मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा म्हणतात, समन्वयातून तयार व्हावा शहराच्या आरोग्याचा अजेंडा

केवल जीवनतारे
Sunday, 18 October 2020

सध्या कोविड सेंटर आहे. स्पाईन केअर सेंटर, लंग्ज इन्स्टिटय़ूट, सिकलसेल एक्सलेंस सेंटर, स्वतंत्र कॅन्सर रुग्णालयासह इतरही काही संस्था प्रस्तावित आहेत. याशिवाय श्वसन रोग विभागाचे अत्याधुनिकीकरण, मेडिकलशी संलग्न नर्सिंग कॉलेजमध्ये एमएससी नर्सिंग, व्यवसायोपचार आणि भौतिकोपचार महाविद्यालयाचे अत्याधुनिकरण करण्यात येणार आहे.

नागपूर : राज्यात कोरोनाचे संकट येताच याचा सामना करण्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल)चे अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा यांनी राज्यात वैद्यकीय शिक्षण विभागात प्रथम कोविड हॉस्पिटल उभारण्यात आघाडी घेतली. मात्र कोरोना कमी होत असल्याचे चित्र दिसत असताना स्वेच्छानिवृत्तीचा अर्ज वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाकडे सादर केला आहे. या पार्श्वभूमीवर त्यांच्याशी साधलेला संवाद. 

प्रश्न :दीड वर्षांतच स्वेच्छा निवृत्ती का घेत आहात? 
उत्तर : अधिष्ठाता पदाचा भार सांभाळल्यानंतर लगेच वृत्तपत्रांशी बोलताना "डॉक्‍टरांनी माणूस बनायला हवं‘ हा संदेश मी दिला होता. कोरोनाच्या काळात मेडिकलमधील प्रत्येक डॉक्टर माणूस बनला आहे. आतापर्यंत मेडिकलमध्ये ३० हजारांपेक्षा अधिक कोरोनाबाधितांवर उपचार केले. माझ्या स्वेच्छा निवृत्तीचा निर्णय हा व्यक्तिगत आहे. वैद्यकीय कारणांमुळे अर्ज सादर केला आहे. 

हेही वाचा - चार एकरात 51 क्विंटल सोयाबीन, विधवा महिला अलिशान बी. ने घेतले विक्रमी उत्पादन

प्रश्न : हृदय, यकृत प्रत्यारोपणाचा प्रकल्प थंड बस्त्यात आहे का? 
उत्तर : राज्य शासनाकडून उपलब्ध सोयी-सुविधेनुसार रुग्णांना चांगल्या सोयी दिल्या जात आहेत. सुपर स्पेशालिटीत महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून किडनी प्रत्यारोपण सुरू आहे. सत्तरपेक्षा अधिक किडनी प्रत्यारोपण झाले. सुपरला हृदय प्रत्यारोपण सुरू करण्यासाठी हार्ट फेल्युअर क्लिनिक सुरू करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. दुसऱ्या टप्प्यात हृदय प्रत्यारोपणासह, यकृत प्रत्यारोपण, श्वसनरोग युनिट उभारण्याची तयारी केली आहे. यासाठी मिळालेला जिल्हा विकास निधी हाफकिनकडे वळता केला आहे. आरोग्य विभागाकडून परवानगी येताच कामाला सुरुवात होईल. रोबोटिक सर्जरी युनिट लवकरच होईल. 

प्रश्न : विद्यार्थ्यांच्या वर्गासाठी तयार केलेल्या हॉटलाईनचे काय झाले? 
उत्तर : मेडिकलमध्ये भावी डॉक्‍टरांचे "वर्ग' नियमित व्हावे यासाठी स्वतःच्या मोबाईलवरूनच "हॉटलाइन' तयार करण्यास सुरुवात केली होती. यासाठी "कॉम्पिटन्सी बेस एज्युकेशन'चा आराखडा तयार केला आहे. स्वतःच्या मोबाईलवरच "हॉटलाइन' तयार करण्याचा प्रयत्न केला. परंतु कोविड संकट आले आणी वैद्यकीय शिक्षण ऑनलाइन सुरू झाले.

क्लिक करा - आता लायसन्ससाठी कुठेही जायची गरज नाही; घरबसल्या पुढील पद्धतीने काढा लर्निंग लायसन्स

प्रश्न : मेडिकल टर्शरी केअर सेंटर आहे, मात्र सर्दी-तापाच्या रुग्णांची गर्दी असते? 
उत्तर : मेडिकल टर्शरी केअर सेंटर आहे. परंतु पन्न्सास वर्षांपासून येथे सर्दी, खोकला, तापासह सामान्य प्रसूती मेडिकलमध्ये होतात. खरेतर सर्दी खोकला, ताप, सामान्य प्रसूतीपासून तर साथ आजारांवरील उपचाराची जबाबदारी महापालिकेची आहे. महापालिकेने शहरातील आरोग्याचा अजेंडाच तयार केला नाही. मात्र मेयो, मेडिकल, महानगरपालिका, आरोग्य विभाग आदि आरोग्य संस्थांच्या सम्नवयातून शहराच्या आरोग्याचा अजेंडा तयार व्हावा. प्रत्येक शहरता असे आरोग्याचे मॉडेल तयार झाले की, कोरोनासारख्या साथ आजाराशी लढा देता येते. सद्या जिल्हा रुग्णालयांचे सक्षमीकरण न झाल्याने गावखेड्यातील माणूस मेडिकलमध्ये येतो. 

प्रश्न : मेडिकलमधील प्रकल्पांबाबत काय सांगाल? 
उत्तर : मेडिकलमध्ये ट्रॉमा केयर सेंटर आहे. सध्या कोविड सेंटर आहे. स्पाईन केअर सेंटर, लंग्ज इन्स्टिटय़ूट, सिकलसेल एक्सलेंस सेंटर, स्वतंत्र कॅन्सर रुग्णालयासह इतरही काही संस्था प्रस्तावित आहेत. याशिवाय श्वसन रोग विभागाचे अत्याधुनिकीकरण, मेडिकलशी संलग्न नर्सिंग कॉलेजमध्ये एमएससी नर्सिंग, व्यवसायोपचार आणि भौतिकोपचार महाविद्यालयाचे अत्याधुनिकरण करण्यात येणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The city's health agenda should be coordinated