केंद्रीय मंत्री नितीन गडकरी थेट घरीच

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 जानेवारी 2020

नागरिकत्व कायद्याची संपूर्ण माहिती देण्यासाठी आजपासून देशभरात भाजपने जनजागृती मोहीम सुरू केली. शहर भाजपनेही या मोहिमेला सुरुवात केली असून, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, महाराष्ट्राच्या प्रभारी खासदार सरोज पांडे यांनी शहरातील मुस्लिमबहुल भागातील घरांना भेट दिली.

नागपूर : नागरिकत्व कायद्याचे फायदे स्पष्ट करीत केंद्रीय रस्ते परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी आज घराघरांमध्ये जनजागृती केली. गडकरी यांनी मुस्लिम बांधवांसोबत या कायद्यावर चर्चा करीत घाबरण्याचे कुठलेही कारण नसल्याचे सांगत त्यांची भीती दूर करण्याचा प्रयत्न केला.
लोकसभा व राज्यसभेत नागरिकत्व कायदा मंजूर झाला. मात्र, विरोधकांकडून या कायद्यावरून आकांडतांडव सुरू आहे. एवढेच नव्हे या कायद्याबाबत अफवा पसरवून देशातील मुस्लिम समाजात भीती निर्माण केली जात आहे. या कायद्याची संपूर्ण माहिती देण्यासाठी आजपासून देशभरात भाजपने जनजागृती मोहीम सुरू केली. शहर भाजपनेही या मोहिमेला सुरुवात केली असून, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, महाराष्ट्राच्या प्रभारी खासदार सरोज पांडे यांनी शहरातील मुस्लिमबहुल भागातील घरांना भेट दिली.

सविस्तर वाचा - आओ सवॉंरे नयी दुनिया

मानकापूर, मोहननगर, गोंडवाना चौकातील मुस्लिम घरांमध्ये गडकरी यांनी "नागरिकत्व सुधारणा कायद्याचे वास्तव' अशी माहिती असलेले पत्रक दिले. या कायद्याबाबत मुस्लिम समाजातील संभ्रम, गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न गडकरी यांनी केला. त्यांनी मुस्लिम बांधवांशी चर्चा केली. हा कायदा देशातील नागरिकांचे नागरिकत्व हिसकावून घेण्यासाठी नाही तर बाहेर देशातील हिंदू अल्पसंख्यांकांना नागरिकत्व देण्यासाठी असल्याचे गडकरी यांनी मुस्लिम कुटुंबीयांना सांगितले.

भाजप सरकार सदैव मुस्लिम समाजाच्या पाठीशी

मुस्लिम समाजाला घाबरण्याचे कारण नाही. कॉंग्रेस व डावे केवळ या कायद्यावरून राजकारण करीत अफवा पसरवित आहे. देशातील भाजप सरकार सदैव मुस्लिम समाजाच्या पाठीशी असल्याचेही गडकरी यांनी सांगितले. यावेळी त्यांच्या समवेत शहर भाजपाध्यक्ष प्रवीण दटके, माजी आमदार सुधाकर देशमुख, डॉ. उपेंद्र कोठेकर यांच्यासह अनेक भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.  

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: cabinet minister Nitin Gadkari in muslim house