एकेकाला ड्युटीवरून हाकलून देईन; मला समजता काय, अशी धमकी देणारा 'तो' आहे तरी कोण, वाचा...

सकाळ वृत्तसेवा
Friday, 3 July 2020

गेल्या एक ते दीड महिन्यापूर्वी रुग्णवाहिका वाहनचालकाला शस्त्र दाखवून जीवे मारण्याची धमकी देत असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले. यामुळे आम्हाला जबर मानसिक धक्का बसला आहे. यामुळे काही महिला रात्रीला ड्युटी करताना प्रचंड दहशतीखाली असतात. हा सगळा प्रकार वैद्यकीय अधिकारी डॉ. मिथुन घोलपे यांना सांगूनसुद्धा त्यांनी कानाडोळा केला.

जलालखेडा/मेंढला (जि.नागपूर) :  आरोग्य केंद्रातील सर्व कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करणे, मारहाण करण्याची धमकी देणे व ऍट्रॉसिटी ऍक्‍टमध्ये फसवण्याबाबत धमकी देणे, असा प्रकार कित्येक दिवसांपासून सुरू असून, अखेर सर्व कर्मचाऱ्यांनी त्रासून मंगळवारी (ता. 30 जून) जलालखेडा पोलिस ठाणे व ग्रामपंचायतकडे "त्या' व्यक्‍तीविषयी तक्रार दाखल केली.

अधिक वाचा : पत्नीला पडला प्रश्‍न, पतीचा मृत्यू नेमका झाला ? वाचा धक्‍कादायक प्रकार...

वारंवार देतो धमकी
प्राथमिक आरोग्य केंद्र मेंढला येथे 15 महिन्यांपासून अंशकालीन स्त्री परिचर म्हणून मेंढला गावातील शुभांगी विशाल ढोणे या कार्यरत आहेत. येथील कोणतेही शासकीय निवासस्थान त्यांना उपलब्ध नाही. तरी तिचा पती विशाल ढोणे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वसाहतीच्या परिसरात नेहमी येऊन शिवीगाळ करतो. त्याला वसाहतीतील लोकांनी हटकले असता, तो नेहमी मारण्याची धमकी देतो व मी तलाठी कार्यालय मेंढला येथे कर्मचारी आहे. तुम्हाला सर्वांना मी या पीएचसीमधून हाकलून देईन, तुम्ही जर माझी तक्रार कोणाला केली, तर मी तुम्हाला ऍट्रॉसिटीमध्ये फसवून टाकीन, अशी नेहमी धमकी देतो, असे कर्मचाऱ्यांनी सांगितले.

अधिक वाचा : मंत्रिमहोदय, तुम्हीच सांगा, केव्हा होईल लागवड, केव्हा येईल फळ, का म्हणताहेत शेतकरी असे...

कर्मचारी म्हणतात, आम्हाला मानसिक धक्‍का बसला
मंगळवारी आरोग्यसेविका चेतना आगरकर (उपकेंद्र खापा) या मासिक सभेकरिता प्राथमिक आरोग्य केंद्र मेंढला येथे आल्या असता, तिथे विशाल ढोणे आला व म्हणाला की, माझ्या पत्नीला कोणीही काम सांगायचे नाही. तिला काम सांगणारी तू कोण, मला विचारल्याशिवाय तू या दवाखान्यात कशी आली? तू इथून निघून जा. नाहीतर तुला ऍट्रॉसिटी ऍक्‍टमध्ये फसवून टाकीन, अशी धमकी दिली. विशाल ढोणे हा नेहमी शिवीगाळ करतो व जीवे मारण्याची धमकी देतो. तसेच गेल्या एक ते दीड महिन्यापूर्वी रुग्णवाहिका वाहनचालकाला शस्त्र दाखवून जीवे मारण्याची धमकी देत असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले. यामुळे आम्हाला जबर मानसिक धक्का बसला आहे. यामुळे काही महिला रात्रीला ड्युटी करताना प्रचंड दहशतीखाली असतात. हा सगळा प्रकार वैद्यकीय अधिकारी डॉ. मिथुन घोलपे यांना सांगूनसुद्धा त्यांनी कानाडोळा केला.

हेही वाचा : नोटांवर स्प्रे करताय...जरा थांबा

...तर आंदोलन करू !
विशाल ढोणे हा नेहमी प्रत्येक कर्मचाऱ्याला दबावामध्ये ठेवतो. जर हा संपूर्ण प्रकार थांबला नाही, तर संपूर्ण कर्मचारीवर्ग ग्रामपंचायत कार्यालयासमोर आंदोलन करून कामबंद करतील, असा इशारा तेथील सर्व कर्मचाऱ्यांनी दिला आहे. विशाल ढोणेविरुद्ध जलालखेडा पोलिस ठाण्यात तक्रार केली असून, या बाबतचे निवेदन ग्रामपंचायतीला दिले आहे. सरपंच वनिता चरपे यांना याबाबतचे निवेदन देतेवेळी आरोग्य सहायक सज्जन थूल, सुरेश सोनुले, आरोग्यसेविका चेतना आगरकर, खुशाली सावरकर, कल्पना अंबुलकर, जयश्री झाडे, अर्चना विधाते, प्रज्ञा शिरसाट, सविता आघाव, करुणा साहायिका हिवरकर, आरोग्यसेवक बाबा डब्रासे, मनोहर मडावी, राजरप्पू व वाहनचालक आशीष घोरसे उपस्थित होते.

ग्रामपंचायतमध्ये ठराव घेउ !
प्राथमिक आरोग्य केंद्र येथील सर्व कर्मचाऱ्यांनी निवेदन दिले असून, याबाबत योग्य ती कारवाई करण्यात येईल व दोषींवर ग्रामपंचायतीमध्ये ठराव घेऊन कारवाई करण्यात येईल.
-वनिता चरपे
सरपंच, ग्रामपंचायत मेंढला.

निश्‍चितच कारवाई करू
मी दोन दिवस रजेवर होतो. मी दवाखान्यामध्ये गेल्यावर सर्वांना बोलावून नेमका प्रकार काय झाला आहे, याची विचारणा केली. आता योग्य ती कारवाई करतो.
-डॉ. मिथुन घोलपे
वैद्यकीय अधिकारी, मेंढला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: I will remove one from duty