सावधान! उपचाराकरीता लांबच्या पल्ल्यावर जाताना वाचण्याची ‘गॅरंटी’ अजिबात नाय

kodamendhi-1
kodamendhi-1

कोदामेंढी (जि.नागपूर): धानला येथील आरोग्य केंद्र सुरु झाल्यास परिसरातील दहा-बारा गावातील रुग्णांना आरोग्याची सुविधा मिळेल, असे वाटले होते. मात्र दोन वर्षांपासून येथील आरोग्याची इमारत नुसतीच उभी आहे. त्याला कारण येथील वर्चस्वाचे राजकारण आड येत आहे. मात्र त्यात आमजनतेला हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहे. आरोग्याच्या सुविधा मिळत नसल्याने गावातील आणि परिसरातील रुग्ण, लोकांना तपासणी आणि औषधोपचार करण्यासाठी लांब पल्ल्याच्या अंतरावर जावे लागते. यात त्यांचा वेळ आणि पैसा तर खर्च होतोच, त्यातच वेळीच उपचार न मिळाल्याने बहुतेकांना मृत्यूला स्वीकारावे लागले आणि मृत्यू कधी ओढवेल, याचा नेम नाही.

 नागरिकांना या सुविधेपासून मुकावे लागते
बांधकाम विभागाने  इमारत आरोग्य विभागाकडे हस्तांतरित केली नाही. तसेच फर्निचरची कमतरता आणि नेमलेल्या एजन्सीने पदभरती केली नसल्याने आरोग्यकेंद्र सुरु होण्याला विलंब होत आहे. जिल्ह्यातील धानला, भूगाव, भिष्णूर आणि  गोधनी येथील आरोग्य केंद्राची हीच वानवा असल्याचे पुढे आले आहे. नव्याने सुरु होणाऱ्या धानला आरोग्य केंद्राअंतर्गत धानला, गोवरी, आजनगाव व निमखेडा असे उपकेंद्र राहणार आहेत. शासनाच्या नवीन धोरणानुसार इमारतीचे बांधकाम जरी मोठे असले तरी तिथे प्राथमिक आरोग्य केंद्रात सुविधाच मिळणार आहेत. आकस्मिक विभाग, बाह्यरुग्ण तपासणी, ऑपरेशन थिएटर (कुटुंब नियोजन), रक्त तपासणी, रुग्ण भरती विभाग, लसीकरण, आरोग्य शिबीर, प्रसूती विभाग, रुग्णवाहिका, चोविस तास वैद्यकीय सुविधा आदींसह आरोग्य केंद्रात मिळणाऱ्या सर्व सुविधा उपलब्ध होणार आहेत. मात्र मागील दोन वर्षांपासून या भागातील रुग्णांना आणि नागरिकांना या सुविधेपासून मुकावे लागत आहे. दहा दिवसात येथील आरोग्य केंद्र सुरु न केल्यास जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या कक्षासमोर आंदोलन करण्याचे निर्देश किसान अधिकार मंचने दिले आहे. याबाबत सर्वसामाण्यांचे मत जाणून घेतले असता त्यांनी प्रामाणिक भावना व्यक्त केल्या.

फालतूचे राजकारण सुरु आहे !
 गावात आमदार, कृषी सभापती आहेत.  बांधकाम झाले तेव्हा अध्यक्ष देखील गावातीलच. राजकीय वादविवादामुळे काम रेंगाळत आहे. रुग्णांना उपचाराकरिता लांब न्यावे लागते. त्यामुळे अडचण निर्माण होत आहे. राजकीय वाद दूर सारून आरोग्य सुविधा सुरु केल्यास सर्वांच्या हिताचे होईल.अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे धानला येथील सुभाष (बंडूभाऊ) सारवे यांनी दिली. रुग्णांना आरोग्याच्या सुविधेकरिता मौदा, भंडारा अशा लांब पल्ल्याच्या ठिकाणी जावे लागते. यात वेळ आणि पैसे खर्ची होतो. तसेच वेळीच उपचार मिळत नसल्याने रुग्ण कधी दगावेल, याचा देखील नेम नाही. लवकर आरोग्य केंद्र सुरु केल्यास नजीकच्या गावातील लोकांना सोयीचे होईल. आजच्या घडीला आरोग्याची सुविधा खूपच गरजेची झाली आहे, असे शिवसेनेचे तालुका प्रमुख सदूकर हटवार यांनी मत व्यक्त केले.

दवाखाना लवकरच सुरु करण्याच्या तयारीत
पंधरा दिवसापूर्वी बांधकाम आणि आरोग्य विभागाचे अधिकारी घेऊन आलो होतो. तेथील दवाखान्यातील कचरा, काटेरी झाडेझुडपे साफसफाई करण्याचे सुरु केले. बांधकामातील काही त्रुट्या होत्या, त्या दुरुस्त करण्याचे आदेश बांधकाम विभागाला दिले. दवाखाना सुरु झाल्यानंतर रुग्णांना अडचण होऊ नये, म्हणून व्यवस्था करीत आहो. दवाखाना लवकरच सुरु करण्याच्या तयारीत आहो.
तापेश्वर वैद्य
कृषी सभापती जि. प. नागपूर

शासनाने आरोग्य केंद्र सुरु करावे
धानला येथील आरोग्य केंद्र लवकर सुरु होणे काळाची गरज आहे. परिसरातील रुग्णांना उपचाराकरिता मोठा त्रास सहन करावा लागत आहे. आरोग्य ही जीवनावश्यक बाब असून आरोग्याची सुविधा मिळत नसेल तर करोडोचा निधी व्यर्थच. लोकांची गरज लक्षात घेऊन शासनाने आरोग्य केंद्र सुरु करावे.
वंदना नरेश सिंगनजुडे
पं. स. सदस्य (धानला सर्कल)

सुविधा उपलब्ध न होणे दुर्दैवी बाब
परिसरातील नागरिकांना आरोग्य सुविधा मिळावी म्हणून शासनाचे करोडो रुपये खर्च करून इमारत बांधण्यात आली. परंतू दोन वर्षांपासून कसल्याही प्रकारची सुविधा उपलब्ध न होणे ही दुर्दैवी बाब आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींनी राजकारण बाजूला ठेवून लवकरात लवकर सुविधा उपलब्ध करून पिएचसी कशी सुरू करता येईल यासाठी प्रयत्न करावेत.
राजेंद्र लांडे
माजी संचालक कृ.ऊ.बा समिती रामटेक-मौदा

संपादकः विजयकुमार राऊत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com