आई म्हणून जन्मदात्रीने आपले कर्तव्य पार पाडले; मात्र, मुलांनी सोडले वाऱ्यावर!

नरेंद्र चोरे
Wednesday, 2 December 2020

लॉकडाऊन काळात त्या पुन्हा आपल्या घरी गेल्या. मात्र, भांडणे दिवसेंदिवस वाढत गेल्याने तिला पुन्हा घर सोडावे लागले. भुकेने व्याकूळ असताना एकेदिवशी सामाजिक कार्यकर्त्या ज्योती मुदलियार यांच्या दृष्टीस त्या पडल्या. त्यांनी तिला जेवू-खाऊ घातले. आपल्या घरी आश्रय दिला. मालू यांनी आपली आपबिती त्यांना सांगितली.

नागपूर : तिने मुलांना जन्म दिला... पालनपोषण करून लहानाचे मोठे केले... त्या मोबदल्यात मुलांनी म्हातारपणी आपला सांभाळ करावा, एवढीच माफक अपेक्षा तिने केली होती... मात्र, स्वार्थी व बेफिकीर मुलांनी तिला घरातून हाकलून रस्त्यावर सोडून दिले... कोरोनाच्या काळात गेल्या काही दिवसांपासून तिची भटकंती सुरू आहे...

सावित्रीनगर (बगडगंज) येथे राहणाऱ्या ७३ वर्षीय मालू बेलसरे यांना दोन मुले व एक मुलगी आहे. पतीचे निधन झाल्यानंतर मुलांची सर्व जबाबदारी घेत त्यांनी आपल्या परीने पालनपोषण केले. लग्न करून त्यांना आपल्या पायावर उभे केले. स्वतःचे घर धाकट्याच्या स्वाधीन केले. थोरल्यालाही हिंगणा परिसरात नवीन फ्लॅट विकत घेऊन दिला. आई म्हणून जन्मदात्रीने आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडले.

सविस्तर वाचा - शेतजमिनीला मोल येताच नात्यात कटुता, एक स्वाक्षरी लाखोंची

मात्र, मुलांनी तिच्या कष्टाची व त्यागाची जाण ठेवली नाही. धाकटा मुलगा, सून व नातवंडांसोबत वारंवार खटके उडाल्याने कंटाळून त्यांनी घर सोडले. चार-सहा महिने इकडून तिकडे भटकंती केल्यानंतर अभ्यंकरनगरात राहणाऱ्या एका घरी आश्रय घेतला. दिवसा मालिशचे काम करून त्यातून मिळणाऱ्या पैशाने पोट भरायची आणि रात्री तिथेच झोपी जात असत...

लॉकडाऊन काळात त्या पुन्हा आपल्या घरी गेल्या. मात्र, भांडणे दिवसेंदिवस वाढत गेल्याने तिला पुन्हा घर सोडावे लागले. भुकेने व्याकूळ असताना एकेदिवशी सामाजिक कार्यकर्त्या ज्योती मुदलियार यांच्या दृष्टीस त्या पडल्या. त्यांनी तिला जेवू-खाऊ घातले. आपल्या घरी आश्रय दिला. मालू यांनी आपली आपबिती त्यांना सांगितली.

ज्योती यांनी पुढाकार घेत मुलाला फोन करून आईला घेऊन जाण्याची विनंती केली. मात्र, मुलाने याकडे दुर्लक्ष केले. त्यांनी शंभर नंबरवरही संपर्क साधला. मात्र, कुणाकडूनही प्रतिसाद मिळाला नाही. आता तर मुलांचेही फोन ‘स्वीच्ड ऑफ’ असल्याचे ज्योती यांनी सांगितले.

क्लिक करा - War and Peace' : आत्महत्येच्या काही तासांपूर्वी डॉ. शीतल आमटेंचे ट्विट; नेमके काय सांगायचे होते 'बाबां'च्या नातीला?

घरच्यांनी दूर लोटल्याने मालू दुःखी आहेत. ते आपल्याला मारपीट, मुजोरी, शिवीगाळ व ठार मारण्याची धमकी देतात, असा त्यांचा आरोप आहे. शिवाय किरायेदारावरही रोष दिसून आला. तिनेच मुलाला व सुनेला भडकवल्याचे मालू यांचे म्हणणे आहे.

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The children made the mother homeless read full story