esakal | "छत्रपती' विजेता म्हणतो, खेळाडूला पुरस्कारापेक्षा नोकरीची गरज
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबई : तत्कालिन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या हस्ते शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार स्वीकारताना प्रवीण वहाले.

राज्याचा सर्वोच्च शिवछत्रपती पुरस्कारही त्याने पटकाविला. मात्र त्याउपरही प्रवीणला "स्पोर्टस कोट्या'तून नोकरी मिळाली नाही. त्यामुळे नाईलाजाने त्याला रोजंदारीची कामे करून परिवाराचे पालनपोषण करावे लागत आहे.

"छत्रपती' विजेता म्हणतो, खेळाडूला पुरस्कारापेक्षा नोकरीची गरज

sakal_logo
By
नरेंद्र चोरे

नागपूर : राष्ट्रीय आट्यापाट्या खेळाडू प्रवीण वहालेने दीड दशकाच्या काळात चौदाच्या वर राष्ट्रीय स्पर्धांमध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताना आठ सुवर्णपदके जिंकली. राज्याचा सर्वोच्च शिवछत्रपती पुरस्कारही त्याने पटकाविला. मात्र त्याउपरही प्रवीणला "स्पोर्टस कोट्या'तून नोकरी मिळाली नाही. त्यामुळे नाईलाजाने त्याला रोजंदारीची कामे करून परिवाराचे पालनपोषण करावे लागत आहे.

माझ्यासारख्या गरीब व्यक्‍तीला पुरस्कार नव्हे नोकरीची खरी गरज आहे, अशा शब्दांत प्रवीणने आपली व्यथा बोलून दाखविली आहे. चूनाभट्‌टी परिसरात राहणारा प्रवीण आट्यापाट्यासोबत खो-खोपटूही आहे. जवळपास दीड दशकांच्या कारकिर्दीत त्याने सबज्युनियर, ज्युनियर व सिनियर गटात 15 च्यावर राष्ट्रीय स्पर्धांमध्ये पदके जिंकली. क्रीडा क्षेत्रात दिलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्‌दल 2005-06 मध्ये तत्कालिन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या हस्ते त्याचा शिवछत्रपती पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. त्या आधारावर प्रवीणने नोकरीसाठी "स्पोर्टस कोट्या'तून रेल्वे, बॅंक, मनपासह ठिकठिकाणी अर्ज केलेत. पण कुठेही नोकरी न मिळाल्याने अखेर पोट भरण्यासाठी त्याला खासगी कामे करावी लागली.

वाचा - राज्य शासनाच्या शाबासकीनंतरही एकलव्य पुरस्कार विजेत्याच्या नशिबी ई-रिक्षा

42 वर्षीय प्रवीण इलेक्‍ट्रिक, नळ फिटिंग व पेटिंगची कामे करून उदरनिर्वाह करीत आहे. कधी दोनशे किंवा तिनशे, तर कधी पाचशे. कधीकधी तर एका रुपयाचीही कमाई होत नसल्याचे दु:ख त्याने बोलून दाखविले. प्रवीण म्हणतो, शासनाने मला छत्रपती पुरस्कार देऊन माझा यथोचित सन्मान केला. मात्र ती ट्रॉफी घरात धुळखात पडून आहे. त्याऐवजी एखादी चपराश्‍याची नोकरी दिली असती, तरीही मला अधिक आनंद झाला असता. दहा बाय दाहाच्या खोलीच्या राहणाऱ्या प्रवीणला पत्नी, मुलगी व म्हातारी आई आहे. घरात तो एकटाच कमावता आहे. लॉकडाउनमुळे गेल्या दोन-अडीच महिन्यांपासून कामे बंद आहेत.

आणखी वाचा - उपासमारीची वेळ आलेल्या या खेळाडूंकडे  क्रीडामंत्री देणार का लक्ष?

नगरसेवक मुन्ना यादव यांच्याकडून दररोज येणाऱ्या भोजनदानावरच सध्या परिवाराचा उदरनिर्वाह सुरू आहे. बारावीपर्यंत शिकलेल्या प्रवीणने वयाची बेचाळीशी गाठली आहे. सरकारी नोकरीसाठी त्याच्याकडे केवळ दोन-तीन वर्षे शिल्लक आहेत. त्यामुळे नोकरीसाठी तो आता शेवटचा प्रयत्न करणार आहे. लवकरच क्रीडामंत्री सुनील केदार यांना भेटून आपल्या व्यथा मांडणार असल्याचे त्याने सांगितले. सांगली, साताऱ्याकडे छत्रपती पुरस्कार विजेत्यांना नगर परिषदांमध्ये थेट नोकऱ्या देण्यात आल्या. त्या आधारावर महापौरांनी माझाही गांभीर्याने विचार करावा, अशी विनंती प्रवीणने "सकाळ'मार्फत शासनाकडे केली आहे.

प्रवीणने माझ्या मार्गदर्शनात आट्यापाट्याचे प्रशिक्षण घेतले. विपरित परिस्थिती असूनही तो राष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचला. दुर्दैवाने चांगल्या कामगिरीचे त्याला फळ मिळाले नाही. नोकरीसाठी अथक प्रयत्न करूनही शासनाने त्याची सदैव उपेक्षा केली. खेळात करिअर करण्यास इच्छूक युवा खेळाडूंसाठी ही निश्‍चितच वाईट गोष्ट आहे.

दीपक कविश्‍वर, आट्यापाट्या प्रशिक्षक