भाजप नेत्यांकडून आयुक्‍त तुकाराम मुंढेंचे कौतुक, वाचा काय आहे प्रकार...

राजेश प्रायकर
बुधवार, 27 मे 2020

आयुक्त तुकाराम मुंढे यांनी कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर शहरात केलेले कार्य सध्या सोशल मीडियावर धूम घालत आहे. त्यांच्या कार्याची सोशल मीडियावर दखल घेतली जात आहे.

नागपूर : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर शहरात केलेल्या उपाययोजनांबाबत महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांचे इतर महापालिका क्षेत्रातही कौतुक होत आहे. मात्र, महापालिकेतील भाजप सत्ताधाऱ्यांत त्यांच्या कार्यपद्धतीवरून प्रचंड नाराजी आहे. किंबहुना आयुक्त व सत्ताधाऱ्यांत शीतयुद्ध आहे. परंतु, भाजपच्याच काही नेत्यांवर आयुक्तांनी भुरळ घातल्याचे चित्र सोशल मीडियावरील एका पोस्टमधून दिसून येते.

आयुक्त तुकाराम मुंढे यांनी कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर शहरात केलेले कार्य सध्या सोशल मीडियावर धूम घालत आहे. त्यांच्या कार्याची सोशल मीडियावर दखल घेतली जात आहे. सोशल मीडियाच्या फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम या तिन्ही प्रकारात आयुक्तांच्या कामाची प्रसिद्धी केली जात आहे. केवळ नागपूरकरच नव्हे तर राज्यातून "नेटकरी' तसेच त्यांचे फालोअर्स त्यांच्याबाबतच्या बातम्या सोशल मीडियावर व्हायरल करीत आहे.

1962 नंतर त्यांनी पुन्हा केले आक्रमण, पण काढावा लागला पळ...

सोलापूरवरून "सकाळ'मध्ये आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याबाबत "नागपुरात नियंत्रणाचा तुकाराम मुंढे पॅटर्न' या मथळ्यासह प्रकाशित झालेली बातमी एका फालोअर्सने पोस्ट केली आहे. या बातमीवर "कमेंट' करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघातील भाजप नेते विजय राऊत यांनी आयुक्त मुंढे यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. विजय राऊत हे गेल्या महापालिकेच्या निवडणुकीत प्रभाग 38 मधून भाजपचे उमेदवार होते.

त्यापूर्वीही महापालिका निवडणुकीत सातत्याने ते भाजपचे उमेदवार होते किंवा भाजप उमेदवाराच्या विजयासाठी जिवाचे रान करताना दिसून आले. मागील वर्षी ते शहर भाजपचे उपाध्यक्षही होते. भाजप राज्यात सत्तेत असताना त्यांची नागपूर महानगर विकास प्राधिकरणावर (एनएमआरडीए) सदस्य म्हणून नियुक्तीही झाली होती. दक्षिण-पश्‍चिम मतदारसंघात भाजपच्या यशात त्यांच्याही वाटा आहे. या भाजप नेत्याने आयुक्त मुंढे यांच्याबाबतच्या पोस्टवर "गुड वर्क, जनतेची खरी सेवा करीत आहे' अशी "कमेंट' केली आहे.

एकीकडे पालिकेत महापौर, सत्तापक्षनेते, स्थायी समिती अध्यक्षांसह विविध समित्यांचे सभापती, नगरसेवक आयुक्तांच्या कार्यशैलीवरून जाहीरपणे नाराजी व्यक्त करीत आहेत. त्याच पक्षाच्या एका नेत्याकडून आयुक्तांवर कौतुकाचा वर्षाव होत असल्याने आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत आहे. यावर प्रतिक्रियेसाठी विजय राऊत यांच्याशी संपर्क केला असता ते उपलब्ध होऊ शकले नाही.

 

"सकाळ'च्या बातमीवर 15 हजार "लाईक्‍स'

सोलापूर येथून "सकाळ'ने आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कार्याचा गौरव करणारी बातमी प्रकाशित केली. ही बातमी आयुक्तांच्या एका फालोअर्सने फेसबुकवर पोस्ट केली. काल, सोमवारी सायंकाळपर्यंत या बातमीला 15 हजार "लाईक्‍स' होते तर 21 लोकांनी कमेंट करीत कौतुक केले. 1200 लोकांनी ही बातमी "शेअर' केली. याच बातमीवर विजय राऊत यांनी आयुक्तांच्या कौतुकासह "कमेंट' केली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP leaders Appreciation Commissioner Tukaram Mundhe