उपासमारीची वेळ आलेल्या या खेळाडूंकडे क्रीडामंत्री देणार का लक्ष?

 जिल्हा क्रीडाधिकारी अविनाश पुंड यांच्यासोबत शिष्टमंडळातील सदस्य.
जिल्हा क्रीडाधिकारी अविनाश पुंड यांच्यासोबत शिष्टमंडळातील सदस्य.

नागपूर : लॉकडाउनमुळे शहरातील अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू आर्थिक अडचणीत आहेत. त्यांची उपासमार होत आहे. या संकटकाळात गरजू खेळाडूंना राज्य शासनाने भरीव आर्थिक मदत द्यावी, अशी आग्रही विनंती आजी-माजी खेळाडूंनी क्रीडामंत्री व जिल्हा क्रीडाधिकाऱ्यांकडे केली आहे.


मनपाचे क्रीडा अधिकारी व छत्रपती पुरस्कारविजेते पीयूष आंबुलकर आणि अर्जून क्रीडा पुरस्कारविजेते विजय मुनिश्‍वर यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाने मंगळवारी क्रीडा व युवककल्याणमंत्री सुनील केदार व जिल्हा क्रीडाधिकारी अविनाश पुंड यांची भेट घेऊन त्यांना मागण्यांचे निवेदन सोपविले. निवेदनात ते म्हणाले, जिल्हा क्रीडाधिकाऱ्यांतर्फे सोमवारी आंतरराष्ट्रीय महिला धावपटू ज्योती चौहानला उदरनिर्वाह व पोषक आहारासाठी तातडीने 25 हजारांची आर्थिक मदत देण्यात आली. ज्योतीची एकूण परिस्थिती लक्षात घेता, तिला मदत केली ही बाब स्वागतार्ह आहे. मात्र, शहरात इतरही अनेक गोरगरीब खेळाडू आहेत, ज्यांचे खायचे सध्या वांधे आहेत. अनेकांना नोकऱ्या नाहीत. लॉकडाउनमुळे त्यांचे आईवडील बेरोजगार झाले आहेत.

स्वयंसेवी संघटना किंवा रेशनच्या अन्नधान्यावरच बहुतांश खेळाडू व त्यांच्या परिवाराची सध्या उपजीविका सुरू आहे. शासनाने त्यांचाही गांभीर्याने विचार करून, त्यांना नियमानुसार तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी एकमुखी मागणी शिष्टमंडळाने क्रीडामंत्री व जिल्हा क्रीडाधिकाऱ्यांकडे केली. क्रीडामंत्र्यांनी खेळाडूंची विचारपूस करून मागण्यांचे निवेदन जिल्हा क्रीडाधिकाऱ्यांकडे सोपविले. विदर्भाचे क्रीडामंत्री विदर्भातील गोरगरीब खेळाडूंना न्याय मिळवून देतात काय, याकडे आता साऱ्यांचे लक्ष लागले आहे.


दैनिक "सकाळ'ने ज्योती चौहान, प्राजक्‍ता गोडबोले, निकिता राऊत, सायली वाघमारे, जयश्री बोरेकर, आकांक्षा सौदीया, विदिता मेश्राम व आर्या कोरे या धावपटूंसह दिव्यांग तिरंदाज संदीप गवई व अभिषेक ठवरे तसेच आंतरराष्ट्रीय ज्युदोपटू शुभांगी राऊत यांच्या अडचणीसंदर्भात वृत्तमालिका प्रकाशित करून त्यांच्या समस्यांची शासनाला जाणीव करून दिली आहे. वरील खेळाडूंसह रोशनी रिनके, कमलेश लांजेवार व इतरही अनेक खेळाडू हलाखीच्या स्थितीत जगत आहेत. यातील अनेकांनी नोकरीसाठी अर्ज करून आठ वर्षांपेक्षा अधिक काळ लोटूनही अद्याप त्यांच्या अर्जावर राज्य शासनाने विचार केलेला नाही, हे उल्लेखनीय. शिष्टमंडळात संदीप गवई, सचिन माथने, प्रवीण सोरते, रोशनी रिनके, अभिषेक ठवरे, कमलेश ठवरे, ज्योती चौहान, प्राजक्‍ता गोडबोले, निकिता राऊत, प्रणाली राऊत यांचा समावेश होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com