दारूच्या व्यसनापोटी युवकाने स्वतःच्याच घरी केली चोरी; थोडे थोडे दागिने विकून व्यसन पूर्ण करण्याचा होता प्लान

अनिल कांबळे
Tuesday, 27 October 2020

आईकडील चोरीचे दागिने थोडे थोडे विकून मिळणाऱ्या पैशातून तो दररोज दारूचे व्यसन पूर्ण करणार होता. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी मुलास अटक केली आहे. न्यायालयाच्या आदेशाने त्याची कारागृहात रवानगी करण्यात आली.

नागपूर : युवकाने दारूच्या व्यसनापोटी स्वतःच्याच घरी चोरी केली. घरातील आईचे दागिने लंपास केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. ही चोरीची घटना यशोधरानगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत संजय गांधीनगर येथे शनिवारी घडली होती. याप्रकरणी यशोधरानगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.

प्राप्त माहितीनुसार, रुबल उर्फ राहुल प्रमोद धंदर (१९, रा. संजय गांधीनगर, यशोधरानगर) असे आरोपी मुलाचे नाव आहे. तो एका फायनांस कंपनीत काम करीत असून, त्याला दारूचे व्यसन आहे. त्याचे आई-वडील खाजगी काम करतात. फिर्यादी प्रमिला प्रमोद धंदर (४०) असे आरोपीच्या आईचे नाव आहे. शनिवारी दुपारी १२.४५ च्या सुमारास त्यांच्या घरी चोरी झाली होती. चोरट्याने आलमारीतील सोन्याच्या दागिन्यावर हात साफ केला होता.

अधिक वाचा - एकनाथरावांना सासुरवाडीतून कोण साथ देणार?

याप्रकरणी फिर्यादीने यशोधरानगर पोलिस ठाणे गाठून तक्रार नोंदविली होती. यावेळी फिर्यादी महिलेने मुलावरच संशय व्यक्त केला होता. त्यामुळे पोलिसांनी वेळीच तपासाची सूत्रे हलविली आणि आरोपी मुलास ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता चोरी केल्याची कुबली दिली.

आईकडील चोरीचे दागिने थोडे थोडे विकून मिळणाऱ्या पैशातून तो दररोज दारूचे व्यसन पूर्ण करणार होता. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी मुलास अटक केली आहे. न्यायालयाच्या आदेशाने त्याची कारागृहात रवानगी करण्यात आली.

क्लिक करा - ह्रदयद्रावक घटना: 15 ते 20 कुत्र्यांनी नऊ वर्षांच्या मुलाचे तोडले लचके, मूलाचा मृत्यू

निवृत्त अधिकाऱ्याच्या घरात पिस्तूल चोरी

प्रतापनगरात राहणाऱ्या सेवानिवृत्त उपायुक्त अधिकाऱ्याच्या घरातून पिस्तूल, जिवंत काडतूस आणि मोबाईल चोरी गेला. फिर्यादी ध्रूव पिसाराम आटे (७१) यांचे हिंगणा टी-पॉईंटजवळ तीन मजली घर आहे. ते समाज कल्याण विभागात उपायुक्त पदावर कार्यरत होते. सोमवारी सहा वाजता मॉर्निंग वॉकला गेले होते. दरम्यान त्यांच्या घरातून लायसन असलेली पिस्तूल, सहा जिवंत काडतूस आणि मोबाईल चोरी गेला. याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. सीसीटीव्हीच्या माध्यमातून पोलिस चोराचा शोध घेत आहे.

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The boy committed theft in his own house