esakal | पंतप्रधानांचा वाढदिवस जल्लोषात नव्हे तर सेवाकार्याने साजरा करा, कोणत्या माजी मंत्र्यांनी केली ही मागणी
sakal

बोलून बातमी शोधा

Celebrate the Prime Minister's birthday with service : Chandrasekhar Bavankule

सेवा सप्ताहात कोरोना रुग्णांना प्लाझ्मा दान, रक्तदान करण्यात येणार आहे. दिव्यांगांना, आर्थिक दुर्बल घटकातील लोकांना मदत केली जाईल. प्रत्येक मतदान केंद्रावर भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते सेवाकार्य करणार आहेत.

पंतप्रधानांचा वाढदिवस जल्लोषात नव्हे तर सेवाकार्याने साजरा करा, कोणत्या माजी मंत्र्यांनी केली ही मागणी

sakal_logo
By
अतुल मेहेरे

नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस जल्लोषात फटाके फोडून नव्हे, तर सेवा सप्ताहात सेवाकार्य करून साजरा करण्यात येणार आहे, अशी माहिती माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.

बावनकुळे म्हणाले, सेवा सप्ताहात कोरोना रुग्णांना प्लाझ्मा दान, रक्तदान करण्यात येणार आहे. दिव्यांगांना, आर्थिक दुर्बल घटकातील लोकांना मदत केली जाईल. प्रत्येक मतदान केंद्रावर भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते सेवाकार्य करणार आहेत. कोरोनाच्या लढ्यात ज्याप्रकारे काम केले आहे, त्याप्रमाणे या सप्ताहात कार्यकर्ते काम करतील. १४ ते २० सप्टेंबर या काळात प्रत्येक मतदान केंद्रावर गावागावांमध्ये सेवाकार्य होणार आहे. 

१७ सप्टेंबरला ६.४५ वाजता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी येथील जितेंद्रनाथ महाराजांच्या ओजस्वी वाणीतून मोदींच्या जीवनचरित्रावर आभासी रॅली आयोजित केली आहे. यामध्ये सर्व मतदान केंद्रांवर लिंकच्या माध्यमातून लोकं जोडले जाणार आहे.

क्लिक करा - "नागपूरच्या नावाने कानाला खडा"! माजी आयुक्त तुकाराम मुंढे म्हणतात पुन्हा कधी येणार नाही; वाचा त्यांची खास मुलाखत
 

मोदींनी केलेले कार्य समाजातील प्रत्येक घटकासमोर ठेवण्याचा प्रयत्न या रॅलीच्या माध्यमातून केला जाणार आहे. २५ सप्टेंबरला दीनदयाल उपाध्याय यांची जयंती आहे. सर्व बूथ आणि मतदान केंद्रांवर काम करणारे कार्यकर्ते आपल्या घरी आणि कार्यालयांत ही जयंती साजरी करणार आहेत. महाराष्ट्रातील हजारो कार्यकर्ते आपापल्या घरांवर आणि कार्यालयांवर भाजपचे झेंडे फडकवणार आहेत. २५ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर महात्मा गांधीजींच्या जयंती दिवसापर्यंत हा सेवासप्ताह, आत्मनिर्भर भारताचा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.

कोरोनाच्या संकटात लढण्यासाठी त्यांनी २० लाख कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले आहे. केंद्र, राज्यातील प्रत्येक योजनेच्या माध्यमातून उद्योगपतींपासून तर लहान व्यावसायिकांपर्यंत आणि शेतकरी, शेतमजुरांपर्यंत छोट्या छोट्या दुकानदारापर्यंत या पॅकेजच्या माध्यमातून देशाला मजबूत करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. कोरोनाच्या संकटाशी दोन हात करण्यासाठी उचललेले हे मोठे पाऊल आहे असेही बावनकुळे म्हणाले.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रसाद नड्डा, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आवाहनाला या सेवा सप्ताहात सर्वांनी सहकार्य करावे आणि मजबूत भारताचं स्वप्न साकार करण्याकरिता साथ द्यावी, असे आवाहन माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले आहे. 


संपादन : अतुल मांगे