कुख्यात आंबेकरच्या साम्राज्याला सुरुंग, मुहानगरपालिकेने केली ही मोठी कारवाई

राजेश प्रायकर
Monday, 7 September 2020

गुंड संतोष आंबेकरने लोकांकडून हडपलेल्या अनेक मालमत्ता आहेत. जुन्या बंगल्याशेजारीच असलेला हा अनधिकृत बंगला आंबेकरची पत्नी नेहा आंबेकर यांच्या नावे आहे. गांधीबाग झोनअंतर्गत असलेल्या या मालमत्तेचा क्रमांक ४८४ असा आहे.

नागपूर  : शहरातील कुख्यात गुंड संतोष आंबेकरच्या दारोडकर चौकाजवळील आलिशान चार मजली बंगल्याचे बांधकाम तोडण्यास महापालिकेने सोमवारी सुरुवात केली. अडीच हजार वर्गफूट क्षेत्रातील ही इमारत पाडण्याची कारवाई पुढील चार ते पाच दिवस सुरू राहणार आहे. काही महिन्यांपूर्वी याच बंगल्याला लागून असलेली इमारत भुईसपाट करण्यात आली होती.

गुंड संतोष आंबेकरने लोकांकडून हडपलेल्या अनेक मालमत्ता आहेत. जुन्या बंगल्याशेजारीच असलेला हा अनधिकृत बंगला आंबेकरची पत्नी नेहा आंबेकर यांच्या नावे आहे. गांधीबाग झोनअंतर्गत असलेल्या या मालमत्तेचा क्रमांक ४८४ असा आहे. हा परिसर झोपडपट्टीअंतर्गत येत असल्याने मनपाने ११ नोव्हेंबर २०१९ रोजी महाराष्ट्र स्लम ॲक्टच्या कलम ३झेड-१ अंतर्गत नेहा संतोष आंबेकर यांना नोटीस बजावली होती. या नोटीसविरुद्ध नेहा आंबेकर यांनी मनपाच्या कार्यकारी अभियंता (स्लम) यांच्याकडे प्रथम अपील दाखल केली होती.

महत्त्वाची बातमी - धक्कादायक! नातेवाईकांनी शेवटच्या क्षणी चेहरा दाखवण्याची केली मागणी; अन प्लॅस्टिक बाजूला करताच...
 

मालमत्तेसंदर्भात कुठलेही अधिकृत कागदपत्रे नसल्याने त्यांचे अपील फेटाळण्यात आले. त्यानंतर नेहा आंबेकर यांनी अतिरिक्त जिल्हाधिकारी (महसूल) यांच्याकडे द्वितीय अपील दाखल केली. मनपा आणि आंबेकर या दोघांचीही बाजू ऐकून घेतल्यानंतर नेहा आंबेकर यांचे अपील अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांनी खारीज केले होते. यापूर्वी तोडण्यात आलेल्या बंगल्यामधील सामान पोलिसांच्या गुन्हे शाखेने या घरात ठेवले होते. घराला सील करण्यात आले होते. 

अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांतर्फे अपील फेटाळले जाताच गुन्हे शाखेचे उपायुक्त राजमाने यांच्याशी संपर्क साधून या बंगल्यामधील संपूर्ण सामान काढण्याबाबत मनपाने सूचना दिली होती. गुन्हे शाखेने तत्काळ तेथील सामान काढून घर तोडण्याच्या कारवाईसाठी वाट मोकळी करून दिली. त्यानुसार मनपाच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाचे पथक सोमवारी सकाळी हा बंगला तोडण्यासाठी पोहचले.

हेही वाचा -  पितृपक्ष : ना गाय, ना श्वान श्राद्ध केले की कावळ्यालाच देतात नैवेद्य.. पण का? जाणून घ्या शास्त्रीय कारण
 

दाटीवाटीच्या क्षेत्रात असल्याने संपूर्ण घर तोडण्यास पाच ते सहा दिवसांचा कालावधी लागणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. ही कारवाई गांधीबाग झोनचे सहायक आयुक्त अशोक पाटील, कनिष्ठ अभियंता बर्लेवार, मुख्यालयातील कांबळे यांनी केली. यावेळी तगडा पोलिस बंदोबस्त होता.

 

शहरातील अनधिकृत बांधकामावर नजर

महापौर संदीप जोशी यांनी पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर शहरातील अनधिकृत बांधकामाबाबत गय केली जाणार नाही, असे जाहीरपणे सांगितले होते. मनपा आयुक्त राधाकृष्णन यांनीही विभागप्रमुखांच्या पहिल्याच बैठकीत अतिक्रमणे व अनधिकृत बांधकामे पाडण्याबाबत निर्देश दिले होते. आजच्या कारवाईतून अतिक्रमण विभागाने अनधिकृत बांधकाम लक्ष्य करण्यास सुरुवात केल्याचे दिसून आले. यापुढेही अनधिकृत बांधकामविरोधातील मोहीम सुरूच राहील, असे महापौर संदीप जोशी यांनी म्हटले. 

संपादन : अतुल मांगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bulldozer on Santosh Ambekar's Four floors bungalow