गर्भवती मातांनो! काळजीत आहात? लावा फोन या नंबरवर आणि विचारा प्रश्न डॉक्टरांना

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 मे 2020

गर्भवती मातांची मानसिक स्थिती ढासळण्याची भिती व्यक्त केली जात असताना उपराजधानीतील स्त्री व प्रसूतीरोग तज्ज्ञांच्या संघटनेने पुढाकार घेत ईशा प्रकल्पाअंतर्गत नागपूर जिल्ह्‌यातील कोरोना प्रतिबंधित क्षेत्रासह ग्रामीण भागात गर्भवतींना भेडसावणाऱ्या समस्या दूर करण्यासाठी मदतीचा हात पुढे केला आहे.

नागपूर  : जिकडे बघावे तिकडे कोरोनाचा कहर सुरू आहे. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर कोरोनाचे भय आहे. अशातच आई बनण्याचे स्वप्न उराशी  बाळगणाऱ्या मातांच्या मनात कोरोनाची भिती बसली आहे. त्यामुळे गर्भवती मातांची मानसिक स्थिती ढासळण्याची भिती व्यक्त केली जात असताना उपराजधानीतील स्त्री व प्रसूतीरोग तज्ज्ञांच्या संघटनेने पुढाकार घेत ईशा प्रकल्पाअंतर्गत नागपूर जिल्ह्‌यातील कोरोना प्रतिबंधित क्षेत्रासह ग्रामीण भागात गर्भवतींना भेडसावणाऱ्या समस्या दूर करण्यासाठी मदतीचा हात पुढे केला आहे. मोबाईल क्रमांकावर संपर्क साधल्यास स्त्री व प्रसूती तज्ज्ञ नि:शुल्क वैद्यकीय सल्ला देणार आहेत. टाळेबंदी असल्यामुळे गर्भवती माता घराबाहेर निघू शकत नाहीत. गावखेड्यातील गर्भवती मातांपुढे दळणवळणाच्या समस्या आहेत. शहरातील अनेक वस्त्या सील केल्या आहेत. या वस्तीमध्ये प्रवेश करणे कठिण आहे. नागरिकांना बाहेर निघणे शक्‍य नसते. प्रशासनाने घालून दिलेल्या मर्यादा पार करता येत नाही. सार्वजनिक  वाहतुकीची साधने नसल्याने रुग्णालय गाठताना दमछाक होते. तेथे डॉक्‍टर उपलब्ध नसतात.  गर्भवतीं मातांच्या अशा अनेक तक्रारी आहेत. यावर मात करण्यासाठी स्त्री व प्रसूतीरोग तज्ज्ञांच्या संघटनेतर्फे "ईशा प्रकल्पा'ची घोषणा करण्यात आली. या उपक्रमाअंतर्गत 935662671 किंवा 9923310847 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा.

सविस्तर वाचा - कर्जमाफी झाली, आता पीककर्ज देण्यास बँकेची ना, काय आहे कारण...
खास गर्भवतींसाठी
कोरोनाचे संकट साऱ्यांसमोर आहे. परंतु पोटात बाळ वाढवणाऱ्या गर्भवती महिलांना सर्वाधिक त्रास सहन करावा लागत आहे. या महिलांना दर दहा पंधरा दिवसात रुग्णालयात तपासणीसाठी यावे लागते. परंतु अलिकडे लॉकडाउनमुळे रुग्णालय गाठणे शक्‍य नाही. त्यामुळे संघटनेने गर्भवतींना त्यांच्या घरीच त्यांना नि:शुल्क सल्ला देण्यासाठी हा उपक्रम सुरू केला आहे. याला ईशा प्रकल्प असे नाव दिले आहे. वर दिलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधून समस्या सांगायची आहे. तत्काळ त्यांना वैद्यकीय सल्ला देण्यात येईल.
डॉ. वैदेही मराठे, अध्यक्ष, स्त्री व प्रसूतीरोग संघटना, नागपूर.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Call gynaecologist, if any query