. 

घरमालकीणीशी वाद झाल्याने दोघात कडाक्याचे भांडण झाले. वाद वाढल्याने दोघेही प्रतापनगर पोलिस ठाण्यात गेले. पोलिसांनी एकमेकांची तक्रार ऐकून घेतली आणि कारवाई केली. घरमालकीनने त्याच्या घराला स्वतःचे कुलूप लावले. तर मयूरने घरमालकीनवर घरातील लॅपटॉप, पासपोर्ट आणि महत्वाच्या वस्तू ताब्यात घेतल्याचा आरोप केला. 

क्लिक करा- आमदार होईल म्हटल्यावर लोकांनी टिंगलटवाळी केली अन् आता शिक्कामोर्तब होताच त्यांनाच आलं भरून 

या सर्व प्रकारातून मयूर नैराश्‍यात गेला. त्याने शनिवारी दुपारी दीड वाजताच्या सुमारास जीपीओ चौकातील गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घराच्या काही अंतरावर अंगावर रॉकेल घेतले. स्वतःला पेटवून घेत आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात असतानाच पोलिस कर्मचाऱ्यांना दिसला. पोलिसांनी लगेच धाव घेत मयूरला ताब्यात घेत त्याचे प्राण वाचवले. या प्रकरणी सिताबर्डी पोलिसांनी मयूर जयस्वालवर आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून ताब्यात घेतले.

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bar owner attempt to end his life front home ministers house