ब्युटी पार्लर बंद आहेत? नो वरी! घरीच वाढवा सौंदर्य

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 11 जून 2020

ब्युटी पार्लरमध्ये गेल्याने कोरोनाचा प्रसार वाढू शकतो अशी शक्‍यता वर्तविल्याने, महिला ब्युटीपार्लरमध्ये जाणे टाळत असल्या तरी, घरच्याघरी सौंदर्य वृद्धीसाठी विविध प्रयोग केले जात आहेत.

नागपूर : महिलांचे सौदर्यं वाढविण्यासाठी काम करणाऱ्या अनेक ब्युटीशियनचा व्यवसाय कोरोनामुळे गेल्या दोन महिन्यापासून लॉकडाऊन झाला आहे. याकाळात महिलांनी घरीच आपल्यासाठी सौदर्यंटिप्स आणि घरगुती वस्तुंचा वापर करून त्वचेची काळजी घेण्यास सुरूवात केली. सोशल मीडियावर यासंदर्भातील व्हिडीओ एकमेकींना पाठवून आपले अनुभव शेअर करीत, घरच्या घरी सौदर्यं खुलविण्याची कला कोरोनाने महिलांना शिकवली आहे.
फेशियल, हेअरकट, आयब्रोज, थ्रेडिंग, व्हॅक्‍सिंग...अशा चेहरा, केस आणि त्वचेचे सौंदर्य वाढविणाऱ्या सेवा देणाऱ्या "ब्युटी पार्लर' व्यवसायाचे वर्तमान आणि भविष्य कोरोना संकटामुळे चांगलेच काळवंडले आहे. "लॉकडाउन' मुळे गेल्या दोन महिन्यांपासून शहरातील ब्युटी पार्लर व्यवसाय ठप्प आहे. त्यामुळे ब्युटी पार्लर चालविणाऱ्या किंवा घरोघरी जाऊन सौंदर्योपचार सेवा देणाऱ्या "ब्युटी पार्लर' व्यावसायिक चांगल्याच हवालदिल झाल्या असून, दुकानाचे भाडे, बॅंकांचे हप्ते कसे फेडायचे, उदरनिर्वाह कसा करायचा, असा सवाल करीत आहेत. ब्युटी पार्लरमध्ये गेल्याने कोरोनाचा प्रसार वाढू शकतो अशी शक्‍यता वर्तविल्याने, महिला ब्युटीपार्लरमध्ये जाणे टाळत असल्या तरी, घरच्याघरी सौंदर्य वृद्धीसाठी विविध प्रयोग केले जात आहेत.
काही उपयुक्त फेस पॅक

  •  दोन चमचे ज्वारीच्या पिठात एक चमचा मध, अर्धा चमचा दूध, अर्धा चमचा दही घालून लेप तयार करावा. यामुळे त्वचेतील रंगकणांचा गडदपणा कमी होतो.
  •  दोन चमचे मैदा, अर्धा चमचा हायड्रोजन पॅरॉक्‍साईड, एक चमचा आंबेहळद, दोन चमचे दूध, थोडी साय यांचे मिश्रण पॅक स्वरूपात लावल्यास तेलकटपणा कमी होऊन वर्ण उजळतो.
  • दोन चमचे ओटचे पीठ, एक चमचा मध, अर्धा चमचा दही, थोडी हळद एकत्र करून लावल्यास सैल त्वचा आवळली जाते.
  •  गव्हाचे पीठ चाळल्यानंतर उरणाऱ्या कोंड्यात दही अथवा दूध मिसळून लावल्यास चांगले परिणाम मिळतात. हा लेप स्क्रबरसारखे काम करतो.

घरीच वाढवा सौदर्यं
बनाना स्क्रब तयार करण्यासाठी दोन पिकलेली केळी कुस्करून घ्या. त्यात साखर घाला. यात चमचाभर मध घाला. हे मिश्रण चेहऱ्यावर लावा आणि धुवून टाका.
हातापायांसाठी लेमन स्क्रब तयार करू शकता. हे स्क्रब चेहऱ्याला लावू नका. हे स्क्रब तयार करण्यासाठी अर्ध लिंबू घ्या. हे लिंबू साखरेत बुडवा आणि हातापायांवरून फिरवा. पाच ते सात मिनिटांनी गरम पाण्याने धुवून टाका.
पपईचं स्क्रब तयार करण्यासाठी अर्धा कप पिकलेली पपई घ्या. पपई कुस्करून घ्या. त्यात थोडं दही घाला. लिंबाचा रस आणि मध घाला. चेहऱ्याला लावा. थोड्या वेळाने धुवून टाका.
हनी अँड ऑरेंज स्क्रब तयार करण्यासाठी संत्र्याच्या सुकलेल्या सालीची दोन टेबलस्पून पावडर आणि तितकेच ओट्‌स घ्या. यात मध घाला. जाडसर मिश्रण तयार करा. चेहऱ्यावर लावा. पाच मिनिटांनी धुवून टाका.
ओट्‌स आणि टोमॅटो स्क्रब तयार करण्यासाठी थोडे ओट्‌स घ्या. पिठीसाखर आणि पिकलेले टोमॅटो घ्या. टोमॅटोचे मोठे तुकडे करा. एका तुकड्यात ओट्‌स आणि साखर भरा. हा टोमॅटो चेहऱ्यावर घासा. पाच ते सात मिनिटांनी चेहरा धुवा.

सविस्तर वाचा - मुंढे साहेब, सातशे जणांना क्‍वारंटाईन करण्याची वेळ कोणामुळे आली आता माफी मागा...
स्वयंपाकघरातील ब्युटी पार्लर
ब्युटीशियनचा थेट चेहऱ्याशी संपर्क येतो त्यामुळे सोशल डिस्टंसिंगचा नियम पाळता येणार नाही. लॉकडाऊनच्या काळात आम्ही घरीच किचनमधील साहित्याच्या वापरापासून सौदर्यं टिप्सचा वापर केला. परिणामही चांगला झाला असून, संसर्गांचा धोकाही नाही आणि पार्लरचा खर्चही वाचतो आहे.
रंजना साबळे, गृहिणी

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Beauty parlours are clsed due to corona