रेल्वेच्या ई-तिकिटांचा काळाबाजार 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 21 जून 2020

अजहरची माहिती काढून घरावर धाड टाकली. संशयाच्या आधारे झाडाझडती घेण्यात आली. यात तो आपल्या नावे असणाऱ्य वैयक्तिक आयडीवरून मोठ्या प्रमाणावर तिकीट काढत असल्याचे निष्पन्न झाले. 

नागपूर : दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने शनिवारी परडी परिसरात धाड टाकून रेल्वेच्या ई-तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या दलालाला जेरबंद केले. त्याच्याकडून 9 ई-तिकीट हस्तगत करण्यात आल्या. तपासात यापूर्वीही त्याने 152 तिकीट काढले असल्याची माहिती पुढे आली आहे. 

अजहर खान शकील खान (21) रा. नेताजीनगर, सुभाननगर, पारडी असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. पारडीतील सुभाननगर परिसरात एक व्यक्ती रेल्वे तिकिटांची चढ्या दराने विक्री करीत असल्याची गुप्त माहिती विभागीय सुरक्षा आयुक्त ए. के. स्वामी यांना मिळाली होती. त्यांच्या आदेशावरून मोतीबागचे निरीक्षक गणेश गरकल यांच्या नेतृत्वात उपनिरीक्षक बी. के. सिंह, एम. के. विश्‍वकर्मा, विजय विठोले, विजय उमरेडकर, बी. हलमारे, महिला कर्मचारी पुनम यांचे पथक सुभाननगरात पोहोचले. अजहरची माहिती काढून घरावर धाड टाकली. संशयाच्या आधारे झाडाझडती घेण्यात आली. यात तो आपल्या नावे असणाऱ्य वैयक्तिक आयडीवरून मोठ्या प्रमाणावर तिकीट काढत असल्याचे निष्पन्न झाले. 

हेही वाचा : पतीसोबत अश्‍लील वर्तन करण्यास बाध्य केले; नंतर व्हिडिओ व्हायरल करण्याची दिली धमकी 

त्यांच्या ई-मेल आयडीवर अनधिकृतरित्या काढलेल्या 9 तिकीटांची माहिती मिळून आली. या तिकीट 11 हजार 695 रुपये किमतीच्या आहेत. मोबाईलवरूनच तो तिकीट काढत होता. मोबाईलची तपासणी केली असता त्याने यापूर्वीही 152 तिकीट काढल्या असल्याचे निष्पन्न झाले. त्यांच्याकडून मोबाईल व रोख रकमेसह एकूण 24 हजाराहून अधिकचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या प्रकरणात रेल्वे कायद्यान्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली. उपनिरीक्षक बी. के. सिंह प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Black market of railway e-tickets