गोलंदाजांनीच केली फलंदाजांची कत्तल! कशी हे वाचा 

file photo
file photo

नागपूर : रणजी सामना म्हटला की, चौकार-षट्‌कारांची आतषबाजी अन्‌ धावांचा पाऊस अपेक्षित असतो. मात्र, 39 वर्षांपूर्वी खत्रीनगर येथे विदर्भ आणि यजमान राजस्थान संघादरम्यान खेळला गेलेला तीनदिवसीय सामना त्याला अपवाद ठरला. या सामन्यात चौकार-षट्‌कारांची बरसात तर दूर, एक अर्धशतकदेखील नोंदले गेले नाही. गोलंदाजांनी गाजविलेल्या त्या लढतीत फलंदाजांना अक्षरश: एका एका धावेसाठी चांगलाच घाम गाळावा लागला. केवळ दीड दिवसांत संपलेल्या त्या सामन्यात राजस्थानने बाजी मारली. पण खराब खेळपट्‌टीबद्‌दल त्यांच्यावर जबर टिकाही झाली. 


1981 मध्ये 29 ते 31 डिसेंबरदरम्यान झालेल्या त्या सामन्यात दोन्ही संघांमध्ये नावाजलेल्या फलंदाजांचा समावेश होता. पण "मॅटिन विकेट'वरील त्या "लो स्कोअरिंग' सामन्यात गोलंदाजांनी फलंदाजांचीच कत्तल केली. एरवी क्रिकेटच्या सामन्यात फलंदाज गोलंदाजांवर वर्चस्व गाजवितात. त्या सामन्यात याउलट घडले. चार डावांपैकी एकाही डावात उभय संघाला 75 किंवा त्यापेक्षा अधिक धावा काढता आल्या नाहीत. फलंदाजांसाठी एकप्रकारे वाईट स्वप्न ठरलेल्या त्या सामन्यात सुहास फडकर यांच्या नेतृत्त्वातील विदर्भ संघात राजू पनकुले, प्रसाद शेट्‌टी, प्रकाश सहस्त्रबुद्‌धे, सतीश टकले, विकास गवते, हेमंत वसू, विकास शेष, प्रदीप अणेंसारखे दिग्गज क्रिकेटपटू होते, तर राजस्थान संघातही कर्णधार पार्थसारथी शर्मा, पदम शास्त्री, संजू मुदकवी, सुनील बेंजामिन, दीपक महान, एस. मोबार, के. आर. गट्‌टानी, सुरेश जोशीसारखे दर्जेदार फलंदाज व गोलंदाज होते. 


नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी पत्करणाऱ्या विदर्भाची अपेक्षेप्रमाणे दाणादाण उडाली. राजस्थानच्या तुफान माऱ्यापुढे विदर्भाचा पहिला डाव अवघ्या 66 धावांत आटोपला. यात सर्वाधिक 14 धावा विकास गवतेंच्या होत्या. गट्‌टानी यांनी चार, शर्मा यांनी तीन व जोशी यांनी दोन गडी बाद करून विदर्भाला पहिल्याच दिवशी निपटविले. राजस्थानच्या एका गोलंदाजाचा चेंडू लागल्याने सहस्रबुद्‌धेंना सामन्यातूनच "रिटायर्ड हर्ट' व्हावे लागले. विदर्भानेही खेळपट्‌टीचा पुरेपूर फायदा घेत राजस्थानचा डाव 74 धावांमध्ये गुंडाळून यजमानांना नाममात्र आठ धावांचीच आघाडी घेऊ दिली. राजस्थानला थोपवून धरण्यात चार बळी घेणाऱ्या वसू यांचे महत्त्वपूर्ण योगदान ठरले. पहिल्या दिवशी दोन्ही संघांचे चक्‍क 24 गडी बाद झाले. विदर्भाचे फलंदाज दुसऱ्या डावात तरी चिवट झुंज देतील, अशी अपेक्षा होती. मात्र, यावेळी त्यांची अवस्था पहिल्या डावापेक्षाही बिकट झाली आणि अख्खी टीम 54 धावांत गारद झाली. गट्‌टानींनी सर्वाधिक सहा व जोशींनी तीन गडी बाद करून विदर्भाला पराभवाच्या खाईत ढकलले. विदर्भाकडून टकलेंनी सर्वाधिक 16 धावा काढल्या. 


राजस्थानचे विजयावर थाटात शिक्‍कामोर्तब 


विजयासाठी 47 धावांचे लक्ष्य ठेवल्यानंतर वैदर्भी गोलंदाजांकडून चमत्काराची अपेक्षा नव्हतीच. आणि तसला चमत्कार झालादेखील नाही. विदर्भाने सलामीवीर पदम शास्त्रींना शुन्यावर माघारी पाठवून माहोल बनविण्याचा प्रयत्न केला. परंतु, तिसऱ्या स्थानावर फलंदाजीस आलेल्या व्ही. बी. सिंग यांनी वेगवान 30 धावा फटकावून दुसऱ्या दिवशी उपाहारापूर्वीच राजस्थानच्या विजयावर शिक्‍कामोर्तब केले. यजमान संघाने केवळ नऊ षटकांतच दोन गडी गमावून विजयाची औपचारिकता पूर्ण केली. राजस्थानने घरच्या मैदानावर सामना अवश्‍य जिंकला, पण खराब खेळपट्‌टीबद्‌दल त्यांना टीकेलाही सामोरे जावे लागले. शिवाय चौकार-षटकार पाहायला मिळेल, या अपेक्षेने मैदानावर आलेल्या क्रिकेटप्रेमींचीही घोर निराशा झाली. विदर्भाचे कर्णधार फडकर यांनीही त्या सामन्याला कारकिर्दीतील सर्वात वाईट सामन्यांपैकी एक संबोधले.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com