
नागपूर : कोरोनाच्या लॉकडाऊन काळात आणिबाणीची परिस्थिती निर्माण झाली आहे. अंगणवाडी बंद आहेत. यामुळे बालकांच्या, स्तनदा मातांपर्यंत पोषण आहार पोहोचणे कठिण झाले. यामुळे चिमुकल्यांसह स्तनदा मातांना कुपोषणाचा विळखा पडण्याची शक्यता निर्माण झाली. यावर पर्यायी व्यवस्था म्हणून घरपोच खाद्यपदार्थ पोहोचवण्याची सोय राज्य शासनाने केली. शहरी व ग्रामीण भागातील अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून घरोघरी किराणा पोहचवण्यास सुरुवात झाली. मात्र, टिमकी येथील अंगणवाडीत मागील तीन महिन्यांपासून हा किराणा पोहचला नसल्याचे उघडकीस आले आहे.
एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून घरोघरी पोषण आहार पोहोचवण्यात येत आहे. विशेष असे की, गावखेड्यातील दुर्गम भागात विविध अडचणींवर मात करीत अंगणवाडी सेविका घरोघरी खाद्यपदार्थ पोहोचवत आहेत. तर शहरातील स्थलांतरित मजुरांच्या अपत्यांचीही काळजी घेण्यासाठी आलेले खाद्यपदार्थ पोहचवण्याचे आव्हान कोरोना काळात माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेत अंगणवाडी सेविका आणि मदतनीस पेलवत आहेत. मोलाची कामगिरी बजावणाऱ्या अंगणवाडी सेविका, मदतनीसांचे कौतुक करावेच लागेल. लाभार्थींना शिशू तसेच स्तनदा मातांच्या घरी दर महिन्याला २ किलो गहू, १ किलो मुगडाळ, १ किलो चवळी, १ किलो मटकी, १ किलो मसूर डाळ, ५०० ग्रॅम तेल, २५० ग्रॅम तिखट, २५० ग्रॅम हळद, ५०० ग्रॅम मीठ इत्यादी खाद्यपदार्थ पोहचवण्याची जबाबदारी पार पाडित असताना टिमकी परिसरातील अंगणवाडीमध्ये ३ महिन्यांपासून खाद्यपदार्थ पोहोचले नाही. अंगणवाडीत येणाऱ्या चिमकुल्यांच्या पालकांनी ही तक्रार अंगणवाडीत दिली आहे. यासंदर्भात अधिक माहिती घेण्यासाठी येथील अंगणवाडी सेविकेसोबत संपर्क साधला, परंतु संपर्क होऊ शकला नाही.
शहरी, ग्रामीण भागातील बालक, स्तनदा माता कुपोषित राहू नये, या उदात्त हेतूपुर्तीसाठी एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत ० ते ६ वर्ष वयोगटातील बालके तसेच स्तनदा माता यांना अंगणवाडी केंद्रातून आहार देण्यात येतो. कोरोना काळ असल्यामुळे संसर्गाची भीती लक्षात घेत किराणा माल घरोघरी दरमहा वितरित करण्यात येतो. मात्र, टिमकीतील अंगणवाडीत खाद्यपदार्थ पोहोचत नाही. हे खाद्यपदार्थ कुठे जातात, याची चौकशी व्हावी.
-दिपक साने, सामाजिक कार्यकर्ते, नागपूर.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.