पिण्याच्या पाण्यासाठी या गावचे नागरिक घेताहेत शहराकडे धाव!

नरेंद्र चोरे
Sunday, 20 September 2020

गोधनी गाव नागपूर शहराला लागून आहे. काही वर्षांपासून या परिसराचा झपाट्याने विकास होत आहे. मात्र, त्या तुलनेत सोयीसुविधा मिळत नसल्याचे येथील नागरिकांचे म्हणणे आहे. विशेषतः पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या जाणवत आहे. गावात नळ आहेत. मात्र, त्याचे कोणतेही निश्चित वेळापत्रक नाही. अनेक भागांत आठवड्यातून दोनच वेळा नळाला पाणी येते.

नागपूर  : गोधनीवासी दरवर्षी प्रामाणिकपणे नियमित टॅक्स भरतात. त्या मोबदल्यात त्यांना केवळ पाणी, रस्ते, वीज यासारख्या मूलभूत सोयी हव्या आहेत. मात्र, प्रशासन त्यांची ही माफक अपेक्षाही पूर्ण करीत नसल्याचे निराशाजनक चित्र सध्या गोधनीत दिसून येत आहे. या परिसरात तब्बल तीन ते चार दिवसांनी नळ येत असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी असून, पिण्याच्या पाण्यासाठी शहराकडे धाव घ्यावी लागत आहे. 
गोधनी गाव नागपूर शहराला लागून आहे. काही वर्षांपासून या परिसराचा झपाट्याने विकास होत आहे. मात्र, त्या तुलनेत सोयीसुविधा मिळत नसल्याचे येथील नागरिकांचे म्हणणे आहे. विशेषतः पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या जाणवत आहे. गावात नळ आहेत. मात्र, त्याचे कोणतेही निश्चित वेळापत्रक नाही. अनेक भागांत आठवड्यातून दोनच वेळा नळाला पाणी येते. आणि तेही कधी सकाळी, कधी दुपारी तर कधी सायंकाळी. त्यामुळे हातची सर्व कामे सोडून महिला व पुरुषांना दिवसभर नळाच्या प्रतीक्षेत राहावे लागते. उल्लेखनीय म्हणजे, बहुतांश वेळा नळाला गढूळ पाणी येते. या भागांत आजार पसरल्यास याला जबाबदार कोण, असा प्रश्न यानिमित्ताने विचारला जात आहे. 

 

हेही वाचा : नागपूर जिल्ह्यात तयार होणार ऑलिंपिक दर्जाचे खेळाडू

 

वाहनांवरून नेतात पाणी 

तहान भागविण्यासाठी येथील अनेकांना नाइलाजाने शहराकडे धाव घ्यावी लागत आहे. दररोज गोधनीतील असंख्य नागरिक मुलाबाळांसह पायदळ, सायकल किंवा दुचाकी वाहनांवर पाण्याचे भांडे घेऊन पाणी डोहारताना दिसतात. प्रशासनाने आठवड्यातून किमान चारवेळा नळ सोडावे. त्याच्या नियमित वेळा असाव्यात तसेच पाणी स्वच्छ असावे, अशी येथील नागरिकांची मागणी आहे.  

संपादन : मेघराज मेश्राम


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Citizens of Godhani village are rushing to the City for Drinking Water!