esakal | पितृपक्ष : ना गाय, ना श्वान श्राद्ध केले की कावळ्यालाच देतात नैवेद्य.. पण का? जाणून घ्या शास्त्रीय कारण 
sakal

बोलून बातमी शोधा

Pittrupaksha: Neither cow nor Dog, Why Naivdya only to Crow?

मृत मनुष्य पृथ्वीवरून जरी नाहीसा झाला तरी दुसऱ्या एखाद्या लोकांत वास करतो, अशी कल्पना बहुतेक लोकांत आढळते. त्याच कल्पनेतून पितृपक्षाची निर्मिती झाली. परंतु त्यामागे शास्त्रीय कारणही सांगितले जाते.

पितृपक्ष : ना गाय, ना श्वान श्राद्ध केले की कावळ्यालाच देतात नैवेद्य.. पण का? जाणून घ्या शास्त्रीय कारण 

sakal_logo
By
अतुल मांगे

नागपूर : गणेश विसर्जनानंतर दुसऱ्या दिवशी पौर्णिमा आणि त्यानंतर सुरू होतो पितृ पंधरवडा. या पंधरा दिवसांत पितरांच्या नावे दानधर्म, श्राद्ध केले जाते. हिंदू संस्कृतीमध्ये जवळपास सर्वच धर्मांमध्ये श्राद्ध विधीला महत्व आहे. या काळात पितरांचे स्मरण करून श्राद्ध केल्यास पितरांना शांती मिळते. पितरांच्या आशीर्वादामुळे वंशजांच्या जीवनातील अडचणी दूर होत असल्याने या पंधरवड्यास अनन्यसाधारण महत्व आहे. विशेषतः महाराष्ट्रात तिथीनुसार श्राद्ध करण्याची प्रथा आहे. श्राद्धविधीमुळे केवळ पितर आणि वंशजांना समाधान मिळते एवढेच नव्हे तर यामागे शास्त्रीय कारणेही आहेत. जाणून घेऊया काय आहेत ती.         

भाद्रपद महिन्याचा कृष्णपक्ष म्हणजे प्रतिपदा ते अमावास्या हा काळ पितृपंधरवडा म्हणून ओळखला जातो. यास पितृपक्ष असेही म्हणतात. पितृपूजा ही धर्माच्या अनेक शाखांपैकी एक महत्त्वाची शाखा आहे. मृत पितरांच्या संबंधीच्या विधिसमूहाला पितृपूजा असे म्हणतात. पृथ्वीवरील सर्व प्राचीन व अर्वाचीन देशांत थोडया फार फरकाने पितृपूजेचे अस्तित्व आढळते. मनुष्याचा मृत्यू झाला म्हणजे त्याचे पुढे काय होते यासंबंधींच्या कल्पना निरनिराळ्या लोकांमध्ये निरनिराळ्या तऱ्हेने आढळून येतात. मृत मनुष्य पृथ्वीवरून जरी नाहीसा झाला तरी दुसऱ्या एखाद्या लोकांत वास करतो, अशी कल्पना बहुतेक लोकांत आढळते. त्याच कल्पनेतून पितृपक्षाची निर्मिती झाली. परंतु त्यामागे शास्त्रीय कारणही सांगितले जाते.

हेही वाचा - मला लाच मागितली... आता मी काय करू?, तक्रार कुठे करू? सांगा
 

जगात प्रत्येक झाड प्राणवायूचे उत्सर्जन करत असते. परंतु वड आणि पिंपळ हे दोन वृक्ष इतर झाडांपेक्षा एकाच वेळी दुपटीने प्राणवायू उत्सर्जित करतात. हे सर्व शास्त्रज्ञांनी मान्य केले आहे. त्यामुळे या दोन झाडांना अनन्यसाधारण महत्व आहे. किंबहुना त्यांना देवाचा दर्जा दिला आहे. जगात सर्व झाडांची रोपे बीज प्रक्रियेद्वारे मनुष्य लावू शकतो. परंतु, फक्त वड व पिंपळ या दोनच वृक्षांची प्रत्यक्ष बीजनिर्मिती होऊ शकत नाही. या दोन्ही झाडांची कोमल अंकुर स्वरूपातील फळं जेव्हा कावळे खातात, (केवळ कावळेच, इतर कोणताही पक्षी नाही) तेव्हा त्यांच्या पोटातच ही प्रक्रिया सुरू होते आणि ते जेथे विष्ठा करतात तेथेच वड किंवा पिंपळ वृक्ष उगवतात.

कावळ्यांशिवाय ही झाडे टिकणार नाहीत किंबहुना आपल्याला वड आणि पिंपळ वृक्ष वाढवायचे असतील तर कावळ्यांचे संवर्धन सर्वांत महत्वाचे आहे. कावळ्यांचे अंडी घालणे (प्रजनन) हे भाद्रपद महिन्यातच होते. त्यामुळे या काळात प्रत्येकाने त्यांना घरोघरी पोषक आहार दिला तरच हे सृष्टीचक्र व्यवस्थित चालेल हे पूर्वीचे संत, शास्त्रकारांनी जाणले होते. आपल्या संस्कृतीतील ऋषि-मुनी हे अत्यंत बुद्धिमान आणि सखोल विद्वान होते. माणसांच्या आरोग्यासाठी ही दोन झाडे अत्यंत उपयोगी व आवश्यक आहेत म्हणून या वृक्षांचे संवर्धन होण्यासाठी पोषक आहार कावळ्यांना देण्याची प्रथा सुरू करण्यात आली. त्यासाठीच पितृपंधरवड्याची निर्मीती करण्यात आली.  

अवश्य वाचा - अविश्वसनीय! विदर्भातील या गावात चक्क डायनासोर द्यायचे अंडी: काही वर्षांपूर्वी सापडले होते अवशेष
 

वेगवेगळ्या राष्ट्रांमध्ये वेगवेगळी संकल्पना


पितरांची कल्पना मान्य केल्यावर असा प्रश्न उद्भवतो की पितरांचा पृथ्वीवरील जिवंत प्राण्यांशी व त्यातल्या त्यात आपल्या आप्तेष्टांशी संबंध येऊ शकतो किंवा नाही; व संबंध असला तर तो कोणत्या प्रकारचा असू शकेल. पुष्कळ लोकांत अशी समजूत आढळते की पितर मृत्यूनंतर आपल्या घराण्याशी चांगल्या रीतीचा संबंध ठेवतात, आपल्या घराण्यांतील माणसांचे अगर आप्तेष्टांचे कल्याण करण्यासाठी झटतात व आपल्या घराण्याविरुद्ध असलेल्या शत्रूंचा नाश करण्याचा प्रयत्न करतात. याउलट काही जाती व राष्ट्रांमध्ये अशी कल्पना प्रचलित आढळते की पितर आप्तेष्टांशी व आपल्या माणसांशीही चांगल्या तऱ्हेने वागत नाहीत. त्यामुळे ज्या ज्या जातीची पितरांसंबंधींची जशी चांगली अगर वाईट कल्पना असेल त्या त्याप्रमाणे त्यांच्यामध्ये पितृपूजेच्या विधींमध्ये फरक आढळतात.