दुकानदारांनो मास्कच्या किमतीचे फलक मराठीतच लावा, अन्यथा होणार कारवाई

अतुल मेहेरे
Saturday, 7 November 2020

कोरोनाचे संक्रमण झाल्यानंतर सुरुवातीला मास्क आणि सॅनिटायजरची जादा दराने सर्रास विक्री केली जात होती. त्याची दखल राज्य सरकारने घेतली आणि काळाबाजार करणाऱ्यांवर धडक कारवाई सुरू केली.

नागपूर : शासनाने ठरवून दिलेल्या दराप्रमाणे मास्कच्या किमतीचे फलक सर्व दुकानदारांनी दर्शनी भागात मराठी भाषेत लावावे आणि ठरवून दिलेल्या दरातच मास्कची विक्री करावी, असे निर्देश अन्न व औषध प्रशासन विभागाचे मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिले. नियमाची अंमलबजावणी न केल्यास कठोर कारवाई करण्याचा ईशाराही त्यांनी दिला. 

हेही वाचा - पर्यटकांची पेंचकडे धाव, नेमक्या कोणत्या प्रवेशद्वारावरील पर्यटकांना होतेय वाघाचे दर्शन?

कोरोनाचे संक्रमण झाल्यानंतर सुरुवातीला मास्क आणि सॅनिटायजरची जादा दराने सर्रास विक्री केली जात होती. त्याची दखल राज्य सरकारने घेतली आणि काळाबाजार करणाऱ्यांवर धडक कारवाई सुरू केली. त्यानंतर मास्क आणि सॅनिटायजरचा मुबलक पुरवठा कसा होईल, यासाठीदेखील प्रयत्न केले. त्यानंतर काही प्रमाणात साठेबाजांवर नियंत्रण आले. हल्ली मास्कचा तुटवडा नाही. मात्र, काही दुकानदार नागरिकांना जादा दराने मास्कची विक्री करीत असल्याच्या तक्रारी प्रशासनाला प्राप्त झाल्या. त्याची दखलही सरकारने घेतली. 

हेही वाचा - धक्कादायक! अमरावतीत एकाच महिन्यात दगावली १७ बालके

मंत्री डॉ. शिंगणे नागपूर दौऱ्यावर आले असता जवळपास १५ मेडिकल दुकानांची तपासणी केली. शासनाने निर्धारित केलेल्या दरांनुसार मास्कची विक्री होत आहे की नाही याची खातरजमा केली. यावेळी दुकानांच्या बाहेर शासनाने ठरवून दिलेल्या दराप्रमाणे मास्कच्या किमतीचे फलक लावण्याच्या सुचनाही त्यांनी दिल्या. ज्या दुकानांसमोर इंग्रजीमध्ये किमतीचे फलक लावले होते, त्या दुकानदारांना मराठी भाषेत फलक लावण्याच्ये निर्देशही त्‍यांनी दिले. जे दुकानदार या नियमांचे पालन करणार नाही, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचा ईशाराही त्यांनी दिला. 

सरकारने घेतलेला हा निर्णय सर्वसामान्य जनतेला दिलासा देणारा आहे. त्यामुळे या नियमाची अंमलबजावणी करताना ती काटेकोर कशी होईल, याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. व्यापाऱ्यांनीसुद्धा सरकारच्या या निर्णयाचे स्वागत करून नियमांचे काटेकोर पालन करावे, अशी मागणी नागरिक करीत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: board of mask price should be in marathi says dr rajendra shingane