
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फेसबुकवर वारंवार स्वस्तात अलिशान कार, बाईक आणि अन्य वस्तूंची जाहिरात दाखविण्यात येते. त्या वस्तूंच्या किंमती केवळ अगदी १० टक्के दाखविण्यात येते.
नागपूर ः फेसबूकवर असलेल्या ‘मार्केट प्लेस’वर अनेक चकाचक वाहनांचे फोटो टाकून अनेकांना कमी किंमतीत देण्याचे आमिष दाखविण्यात येते. जर ते वाहन खरेदी करण्याच्या विचारात असल्यास आजच सावध व्हा. अन्यथा सायबर क्रिमिनल्सच्या जाळ्यात अडकून गंडविल्या जाण्याची शक्यता आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फेसबुकवर वारंवार स्वस्तात अलिशान कार, बाईक आणि अन्य वस्तूंची जाहिरात दाखविण्यात येते. त्या वस्तूंच्या किंमती केवळ अगदी १० टक्के दाखविण्यात येते. स्वस्तात कार किंवा बाईक मिळत असल्यामुळे अनेक जण फेसबूकच्या मार्केट प्लेसवर अनेकदा वस्तू न्याहाळत राहतात. ७० हजार रूपयांची बाईक केवळ ५ ते ६ हजार रूपयांमध्ये तर चार ते पाच लाखांची कार केवळ ८० ते ९० हजार रूपयांत देण्याचे आमिष दाखविण्यात येते. एवढ्या स्वस्तःत गाडी भेटत असल्यामुळे अनेक जण आमिषाला बळी पडतात.
फेसबूकच्या मार्केट प्लेसमधून आवडलेली गाडी लगेच तेथून ते बूक करतात. तेथून खेळ सुरू होतो सायबर क्रिमिनल्सचा. सात ते आठ जणांची टोळी सक्रिय होऊन लुबाडण्यास सज्ज असते. बूक केलेल्या गाडीचा बनावट मालकाचा लगेच फोन येतो. ‘गाडी केव्हा पाहीजे? कुठे आणून देऊ? अशी थाप मारल्या जाते. हे सर्व बोलणे झाले की लगेच अर्धी रक्कम गुगल पे किंवा पेटीएम करण्यास सांगतात.
ती रक्कम मिळाली की दुसरी एक महिला कॉल करते आणि गाडी आमच्या कुरीयर कंपनीला देण्यात आली असून दोन ते तीन दिवसांत डिलीव्हरी देण्याचे प्रलोभन दाखविण्यात येते. लगेच डिलिव्हरी चार्जेस म्हणून ५ ते १० हजार रूपये मागण्यात येते. गाडी पॅक करीत असल्याचे सांगून पैसे उकळल्या जातात.
सैन्यात असल्याची थाप
‘मी सैन्यात आहे. माझी बदली झाल्यामुळे गाडी विकायची आहे,’ अशी थाप सायबर क्रिमिनल्स मारतात. ग्राहकाचा विश्वास बसावा म्हणून आर्मीचे बनावट कार्ड, वर्दीवरील फोटो वॉट्सॲपवर पाठवितात. एक सैनिक आपली फसवणूक करणार नाही, या विश्वासाने त्यांना पैसे पाठविल्या जातात. त्याच विश्वासाचा घात केल्या जातो.
हेही वाचा - काय सांगता! आज रविवार आहे, अंत्यसंस्कार विधी होणार नाही! ही आहे अडचण
फसवणूक टाळण्यासाठी ऑनलाईन शॉपिंग करताना काळजी घेणे आवश्यक आहे. सेकंड हॅंड कार, दुचाकीची खरेदी करताना केवळ फोटो बघून खरेदी करण्याचा निर्णय घेऊ नका. प्रत्यक्षात वाहनमालकाला भेटूनच असा व्यवहार करायला हवा. चोरीचे वाहन, गुन्ह्यात अडकलेले वाहन किंवा गहाण ठेवलेले वाहन विक्रीची शक्यता असते. तसेच सायबर क्रिमिनल्स केवळ पैसा उकळण्यासाठीच वाहनांची फोटो टाकत असतात. त्यामुळे असा ऑनलाईन व्यवहार शक्यतो टाळावेत.
- केशव वाघ
(सहायक पोलिस निरीक्षक, सायबर क्राईम)
संपादन - अथर्व महांकाळ