उमरेडच्या एमआयडीसीत येतात नेहमी काळेकुट्ट ढग !

सतिश तुळस्कर
Sunday, 25 October 2020

स्थानिक एमआयडीसी परिसरात वातावरणात भव्य स्वरूपात काळ्याकुट्ट धुराचे लोट उठताना दिसून येतात. याशिवाय टायर जाळून तेल काढण्याचे अन्य चार कारखाने अजून आहेत. परंतु त्यापैकी काही ठिकाणी निघणारा धूर हा धुरांड्याच्या साहाय्याने वर सोडला जातो,

उमरेड (जि.नागपूर): स्थानिक एमआयडीसी परिसरात एका कारखान्यात नियमबाह्य पद्धतीने दुचाकी, चारचाकी वाहनाचे मोठ्या प्रमाणात टायर जळण्याचे काम चालते. विशेष म्हणजे मोजक्या जागेत हा सारा कारभार चालविला जातो. त्यामुळे वातावरणात भव्य स्वरूपात काळ्याकुट्ट धुराचे लोट उठताना दिसून येतात. याशिवाय टायर जाळून तेल काढण्याचे अन्य चार कारखाने अजून आहेत. परंतु त्यापैकी काही ठिकाणी निघणारा धूर हा धुरांड्याच्या साहाय्याने वर सोडला जातो, तर काही ठिकाणी चिमणीचा वापरच होत नाही.

अधिक वाचाः पुजारी, साहित्यविक्री करणारे हताशपणे म्हणतात, विठ्ठलाऽऽऽ ! कोणता ‘धंदा’ करू पोटासाठी?
        

जाणते म्हणतात, यह तो सेहत के लिये हानिकारक है !
या कंपनीमध्या चालणाऱ्या टायर जाळण्याचा प्रक्रियेमुळे सभोवतालच्या कंपन्यांना वायू प्रदूषणाला सामोरे जावे लागते. त्या कारखान्यातून निघणाऱ्या दूषित वायूमुळे सभोवतालच्या कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कामगार, नागरिकांच्या प्रकृतीस बाधा होण्याची दाट शक्यता आहे. अनेकांना श्वसनाचे त्रास झाल्याचे बोलले जाते आणि विशेष म्हणजे त्या कारखान्यात काम करणाऱ्या मजुरांसोबत एक ४-५ वर्षांची बालकेसुद्धा आढळून आली. मोठ्यांनाच त्या वातावरणात वावरणे अवघड असून अशा परिस्थिती त्या बालकांचा जीव धोक्यात घालून त्याला तिथे ठेवल्याचे दिसून आले.या कंपनीपासून थोड्या अंतरावर एक नामांकित बेकरी उत्पादने तयार करणारी कंपनी आहे. त्या कंपनी मालकाने आपले नाव उघड करण्यास मनाई केली आणि त्या टायर जळणाऱ्या कंपनीतून निघणाऱ्या धुरापासून प्रचंड त्रास होत असल्याचे सांगितले. प्रशासनाने वेळीच लक्ष देऊन त्या कारखान्यात चालणारे नियमबाह्य पद्धतीचे तसेच पर्यावरणाला हानिकारक असलेले काम बंद करावे अशी मागणी जोर धरत आहे .

प्रदूषणाच्या तीव्रतेची मोजदाद होईल
हा प्रकार महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण बोर्डाच्या अखत्यारीत येत असून त्यांना सूचना केल्यास त्यांचे अधिकारी जातीने हजर राहून प्रदूषणाच्या तीव्रतेची मोजदाद करतील आणि सदर कंपनी चालकांवर योग्य कारवाई करतील .
प्रमोद कदम
तहसीलदार

वायू प्रदूषणामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही  
 टायर जाळून वायूप्रदूषण करणाऱ्या कंपनीवर लक्ष केंद्रित केले जाईल. तिथे चालणाऱ्या घडामोडींवर लक्ष ठेवत प्रदूषणाची बाब येणाऱ्या ग्रामसभेत मांडली जाईल आणि त्यानंतर सर्वानुमते योग्य निर्णय घेऊन उचित कारवाई केली जाईल. परिणामी कंपनी बंद करण्याची वेळ आली तर तसेही करू. पण वायू प्रदूषणामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही याची काळजी घेऊ .
महेश मरघडे
सरपंच, ग्रामपंचायत धुरखेडा

संपादनः विजयकुमार राऊत


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Black clouds always come from Umred's MID!