सकाळ इम्पॅक्ट ः सुपर स्पेशालिटीत सुरू झाल्या ह्रदयावरील शस्त्रक्रिया

केवल जीवनतारे
Thursday, 5 November 2020

वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे तत्कालीन सचिव संजय देशमुख यांच्या कार्यकाळात मेडिकल-सुपरमधील खासगी वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यांच्या विरोधात एक मोहीम उघडली होती. त्यात नागपूरच्या मेडिकल, मेयोतील डॉक्टरांची नावे होती.

नागपूर ः सुपर स्पेशालिटीतील हृदयशल्य चिकित्सक सहयोगी प्राध्यापक डॉ. सतीश दास तीन ऑक्टोबरला रुजू झाले. मात्र त्या दिवसापासून एकाही व्यक्तीच्या हृदयावर सुपरमध्ये शस्त्रक्रिया झाली नसल्याचे वृत्त दै. सकाळने प्रकाशित केले होते. या वृत्ताची दखल घेण्यात आली असून, येथील ह्रदयरोग विभागात नियमितपणे शस्त्रक्रिया सुरू झाल्या असल्याची माहिती पुढे आली आहे.

वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे तत्कालीन सचिव संजय देशमुख यांच्या कार्यकाळात मेडिकल-सुपरमधील खासगी वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यांच्या विरोधात एक मोहीम उघडली होती. त्यात नागपूरच्या मेडिकल, मेयोतील डॉक्टरांची नावे होती. डॉ. दास यांचेही नाव त्यामध्ये होते. त्यावेळी डॉ. अभिमन्यू निसवाडे मेडिकलचे अधिष्ठाता होते. 

हेही वाचा - Success Story: तरुणीने फुलवला मशरूमचा मळा; कृषी शाखेच्या विद्यार्थिनीचा नाविन्यपूर्ण उपक्रम 
 

या प्रकरणात डॉ. दास यांची बदली कोल्हापुरात झाली. मात्र ते तेथे रुजू झाले नाही. दरम्यान डॉ. निसवाडे यांनी सुपरमधील हृदय शल्यक्रिया विभागातील डीएम अभ्यासक्रमाला फटका बसू नये म्हणून तत्काळ डॉ. निकुंज पवार यांची नियुक्ती केली. यानंतर या विभागात बऱ्यापैकी संगीत खुर्चीचा खेळ रंगला होता. डॉ. दास यांनी सुपरच्या समोरच समांतर बाह्यरुग्ण विभाग थाटला होता. 

अडीच वर्षांनंतर डॉ. दास सुपर स्पेशालिटीत रुजू झाले. मात्र २० दिवसांनंतरही एकही शस्त्रक्रिया झाली नसल्याची बाब दै. सकाळने उघड केली. यानंतर मात्र या विभागात हृदयशल्यक्रिया विभागात शस्त्रक्रिया करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आणि सुपरच्या ह्दय शल्यक्रिया विभागात नियमित शस्त्रक्रिया सुरू झाल्या असल्याची माहिती सुपरचे विशेष कार्यअधिकारी डॉ. मिलिंद फुलपाटील यांनी दिली.

प्रतीक्षा यादी वाढली?

महात्मा फुले जीवनदायी योजनांसह इतर शासकीय योजनांमधून येथे गरिबांच्या हृदयावर शस्त्रक्रिया होतात. मात्र, २० दिवसांपासून सुपरच्या हृदय शल्यक्रिया विभागात एकही शस्त्रक्रिया झाली नाही. यामुळे येथील ह्रदयरोग विभागात शस्त्रिक्रियेची प्रतीक्षा यादी वाढली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, यासंदर्भात माहिती घेतल्यानंतर सांगता येईल, असे विशेष कार्य अधिकारी डॉ. फुलपाटील म्हणाले.

शस्त्रक्रिया होत आहेत
डॉ. दास सुपरमध्ये रुजू झाले आहेत. तांत्रिक कारणामुळे हृदयावर शल्यक्रिया झाल्या नाही, मात्र लगेच शस्त्रक्रियेला सुरुवात झाली आहे. बऱ्यापैकी शस्त्रक्रिया होत आहेत.
-डॉ. मिलिंद फुलपाटील, विशेष कार्य अधिकारी, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, नागपूर. 

संपादन  : अतुल मांगे  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Cardiac surgery started at Super Specialty Hospital