मदिरालये उघडली, मंदिर का नाही? भाजपचे सरकारविरोधात आंदोलन

राजेश चरपे 
Tuesday, 13 October 2020

नागरिकांच्या रोजगाराचा विचार करून बार आणि रेस्टॉरेंट उघण्याचा निर्णय घेण्यात आला. दारूची दुकाने आधीच उघडण्यात आली आहेत. त्याकरिता नियमावली आखून देण्यात आली आहे. हेच नियम मंदिरांना लागू करण्यात यावे.

नागपूर ः राज्य सरकारने मदिरालये उघडली; मात्र मंदिरे उघडण्यास काय अडचण आहे, असा सवाल करून भाजपच्या वतीने मंगळवारी वर्धा रोडवरील साई मंदिरासमोर महासचिव चंद्रशेखर बावनकुळे आणि शहराध्यक्ष आमदार प्रवीण दटके यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. नवरात्रोत्सवापूर्वी देवालये उघडण्यात आली नाही तर तीव्र आंदोलन झेडण्यात येईल, असा इशराही यावेळी देण्यात आला.

नागरिकांच्या रोजगाराचा विचार करून बार आणि रेस्टॉरेंट उघण्याचा निर्णय घेण्यात आला. दारूची दुकाने आधीच उघडण्यात आली आहेत. त्याकरिता नियमावली आखून देण्यात आली आहे. हेच नियम मंदिरांना लागू करण्यात यावे.

ठळक बातमी -  मुलाला असलेले मोबाईलचे वेड बेतले वडिलांच्या जीवावर; कुटुंबातील कर्त्या पुरुषाने उचलले टोकाच पाऊल

 मंदिरातील पुजारी, दुकानदार, फूलविक्रेते यांच्याही रोजागाराचा सरकारने विचार करावा, अशी मागणी करण्यात आली. आंदोलनात छोटू भोयर, अर्चना डेहनकर, मुन्ना यादव यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.

जेव्हा डॉक्टर थकतात, हारतात, तेव्हा देवाचाच धावा केला जातो. ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. या संस्कृतीला छेद देण्याचे काम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करीत आहेत. आज आमच्या आध्यात्मिक आघाडीच्या वतीने शांततेच्या मार्गाने आम्ही मंदिरे उघडण्याची मागणी करीत आहोत. ही मागणी जर पूर्ण झाली नाही, तर उद्या आम्ही रस्त्यांवर उतरून उग्र आंदोलन करू.
-चंद्रशेखर बावनकुळे

क्लिक करा - हवामान विभागाने दिला गंभीर इशारा; मंगळवारी विदर्भाला शेवटचा दणका बसण्याची दाट शक्यता

मोगलाई सुरू आहे का?
गर्दी आणि रांगा काय फक्त मंदिरांमध्येच लागतात का? देशी दारू दुकानांसमोर सकाळपासून रांगा बघायला मिळतात. बसेसही सुरू केल्या. त्यासुद्धा पूर्ण क्षमतेने. इतर सर्व राज्यांनी सर्व धार्मिक स्थळे सुरू केली. मग महाराष्ट्रातच काय अडचण आहे. सोशल डिस्टन्सिंग पाळून मंदिरांमध्ये दर्शनाला परवानगी द्यायला काय हरकत आहे. महाराष्ट्रात मदिरा सुरू होऊ शकते; पण मंदिरे सुरू होऊ शकत नाही. येथे काय मोगलाई आहे का?
-प्रवीण दटके,
शहराध्यक्ष

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP protest against State government on opening of temples