हिंमत असेल तर केंद्राच्या विरोधात आंदोलन करून दाखवा; भाजपला कोणी दिले आव्हान

राजेश चरपे
Friday, 27 November 2020

कोरोनाशी लढता लढता राज्याची तिजोरी रिकामी झाली. सर्व सोंग घेता येते मात्र पैशाचे घेता येत नाही. भाजप सरकारच्या काळात राज्याची तिजोरी रिकामी झाली आणि राज्य कर्जात बुडाले आहे. जेव्हा संधी मिळेल, तेव्हा आम्ही यातून मार्ग काढू, असेही राऊत म्हणाले. 

नागपूर : उठसूठ कारण नसताना वीज बिल माफीसाठी आंदोलन करणाऱ्या भाजपच्या नेत्यांनी सातत्याने वाढत असलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी कराव्या. याकरितासुद्धा एखादे आंदोलन करण्याची हिंमत दाखवावी, असा सणसणीत टोला राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी लगावला.

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाचे दर वाढले की अर्ध्यारात्री दरवाढ जाहीर केली जाते. इंधनाचे दर कमी करण्याची तत्परता केंद्र सरकार दाखवत नाही. उलट आणखी कराची आकारणी करून ते स्थिर केले जातात. जनतेला लाभ दिला जात नाही, असाही आरोप राऊत यांनी केला. नागपूरच्या संविधान चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी राऊत आले होते.

क्लिक करा - अरे बापरे!  प्राचार्यांनीच केली प्राध्यापिकेला शरीरसुखाची मागणी

त्यांनी देशात दलितांवर अन्याय होत आहे. त्यांना दुय्यम स्थान दिले जात असून, दहावीनंतरची शिष्यवृत्ती दिली जात नसल्याचे सांगितले. वीजबिलात माफी देण्याची मागणी विरोधी पक्ष करीत आहे. मात्र, कोरोना काळात आम्ही लोकांना, शेतकऱ्यांना मोठी मदत केली आहे.

कोरोनाशी लढता लढता राज्याची तिजोरी रिकामी झाली. सर्व सोंग घेता येते मात्र पैशाचे घेता येत नाही. भाजप सरकारच्या काळात राज्याची तिजोरी रिकामी झाली आणि राज्य कर्जात बुडाले आहे. जेव्हा संधी मिळेल, तेव्हा आम्ही यातून मार्ग काढू, असेही राऊत म्हणाले.

अधिक वाचा - आता धावत्या मेट्रोत साजरा करा समारंभ; अवघ्या तीन हजार रुपयांत होणार ‘ग्रॅन्ड सेलिब्रेशन

केंद्र सरकार जीएसटीचा निधी देत नाही. दुष्काळग्रस्त भागात पथक पाठवत नाही. यावर विरोधी पक्ष बोलत नाही. सरकार पाडण्याची भाषा ते करतात. मात्र, त्यांचे आमदार दुसऱ्या पक्षात चालले असल्याने त्यांची चलबिचल होते आहे. आपले आमदार संभाळायची कुवत त्यांच्यात नाही, अशी टीका करीत भाजप विरोधी पक्ष म्हणून चांगली भूमिका बजावत आहे, असाही टोला राऊत यांनी हाणला.

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP should agitate against the center