गडकरींशी पंगा नको म्हणून आमदार पडळकरांना भाजप नेत्यांनी सोडले वाऱ्यावर; अद्याप ‘वंचितच'

राजेश चरपे
Saturday, 30 January 2021

ओबीसींची बाजू मांडण्यासाठी पडळकर नागपूरला आले होते. त्यांना सोबत भाजपचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहतील, अशी अपेक्षा सर्वांना वाटत होती. मात्र, प्रत्यक्षात पत्रकार परिषदेला भाजपचा एकही पदाधिकारी उपस्थित नव्हता.

नागपूर : वंचित बहुजन आघाडीला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये येऊन आमदार झालेले माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे समर्थक गोपीचंद पडळकर यांना भाजपने अद्यापही मनापासून स्वीकारल्याचे दिसून येत नाही. शनिवारी ते नागपूरला आले होते. त्यांनी पत्रकार परिषदसुद्धा घेतली. मात्र त्यांच्या कार्यक्रमाला भाजपचा एकही पदाधिकारी उपस्थित नव्हता.

पडळकर यांनी वंचित बहुजन आघाडीतर्फे लोकसभा निवडणूक लढविली होती. त्यांनी पुणे येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्या विरोधात दंड थोपटले होते. पुण्यात पवार कुटुंबीयांच्या वर्चस्वाला धक्का आणि रासपचे महादेव जानकर यांना शह देण्यासाठी पडळकर यांना भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला. त्यांनी बारामती विधानसभा मतदारसंघातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात लढण्यासाठी तयार करण्यात आले.

अधिक माहितीसाठी - सून आणि नातवांनी काढलं घराबाहेर अखेर चिमुकल्यांनी 'तिला' दिला खांदा; उपस्थितांच्या डोळ्यांत पाणी

पडळकर धनगर समाजाचे प्रतिनिधित्व करतात. पराभव झाल्यानंतर फडणवीस यांनी त्यांना विधान परिषदेवर पाठविले. धनगर आरक्षणाच्या आंदोलनाला शांत करण्यासाठी भाजपने पडळकरांना पक्षात घेऊन नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला होता. राज्यात सत्तापालट झाली. महाविकासआघाडीचे सरकार सत्तेवर आहे. मात्र, धनगर आरक्षणाचा प्रश्न अद्यापही सुटला नाही. सोबतच मराठा आणि ओबीसींमध्ये आरक्षणावरून वाद सुरू आहे.

ओबीसींची बाजू मांडण्यासाठी पडळकर नागपूरला आले होते. त्यांना सोबत भाजपचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहतील, अशी अपेक्षा सर्वांना वाटत होती. मात्र, प्रत्यक्षात पत्रकार परिषदेला भाजपचा एकही पदाधिकारी उपस्थित नव्हता. त्यांच्या पत्रकार परिषदेची माहितीसुद्धा भाजपच्यावतीने प्रसिद्धी माध्यमांना दिली नाही. त्यामुळे पडळकर भाजपचे आमदार असले तर फडणवीस यांच्या शहरातील पदाधिकाऱ्यांनी त्यांना एकटे सोडल्याचे दिसून येते. 

जाणून घ्या - नशीब लागतंय राव! ईश्वरचिठ्ठीने निवडून आली महिला अन् आता होणार सरपंच

अनेक नेत्यांनी पाठ फिरवली

पडळकर धनगर समाजाचे नेते आहेत. शहरात अनेक ओबीसी नेते आहेत. त्यांना वगळून पडळकर ओबीसींचे प्रश्न मांडणार असल्याने अनेक नेत्यांनी पाठ फिरवली असावी अशी शक्यता वर्तविली जात आहे. विशेष म्हणजे धनगर समाजाचे प्रश्न मांडण्यासाठी नितीन गडकरी यांचे कट्टर समर्थक खासदार विकास महात्मे हेसुद्धा आहेत. ते सातत्याने आरक्षणासाठी पाठपुरावा करीत असतात. उगाच गडकरी यांची नाराजी नको म्हणून शहरातील भाजपचे पदाधिकारी पडाळकर यांच्या कार्यक्रमापासून लांब राहिले असावे असाही तर्क लावला जात आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP leaders left MLA Padalkar alone Nagpur political news