कारमध्येच रंगली वाढदिवसाची पार्टी; पोलिसांनी उतरविली "झिंग' 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 12 जानेवारी 2020

शुक्रवारी वाडी भागातील एका युवकाचा वाढदिवस होता. सेलिब्रेशनसाठी तो आपला एक मित्र आणि तीन मैत्रिणींना घेऊन कारने फुटाळा तलाव परिसरात पोहोचला. कारमध्ये बसूनच मुलींनी बिअर तर मुलांनी दारू ढोसली. 

नागपूर : कारमध्येच वाढदिवसाची पार्टी रंगली. दोन मित्र, तीन मैत्रिणींनी मिळून मद्य प्राशन केले. झिंग चढताच फुटाळा तलाव परिसरात गोंधळ सुरू केला. माहिती मिळताच पोलिसही तेथे पोहोचले. त्यांना बघताच पाचही जणांची बोवडी वळली. प्रारंभी कारचालकावर "ड्रंक अँड ड्राईव्ह'ची कारवाई केली. 

पालकांना ठाण्यात बोलावून घेत तरुणींना त्यांच्या ताब्यात दिले. अशाप्रकारे कारवाईचा डोज देत झिंग उतरविणाऱ्या पोलिसांचे पालकवर्गातून कौतुक होत आहे. 

अन्‌ गोंधळ झाला सुरू 

अलीकडच्या काळात वाढदिवस सेलिब्रेट करण्याचे प्रमाण चांगलेच वाढले आहे. अगदी रात्री 12 च्या ठोक्‍यावर केक कापण्यासोबतच पश्‍चिमात्य पद्धतीप्रमाणे मद्य प्राशन केले जाते. या सेलिब्रेशनमधील तरुणींची संख्याही लक्षणीय ठरू लागली. त्यामुळे पालकांच्या डोकेदुखीत भर पडली आहे.

शुक्रवारी वाडी भागातील एका युवकाचा वाढदिवस होता. सेलिब्रेशनसाठी तो आपला एक मित्र आणि तीन मैत्रिणींना घेऊन कारने फुटाळा तलाव परिसरात पोहोचला. कारमध्ये बसूनच मुलींनी बिअर तर मुलांनी दारू ढोसली. मद्याचा अमल चढताच त्यांचा गोंधळही सुरू झाला. 

क्‍लिक करा : पर्यटकाला वाघिणीचा आवाज काढणे पडले महागात, वाचा काय झाले...

पोलिसांनी उतरवली झिंग 

याबाबतची माहिती पोलिस उपायुक्त विनीता शाहू यांच्यापर्यंत पोहोचली. त्यांच्या सूचनेवरून अंबाझरी पोलिस फुटाळा तलाव परिसरात पोहोचले. मद्यधुंद अवस्थेतील तरुण-तरुणींना ताब्यात घेतले. पोलिसांना बघताच झिंग उतरून त्यांची पाचावर धारण बसली. शाहू यांच्या सूचनेनुसार वाहतूक पोलिसांना बोलावून घेण्यात आले. त्यांनी कारचालक युवकाविरुद्ध ड्रंक अँड ड्राईव्हची कारवाई केली. 

मुली पालकांच्या ताब्यात 

यानंतर तरुणींना ठाण्यात आणण्यात आले. त्यांच्या पालकांना बोलावून घेत मुलींच्या कृत्याची माहिती देण्यात आली. त्यांचे समुपदेशन करण्यासह पालकांनाही समज देऊन मुलींना त्यांच्या ताब्यात देण्यात आले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Birthday Party In The Car at nagpur