Video : एका व्हायरल फोटोमुळे चिडले भाजपचे नगरसेवक ..भाजपच्या महामंत्र्यांना दिली ही धमकी...

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 जून 2020

`जास्त शाहाणपणा आला का तुह्या आंगात? सांगून राह्यलो यानंतर फोटो टाकायचे नाही 37 वर?' ही धमकी आहे एका नगरसेवकाची. नगरेसवक भाजपचे आहेत आणि आश्‍चर्य म्हणजे धमकी ज्यांना दिली गेली, तेही भाजपचे पदाधिकारी आहेत... आणि 37 नंबर म्हणजे प्रभाग 37 चा व्हॉट्‌अस ऍप ग्रुप. कसे घडले हे `धमकी'नाट्य वाचाच. सोबत `ऑडिओ क्‍लिप'ही दिली आहे. ती ही जरूर ऐका.

नागपूर : लोकांनी निवडूण दिलेल्या लोकप्रतिनिंधींनी लोकांची विकासकामे करावीत, अशी लोकांची अपेक्षा असते. त्यासाठी कधी सामूहिकपणे तर कधी एकएकट्याने आपले प्रश्‍न लोकप्रतिनिधींकडे मांडण्याचे काम सुजाण नागरिक करीत असतात. नागपूर शहरातील असेच एक सुजाण नागरिक आहेत गजानन कापसे. ते नागपूर शहरातील प्रभाग 37 मध्ये राहतात. लोकांचे प्रश्‍न सातत्याने मांडण्याचे कामही ते करतात. त्यांच्या कामाचा झपाटा आणि लोकप्रियता पाहून भाजपने त्यांना दक्षिण-पश्‍चिम विधानसभा क्षेत्राच्या ओबासी मोर्चाचे महामंत्रीही नियुक्त केले. तर दिलीप दिवे हे भाजपचे सक्रिय कार्यकर्ते आहेत. त्यांच्या कामामुळे लोकांनी त्यांच्यावर विश्‍वास ठेवला. ते निवडणूकीत उभे राहिले आणि प्रभाग 37 मधून ते निवडूण आले. अर्थात ते भाजपचे विद्यमान नगरसेवक आहेत. महामंत्रीही भाजपचे आणि नगरसेकही भाजपचे. मग प्रश्‍न असा पडला असेल की, यांच्यात जुंपली ती कशावरून? काय घडले की भाजपच्याच नगरसेवकाने भाजपच्याच महामंत्र्याला धमकी दिली.

..तर घडले असे.

प्रभाग क्रमांक 37 मधील पडोळे हॉस्पिटलजवळील हलबा समाज महांसघ कार्यालय परिसरात असलेल्या एक रस्त्यावर गडर लाईनचे जानेवारीमध्ये काम झाले. परंतु पुढे अचानक इथले काम बंद झाले. दुसरीकडे काम सुरू झाले. मग "लॉकडाउन' जाहीर झाले आणि काम बंदच राहिले. चार-पाच दिवसांपूर्वी झालेल्या पावसात या रस्त्यावर एक मोठा खड्डा पडला. आधीच 25 फुटाचा अरुंद रस्ता. खड्डा एवढा मोठा होता की रस्त्यावरून जायला जागाच नाही. मग एक कार त्या खड्ड्यात फसली. बराच वेळ फसून होती. अखेर लोक गोळा झाले आणि 25 एक लोकांनी हातभार लावत ती कार खड्ड्यातून कशीबशी बाहेर काढली. पुन्हा पाऊस झाल्यावर पुन्हा मग मोठा खड्डा पडला. खड्डा एवढा मोठा होता की पाऊस सुरू असताना जर कुणी तेथून गेला असता, तर तो नक्कीच खड्ड्यात पडला असता. आता या खड्‌ड्‌याचे आणि भाजपच्या दोन पदाधिकाऱ्यांमधील "घमासान'चा संबंध काय?

तर झाले असे...

गजानन कापसे हे दीनदयाल नगर येथील कापसे ले-आउटमध्ये अर्थात प्रभाग 37 मध्येच राहतात. ते याच भागातील भाजपचे पदाधिकारी. नागपूर महानगरपालिकेतही भाजपचीच सत्ता. त्यामुळे स्वाभाविकपणे तेथील लोक त्यांच्याकडे या खड्ड्याची तक्रार करू लागले. कापसे यांनी एक जबाबदार पदाधिकारी म्हणून भाजपच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या प्रभाग 37 या व्हॉट्‌स ऍप ग्रुपवर या खड्डयाचे फोटो सोमवारी शेअर केले. याच ग्रुपमध्ये असलेले भाजपचे नगरेसवक दिलीप दिवे यांनी ते फोटो बघताच गजानन कापसे यांना कॉल लावला आणि मग या दोघांमध्ये इथून खडाजंगी सुरू झाली.

क्लिक करा - सुशांतला होता हा त्रास... नियमित घ्यायचा टॅबलेट्‌स
 

.. मग भडकला पारा

"37 नंबवर फोटो का टाकले?', असा थेट प्रश्‍न सुरुवातीलाच दिवे यांनी केला. त्यावर "यात ग्रुपमध्ये भाजपचेच सर्व लोक आहेत. दुसरीकडे कुठे फोटो व्हायरल केले?', असा युक्तिवाद गजानन कापसे यांनी केला. त्यावर दिवे चांगलेच भडकले. या ग्रुपवर यापुढे असले फोटो टाकता कामा नये, वगैरे इशारा मग दिवे यांनी दिला. त्यावर "यापुढे मी अशा कोणत्याही प्रश्‍नांचे फोटो ग्रुपवर टाकीलच. वारंवार टाकीलच. मला या ग्रुपमधून काढून टाकायचे असेल तर काढून टाका', अशी भूमिका कापसे यांनी घेतली.

मनपा आयुक्‍तांनाही वादात ओढले...

आपले प्रश्‍न मांडण्यासाठी सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात वापर लोकांकडून केला जातो. "व्हाट्‌स ऍप ग्रुप' असो किंवा फेसबुक यावर पोस्ट टाकून आपले प्रश्‍न लोक मांडतात. उद्देश हाच असतो की संबंधित प्रश्‍न किंवा संबंधित समस्या जबाबदार लोकप्रतिनिधी किंवा अधिकारी यांच्यापर्यंत पोहोचावे आणि त्यावर तोडगा निघावा. स्वतः मनपा आयुक्त तुकाराम मुंढे फेसबुक पेजवर सातत्याने लोकांच्या प्रश्‍नांवरून लोकांसोबत बोलत असतात. लोकांचे प्रश्‍न मांडण्यासाठी तर त्यांनी एक ऍपही "लॉंच' केला आहे. दिवे यांनी कापसे यांना इशारा देताना "जा तुम्ही कमिश्‍नकडे' असेही म्हटले आहे. त्यामुळे या वादात त्यांनी नागपूर मनपा आयुक्तांना का ओढले, असा प्रश्‍न पडल्याशिवाय राहात नाही.

असे का घडले? - तीन हजार मुलींचा बाप अखेर कोसळला..पोरके करून गेला
 

खास वाचकांसाठी

कापसे यांनी त्यांची "ऑडिओ क्‍लिप' सोशल मीडियावर टाकली आणि ती चांगलीच व्हायरल होवू लागली. हीच क्‍लिप खास वाचकांसाठी आम्ही उपलब्ध करून दिली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP carporator in Nagpur angered on BJP Mahamantri