
अंगणात खेळत असलेल्या सात वर्षांच्या मुलाचे वस्तीतच राहणाऱ्या दारुड्याने अपहरण केले. त्याला खोलीत कोंडून दारूचे पेग भरण्यास बाध्य केले आणि मारहाण केली. मुलाच्या अपहरणाबाबत माहिती मिळताच लकडगंज पोलिसांनी सापळा रचून आरोपीला अटक केली.
नागपूर : अंगणात खेळत असलेल्या सात वर्षांच्या मुलाचे वस्तीतच राहणाऱ्या दारुड्याने अपहरण केले. त्याला खोलीत कोंडून दारूचे पेग भरण्यास बाध्य केले आणि मारहाण केली. मुलाच्या अपहरणाबाबत माहिती मिळताच लकडगंज पोलिसांनी सापळा रचून आरोपीला अटक केली. त्याच्या तावडीतून मुलाची सुखरूप सुटका केली. राधेश्याम रामती शर्मा (वय 27, वर्धमाननगर) असे आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राधेश्याम शर्मा टाइल्स फिटिंगचे काम करतो. पीडित विद्यार्थी दुसऱ्या वर्गात शिकतो. विद्यार्थ्याचे वडील वर्धमाननगरमधील एका व्यापाऱ्याकडे सुरक्षा रक्षक आहेत. विद्यार्थी आई-वडिलांसोबत बंगल्यातीलच एका खोलीत राहातो. राधेश्याम याचा भाऊ परिसरातीलच एका व्यापाऱ्याकडे स्वयंपाकी आहे. त्याला राहण्यासाठी व्यापाऱ्याने खोली दिली. काही दिवसांपूर्वी तो गावाला गेला. राधेश्याम त्याच्या खोलीत राहतो. सोमवारी दुपारी विद्यार्थी शाळेतून घरी आला. त्याचे वडील कामानिमित्त बाहेर गेले होते.आईही तपासणीसाठी मेयो हॉस्पिटलमध्ये गेली होती.
सविस्तर वाचा - शू $$$ शांतता... कॉपी सुरू आहे
मुलगा घरासमोर खेळत होत. राधेश्याम याला तो दिसला. त्याने खेचत मुलाला खोलीत नेले. तेथे मुलाला काठीने मारहाण केली. त्याला बळजबरीने पेल्यात दारू भरायला लावली. पुन्हा मारहाण केली. तब्बल तीन तासांपर्यंत राधेश्याम याने त्या मुलाला मारहाण केली. दरम्यान मुलगा घरी नसल्याने बंगल्यातील चालकाने मुलाच्या वडिलांना सांगितले. वडिलाने पत्नीला फोन करून घरी जायला सांगितले. विद्यार्थ्याची आई घरी आली. याचदरम्यान राधेश्याम याने मुलाला सोडले.
मुलगा रडत घरी आला. आईने त्याला विचारणा केली. मुलगा राधेश्यामच्या घरी आईला घेऊन गेला. दरवाजा बंद होता. विद्यार्थ्याच्या आईने दरवाजा ठोठावला. राधेश्याम याने दरवाजा उघडला. घरात दारुच्या बाटल्या अस्ताव्यस्त पडल्या होत्या. त्यानंतर लगेच राधेश्याम याने दरवाजा बंद केला. मुलासह आईने लकडगंज पोलिस स्टेशन गाठले. घटनेची माहिती दिली. महिला पोलिस सहायक निरीक्षक राखी गेडाम यांनी अपहरणासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून राधेश्याम याला अटक केली. राधेश्याम दारुडा असून तो विकृत मानसिकतेचा असल्याची माहिती आहे.