
हिरवीगार शेत, मळे टोळधाडीचे खाद्य आहे. त्याच्या शोधात शेकडो मैल टोळधाड प्रवास करतात. आफ्रिका देशांमध्ये टोळधाडीचे प्रमाण अधिक आहे.
नागपूर : नागपुरातील काटोल आणि कळमेश्वर तालुक्यात टोळधाडीने हल्ला करून शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. या टोळधाडीचे उगमस्थान भारत आणि पाकिस्तानमधील "नो मॅन्स लॅन्ड' या परिसरातून झाले असल्याची माहिती समोर आली. तब्बल 1962 नंतर टोळधाड नागपूरमध्ये आल्याची माहिती राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या सेंटर फॉर सेरिक्चलर ऍण्ड बायोलॉजिकल पेस्ट मॅनेजमेंट रिसर्चचे (सीबीएसआर) संचालक डॉ. मनोज रॉय यांनी "सकाळ'शी बोलताना दिली.
हिरवीगार शेत, मळे टोळधाडीचे खाद्य आहे. त्याच्या शोधात शेकडो मैल टोळधाड प्रवास करतात. आफ्रिका देशांमध्ये टोळधाडीचे प्रमाण अधिक आहे. आपल्याकडे साधारणत: पाकिस्तानातून गुजरातमार्गे टोळधाड भारतात दाखल होत असते. यावेळी टोळधाडीची संख्या बरीच मोठी आहे.
गुजरात, राजस्थान यानंतर मध्य प्रदेश आणि आता राज्यातील नागपूर जिल्ह्याच्या काटोल आणि कळमेश्वर या तालुक्यात टोडधाडीने मोठे नुकसान केल्याचे दिसून येते. निरीक्षण केले असता, त्या गुलाबी रंगाच्या असल्याचे आढळून आले आहे.
लॉकडाउन शिथिल करताच अंतर्वस्त्रासाठी उड्या; खरेदीसाठी ग्राहकांची धूम
शिवाय त्या केवळ तीन ते चार दिवसांत मोठ्या झाल्या आहेत. 8 ते 9 दिवसात त्या प्रजनन करण्यास सक्षम होणार आहेत. त्यापूर्वीच त्यावर नियंत्रण न मिळाल्यास त्या विक्राळ रूप धारण करतील असा इशारा डॉ. रॉय यांनी दिला. मंगळवारी (ता.26) डॉ. मनोज रॉय यांच्यासह त्यांचे विद्यार्थी डॉ. विजय राऊत, डॉ. प्रशांत चव्हाण यांनी सकाळी त्यांनी कळमेश्वर परिसरात तपासणी केली. त्यातूनच हा निष्कर्ष काढण्यात आला आहे.
डॉ. मनोज रॉय यांनी घेतलेल्या नमुन्यानुसार टोळधाड उष्ण वातावरणात अधिक प्रमाणात विकसित होत असून हिरवळीत वाढतात. विमान वा ड्रोन याद्वारे रसायन शिंपडले तरी त्याचा काहीही उपयोग होणार नाही. सायंकाळी हा झुंड जमिनीवर बसतो. त्यावेळी त्याच्यावर केमिकल टाकून नियंत्रण मिळविता येणे शक्य आहे. नेमके किती रसायन वापरावे हे त्या क्षेत्रातील नागरिक, प्राणी, पक्षी आणि इतर गोष्टींना ध्यानात घेऊन करणे गरजेचे आहे. टोळधाड जिथे मानवी वावर नसतो, तिथेच प्रजनन करीत असल्याने अशा क्षेत्रांचा शोध घेणे आवश्यक आहे.
यापूर्वी 1962 साली मध्य प्रदेशात अशाप्रकारे टोळधाडीने कहर केला होता. शेतीचे अपरिमित नुकसान केल्याने सरकारने त्यावर संशोधन करण्यास सुरुवात केली होती. यासाठी कॅनडाची सरकारने मदत घेतली होती. हवेच्या दिशेने जाणारे टोळधाड जिथे हिरवळ दिसते, त्या ठिकाणी थांबून ती फस्त करते.