करोनाचे नागपुरात पाऊल तर नव्हे? चाचणीसाठी व्यापारी मेडिकलमध्येI

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 31 जानेवारी 2020

करोना विषाणूने भारतात शिरकाव केला असून पहिला रुग्ण हा केरळमध्ये आढळल्याची चर्चा आहे. मुंबईत संशयित करोना विषाणूग्रस्तांची संख्या पुढे येत आहे. या पार्श्‍वभूमीवर नागपूरमध्ये खबरदारीच्या उपायांना प्राधान्य देण्यात येत आहे.

नागपूर : चीनमधील प्रवासाची पार्श्‍वभूमी असल्याने उपराजधानीतील एक व्यापारी मनातून धास्तावला. त्यांनी पुढील धोका टाळण्यासाठी करोना विषाणूची चाचणी करण्यासाठी स्वतः शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) भरती झाला. मेडिकलमधील डॉक्‍टरांनी तत्काळ त्यांच्या घशातील नमुन्यांसह रक्ताचेही नमुने घेतले. राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेकडे पुण्यात तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.

करोना विषाणूने भारतात शिरकाव केला असून पहिला रुग्ण हा केरळमध्ये आढळल्याची चर्चा आहे. मुंबईत संशयित करोना विषाणूग्रस्तांची संख्या पुढे येत आहे. या पार्श्‍वभूमीवर नागपूरमध्ये खबरदारीच्या उपायांना प्राधान्य देण्यात येत आहे. मेडिकलमध्ये 7 खाटांचा विशेष कक्ष उभारण्यात आला. तर 30 खाटांचा आयसोलेशन वॉर्ड टीबी वॉर्ड परिसरात तयार करण्यात आला आहे. गुरुवारी 32 वर्षीय व्यापारी यांनी मेडिकलचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे यांच्याशी संपर्क साधला व मेडिकलमध्ये पोहोचले. त्यांना तत्काळ विशेष कक्षात दाखल करण्यात आले.

सविस्तर वाचा - सायबर फिशिंग : जामताऱ्याच्या हिटलिस्टवर "महाराष्ट्र'

हे व्यापारी चीनमध्ये वारंवार ऑटोमोबाईलशी संबंधित साहित्य खरेदी-विक्रीचा व्यवसाय करतात. चीनमध्ये वारंवार प्रवास होतो. यामुळे त्यांच्या मनात संशयाने घर केले आणि त्यातूनच त्यांनी स्वतःची चाचणी करून घेण्यासाठी मेडिकलमध्ये दाखल झाल्याची माहिती पुढे आली आहे. मागील 14 दिवसांत चीन प्रवासाची पार्श्‍वभूमी नसल्याने दाखल झालेले व्यापारी यांना करोना विषाणूशी संबंधित कोणतीही संबंधित लक्षणे नसल्याचे स्पष्ट झाले. परंतु, विशेष काळजी घेण्यासाठी त्यांनी ही तपासणी केल्याचे सांगितले. मेडिकलच्या मेडिसिन विभागात डॉ. विनोद खंडाईत यांच्यासह चार डॉक्‍टरांचे पथक सज्ज आहे.

केवळ चीन प्रवासाची पार्श्‍वभूमी
करोना विषाणूचा संशयित रुग्ण नाही. केवळ चीन प्रवासाची पार्श्‍वभूमी असल्यामुळे संबंधित व्यक्तीने खबरदारीचा उपाय म्हणून त्यांच्या स्वतःच्या समाधानासाठी चाचणी करून घेण्याचा निर्णय घेतला आहे. अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा यांच्या मार्गदर्शनात तयार करण्यात आलेल्या विशेष कक्षात त्यांना सध्या दाखल केले आहे.
-डॉ. अविनाश गावंडे, वैद्यकीय अधीक्षक, मेडिकल.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Is carona in Nagpur? Businessman in Medical for test!