वहिनीने साखर चोरल्यावरून झाला वाद, मध्यरात्री लहान भाऊ गच्चीवर गेला आणि... 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जून 2020

रामचंद्र व राजू मजुरी करतात. सोमवारी सकाळी एक पाव साखर चोरी केल्याचा आरोप राजू याने सुषमा यांच्यावर केला. त्यामुळे दोघांमध्ये वाद झाला. सायंकाळी रामचंद्र घरी आले. सुषमा यांनी रामचंद्र यांना याबाबत सांगितले.

नागपूर : मोठ्या भावाच्या घराशेजारी वेगळ्या राहणाऱ्या लहान भावाने वहिनीने पावभर साखर चोरल्याचा आरोप केला. भाऊ आणि वहिनी झोपले असल्याचे बघून लहान भावाने दोघांचाही वस्तऱ्याने गळा कापून ठार मारण्याचा प्रयत्न केला. ही थरारक घटना सोमवारी मध्यरात्री कपिलनगरमधील नारी गावात घडली. या घटनेने परिसरातील रहिवाशांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. रामचंद्र दादुजी जिचकार (वय 40) व त्यांच्या पत्नी सुषमा (वय 36) असे जखमी दाम्पत्याचे तर राजू जिचकार (वय 38) असे हल्लेखोर भावाचे नाव आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामचंद्र व राजू मजुरी करतात. सोमवारी सकाळी एक पाव साखर चोरी केल्याचा आरोप राजू याने सुषमा यांच्यावर केला. त्यामुळे दोघांमध्ये वाद झाला. सायंकाळी रामचंद्र घरी आले. सुषमा यांनी रामचंद्र यांना याबाबत सांगितले. रामचंद्र यांनी राजू याला जाब विचारला. त्यांच्यातही वाद झाला. रामचंद्र व सुषमा हे तीनही मुलांसह रात्री छतावर झोपले. 

हेही वाचा - 'माया भाई' म्हणून मिरवायचा, विरोधकांना खटकायचे, त्यातूनच घडला हा प्रकार...
 

मध्यरात्रीच्या सुमारास राजू छतावर गेला. त्याने वस्तऱ्याने रामचंद्र यांच्या गळ्यावर वार केले. रामचंद्र यांनी आरडओरड केली. सुषमा मदतीसाठी धावल्या. राजू याने सुषमा यांच्या गळ्यावरही वार केला. सुषमा या जीव वाचवून घराबाहेर आल्या. शेजाऱ्यांना माहिती दिली. सुषमा यांनी पोलिस नियंत्रण कक्षाला कळविले. नियंत्रण कक्षाने कपिलनगर पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच कपिलनगर पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. पोलिसांनी जखमींना मेयो हॉस्पिटलमध्ये दाखल केले. या घटनेत राजूही जखमी झाला. त्यालाही हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. याप्रकरणी कपिलनगर पोलिसांनी राजूविरुद्ध प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. 

 

मुलांचा वाचला जीव 

राजू याच्या डोक्‍यात राग होता. त्यामुळे भाऊ आणि वहिनीचा खात्मा करण्याच्या उद्देशाने राजूने दोघांवरही वस्तऱ्याने वार केला. शेजारीच सुषमा यांची तीनही मुले झोपलेली होती. त्यांच्यावरही राजू हल्ला करण्याच्या तयारीत होता. मात्र, रामचंद्र यांनी लगेच मुलांकडे धाव घेतली. राजूशी दोन-दोन हात केले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला, अशी माहिती शेजाऱ्यांनी दिली. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Brother throat cut off over sugar theft