नशीब लागतंय राव! ईश्वरचिठ्ठीने निवडून आली महिला अन् आता होणार सरपंच

संदीप रायपुरे
Saturday, 30 January 2021

गोंडपिपरी तालुक्यातील विहीरगाव येथील प्रभाग 3 मध्ये अनु. जमातीसाठी राखीव असलेल्या प्रभागातून आशा मडावी व कल्पना मडावी या आमनेसामने होत्या. निवडणुकीचा निकाल लागला अन् दोन्ही उमेदवारांना समान 58 मते मिळाली.

गोंडपिपरी (जि. चंद्रपूर) :  राजकारणात शेवटपर्यत काय होईल हे सांगता येत नाही. गोंडपिपरी तालुक्यातील विहीरगाव ग्रामपंचायतीमध्ये दोन्ही उमेदवारांना समान मत आल्याने ईश्वरचिठठीने निकाल लागला. त्यात विजयी ठरलेल्या महिला उमेदवार आता गावच्या प्रथम नागरिक होणार आहेत. शुक्रवारी सरंपचपदाचे आरक्षण जाहीर झाले. त्यामध्ये विहीरगावचे सरंपचपद अनु. जमाती महिलांसाठी राखीव निघाले अन् त्यांचा सरपंच होण्याचा मार्ग मोकळा झाला. राजकारणात राजयोग महत्वाचा आहे, असे म्हणतात. विहीरगावच्या घटनेने याची प्रचिती दिली.

हेही वाचा - सून आणि नातवांनी काढलं घराबाहेर अखेर चिमुकल्यांनी 'तिला' दिला खांदा;...

गोंडपिपरी तालुक्यातील विहीरगाव येथील प्रभाग 3 मध्ये अनु. जमातीसाठी राखीव असलेल्या प्रभागातून आशा मडावी व कल्पना मडावी या आमनेसामने होत्या. निवडणुकीचा निकाल लागला अन् दोन्ही उमेदवारांना समान 58 मते मिळालीत, तर एक मत नोटावर गेले. निवडणूक निर्णय अधिकारी के. डी. मेश्राम यांनी ईश्वरचिठठीने निकाल दिला. यात आशा मडावी या विजयी झाल्या. अशा अनपेक्षितपणे विजयी होण्याच्या आनंदात असतानाच आज पुन्हा त्यांचा आनंद व्दिगुणीत होण्याचा प्रसंग आला.

हेही वाचा - याला म्हणतात विश्वास! सदस्यांनी नाकारले, पण गावकऱ्यांनी स्वीकारले अन् पद जाता-जाता वाचले

शुक्रवारी दुपारी दोन वाजता तहसिलदार के. डी. मेश्राम यांच्यासह विविध पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सरपंचपदाच्या आरक्षणाची सोडत काढण्यात आली. यावेळी विहीरगावचे सरंपचपद हे अनु. जमाती महिला साठी आरक्षण आले. ही बाब समजताच आशा मडावी यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. कारण गावात सात सदस्यापैकी त्या अनु. जमाती गटात मोडणाऱ्या एकमेव महिला आहेत. ते ज्या पॅनलकडून लढल्या त्याचे केवळ दोनच उमेदवार निवडून आले होते. पण आता त्यांच्या गटाच्या उमेदवार गावच्या सरपंच होत असल्याने त्यांनीही उत्सव साजरा केला. विहीरगाव ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत व आरक्षण सोडतीत आलेल्या या योगायोगाची चर्चा आता राजकीय वर्तुळात चांगली रंगविली जात आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sarpanch reservation for st women in gondpipri of chandrapur