आला तुर्की कांदा, चवीबाबत मात्र वांधा 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 जानेवारी 2020

कांद्याच्या भावाने शंभरी ओलांडल्याने ग्राहकांना स्वस्त दरात कांदा मिळावा म्हणून तुर्कस्तानमधील कांदा चार दिवसांपूर्वी नागपूर बाजारपेठेत दाखल झाला.

नागपूर : काही महिन्यांपासून कांद्याच्या वाढलेल्या किमतीमुळे ग्राहकांच्या डोळ्यांत पाणी आले आहे. यावर पर्याय म्हणून नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीत तुर्कस्तान येथून कांद्याची मोठ्या प्रमाणात आयात करण्यात आली. मात्र, या तुर्की कांद्याला अजिबात चव नसल्याने, नागपूरकरांनी या कांद्याकडे पाठ फिरवली आहे. 

कांद्याच्या भावाने शंभरी ओलांडल्याने ग्राहकांना स्वस्त दरात कांदा मिळावा म्हणून तुर्कस्तानमधील कांदा चार दिवसांपूर्वी नागपूर बाजारपेठेत दाखल झाला. मात्र, या कांद्याच्या खरेदीकडे शहरातील ग्राहकांनी पाठ फिरवली आहे. तसेच हॉटेलचालक, खानावळ चालवणाऱ्या मंडळींनी हा कांदा खरेदी करण्यास नापसंती दर्शवली आहे. 

अपेक्षित उठाव नसल्याने विक्रेतेही हैराण आहेत. दरम्यान, घरगुती वापरासाठी कांद्याला अजिबात मागणी नसली तरी, रस्त्यावरील खाद्यपदार्थ, पाणीपुरी, भेलपुरी ठेलेवाल्यांकडून तुर्की कांद्याला काही प्रमाणात मागणी असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

*भान तर ठेवा राव... ही पाण्याची कॅन नाही, वाचा काय झाले*
 

तुर्कस्तानातून दाखल झालेल्या कांद्याची किंमत 40 ते 50 रुपये किलो असून, एकाच कांद्याचे वजन अर्धा ते पाऊण किलो असल्याने, घरगुती वापरासाठी या कांद्याचा उपयोग होत नाही. शिवाय या कांद्याची मिस्करमध्ये पेस्ट केली असता पूर्ण पाणीच होत असल्याने, हॉटेल चालकांनीही या कांद्याकडे पाठ फिरवली आहे. 
 

भाव निम्म्याने कमी

 स्थानिक बाजारपेठेत भारतीय लाल कांदा 80 ते 100 आणि पांढरा कांदा 60 ते 80 रुपये किलोने विक्री होत आहे. तर तुर्की कांदा 40 ते 50 रुपये किलो दराने विकला जात आहे. सुरुवातीला दोन दिवस तुर्की कांद्याला चांगली मागणी होती. आता चव घेतल्यानंतर एकदा खरेदी केलेले ग्राहक पुन्हा या कांद्याकडे ढुंकूणही पाहत नाही. 
 

वजनाला भारी

 तुर्की कांदा खरेदी करायाचा म्हटल्यास एका किलोमध्ये दोन ते तीनच कांदे बसतात. त्यामुळे तो खरेदी केला तरी घरी वापरणे शक्‍य होत नाही. एकदा कांदा चिरला की तो लगेच वापरावा लागतो. त्यामुळे चिरलेला कांदा वाया जातो. या कांद्याची पेस्ट न होता पूर्ण पाणीच होत असल्याने, कमी किमतीत खरेदी केलेला हा कांदा पर्यायाने महागच पडत असल्याचे ग्राहकांचे म्हणणे आहे. 

 
मागणी थंडावली 
दोन दिवसांपूर्वी चांगली मागणी असलेल्या तुर्की कांद्याला चव नसल्याचे लक्षात आल्याने, कांद्याची मागणी थंडावली आहे. ग्राहक आकाराने मोठ्या दिसणाऱ्या या कांद्याची केवळ चौकशी करतात. मात्र, खरेदी करत नाही. इजिप्तमधील कांदादेखील चांगल्या प्रतीचा नसल्याने त्याची विक्री बाजारपेठेत कोणीच करत नाही. 
प्रशांत नेरकर, सचिव, बाजार समिती, नागपूर 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bulk imports of onion from Turkey in nagpur