ब्लू मून पाहण्याची शनिवारी संधी, यानंतर तीन वर्षांनी येणार योग

राजेश रामपूरकर
Tuesday, 27 October 2020

३१ ऑक्टोबरला रात्री ८.१९ वाजता हा ‘ब्लू मून’ दिसणार आहे. एखाद्या दुर्मीळ प्रसंगाला इंग्रजीत ‘वन्स इन अ ब्लू मून’ असे संबोधित केले जाते.

नागपूर  ः कोजागिरी पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे ३१ ऑक्टोबरला चंद्र मेष राशीत राहणार असून, या दिवशी त्याचे पूर्ण दर्शन होणार आहे. एकाच महिन्यात दोनदा असे पूर्ण चंद्र दर्शन होते, त्यावेळी दुसऱ्या पूर्ण चंद्र दर्शनाला ब्ल्यू मून दर्शन असे म्हणतात, असे ज्योतिषाचार्य डॉ. अनिल वैद्य यांनी सांगितले.

३० जून २००७ ला अशी घटना घडली होती. ३१ ऑक्टोबरनंतर असा योग आता थेट ३० सप्टेंबर २०५० ला येईल. अर्थात ३१ जानेवारी व ३१ मार्च २०१८ ला आपण ब्ल्यू मून बघितला होता. अशा पद्धतीचा ब्ल्यू मून ३१ ऑगस्ट २०२३ ला बघता येणार आहे. ३१ ऑक्टोबरला रात्री ८.१९ वाजता हा ‘ब्लू मून’ दिसणार आहे. एखाद्या दुर्मीळ प्रसंगाला इंग्रजीत ‘वन्स इन अ ब्लू मून’ असे संबोधित केले जाते.

या संबोधनाचा वापर १७ व्या शतकात पहिल्यांदा झाला. सर्वसाधारणपणे प्रत्येक महिन्याला एक याप्रमाणे दरवर्षी १२ पूर्ण चंद्र दिसतात. मात्र, ‘ब्लू मून’च्या महिन्यात १३ पूर्ण चंद्र दिसतात. उगवणारा चंद्र खरे तर लालसर रंगाचा असतो. पण चंद्र जेव्हा क्षितिजापासून अधिक उंचीवर पोहोचतो तेव्हा पृथ्वीवरील परावर्तित प्रकाशामुळे चंद्र पांढऱ्या रंगाचा दिसतो. त्यात करडया छटा मिसळल्याने तो निळसर भासू लागतो. मात्र ‘ब्लू मून’च्या व्याख्येचा त्याच्या रंगाशी काहीही संबंध नाही.

महत्त्वाची बातमी - तुम्हालाही जेवण झाल्यानंतर लगेच पाणी पिण्याची सवय आहे? मग जरा थांबा आधी हे वाचा
 

पाश्चात्त्य देशांत ग्रीष्म, उन्हाळा, शरद, हिवाळा असे प्रत्येकी तीन महिन्यांचे चार ऋतू असतात. दर महिन्याला एक याप्रमाणे प्रत्येक ऋतूमध्ये तीन पूर्ण चंद्र दिसणे अपेक्षित आहे. शेतकऱ्यांच्या सोयीसाठी प्रत्येक पूर्ण चंद्र वेगळ्या नावाने ओळखला जातो. प्रत्येक चंद्रमास २९ दिवस, १२ तास, ४४ मिनिटे, ३८ सेकंद इतक्या कालावधीचा असतो. प्रत्येक सौरवर्ष ३६५ दिवस, ५ तास, १९ मिनिटे, ३० सेकंद इतक्या कालावधीचे असते. 

यानुसार प्रत्येक सौरवर्षांत पूर्ण १२ चंद्र वर्षे असतात. शिवाय १० दिवस आणि २०.९ तास अधिकचे असतात. अधिकचा कालावधी साचत जातो आणि दर ३० महिन्यांनी एकदा अधिकचा पूर्ण चंद्र दिसतो. ‘ब्लू मून’ ज्या ऋतूत दिसतो त्या ऋतूमध्ये त्या वर्षी तीनऐवजी चार पूर्ण चंद्र दिसतात. अशावेळी तिसऱ्या पूर्ण चंद्राला ‘ब्लू मून’ म्हटले जाते. फेब्रुवारी कमी कालावधीचा असल्याने ‘ब्लू मून’ कधीच दिसू शकत नाही. ३० दिवसांच्या महिन्यात ‘ब्लू मून’चे प्रमाण अत्यल्प असते असे वैद्य म्हणाले.

संपादन  : अतुल मांगे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Blue Moon to appear on Saturday