चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावरील नाराजी दूर, प्रदेश कार्यकारिणीत मिळाली ही मोठी जबाबदारी... 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 जुलै 2020

ऊर्जामंत्री असताना बावनकुळे यांच्या मंत्रिमंडळ आणि पक्षात चांगलाच बोलबाला होता. ऊर्जावान नेता म्हणून त्यांच्या कार्यक्षमतेचीही प्रशंसा केली जात होती. नागपूरसह भंडारा व त्यानंतर वर्धा जिल्ह्याचे पालकत्त्व त्यांच्यावर सोपविले होते.

नागपूर : कामठी विधानसभेची उमेदवारी नाकारणाऱ्या भाजपने माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना प्रदेश कार्यकारिणीत स्थान देऊन महामंत्रिपदाची जबाबदारी सोपविली आहे. संघटनेत अध्यक्षानंतर महामंत्र्याला महत्त्वाचे स्थान आहे. विशेष म्हणजे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आणि माजी मंत्री विनोद तावडे यांना निमंत्रितांमध्ये बसवून त्यांच्यावरची नाराजी पक्षाने कायम ठेवल्याचे बोलले जाते. 

ऊर्जामंत्री असताना बावनकुळे यांच्या मंत्रिमंडळ आणि पक्षात चांगलाच बोलबाला होता. ऊर्जावान नेता म्हणून त्यांच्या कार्यक्षमतेचीही प्रशंसा केली जात होती. नागपूरसह भंडारा व त्यानंतर वर्धा जिल्ह्याचे पालकत्त्व त्यांच्यावर सोपविले होते. मात्र, अचानक वरिष्ठांची त्यांच्यावर खप्पामर्जी झाली. तीन वेळा निवडून आल्यानंतरही कामठीतून त्यांना उमेदवारी देण्यास नकार दिला. मात्र, बावनकुळे यांनी संयम बाळगला. 

एकेकाला ड्युटीवरून हाकलून देईन; मला समजता काय, अशी धमकी देणारा 'तो' आहे तरी कोण, वाचा...
 

पक्षाच्या विरोधात कुठलेही भाष्य केले नाही. मध्यंतरी शिवसेना व राष्ट्रवादीने त्यांना ऑफर दिल्याची चर्चा होती. त्यानंतर झालेल्या विधान परिषदेत उमेदवारी देऊन बावनकुळे यांचे पुनर्वसन केले जाईल, असेही तर्क लावले जात होते. आता कार्यकारिणीत महत्त्वाचे स्थान देऊन बावनकुळे यांच्यावरची नाराजी दूर झाल्याचे संकेत भाजपने दिले आहे. 

 

कार्यकारिणीत नागपूरकर 

प्रदेश कार्यकारिणीत माजी महापौर अर्चना डेहनकर मंत्री, ऍड. धर्मपाल मेश्राम कोषाध्यक्ष, माजी महापौर कल्पना पांडे शिक्षक सेल, मिलिंद कानडे आर्थिक, श्‍याम चांदेकर विनकर, जयसिंग चव्हाण दिव्यांग सेल, संजय भेंडे सहकार, विश्‍वास पाठक मीडिया प्रमुख (मुंबई), संजय फांजे प्रदेश कार्यालय सहमंत्री यांना स्थान देण्यात आले आहे. 

 

अधिक ऊर्जेने काम करीन 
भाजपने सोपवलेली जबाबदारी अधिक ऊर्जा देणारी आहे. पक्षाला अधिकाधिक लोकाभिमुख आणि कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी पदाचा वापर करू.  पक्षाने आजपर्यंत सोपविलेल्या जबाबदारीचे प्रामाणिकपणे पालन केले. माझ्यासारख्या असंख्य सामान्य कार्यकर्त्यांना या पक्षाने मोठे केले, याच जाणिवेतून मी माझ्या नव्या जबाबदारीचे अत्यंत निष्ठेने पालन करीन.
चंद्रशेखर बावनकुळे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chandrasekhar Bavankule in the state executive, responsibility of General Secretary