नाले सफाईच केली ना? की फक्‍त टिकली पावडर लावले, का उपस्थित झाला प्रश्‍न

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 9 जून 2020

पावसाळ्यापूर्वी शहरातील सर्व नाल्यांची सफाई होत आहेत. शहरातील एकूण 227 नाल्यांपैकी आतापर्यंत 211 नाल्यांची सफाई पूर्ण झाली आहे. उर्वरित 16 नाल्यांपैकी 15 नाल्यांची सफाई सुरू आहे. प्रलंबित एका नाल्याचीही सफाई लवकरच पूर्ण होणार आहे. 

नागपूर : मागील वर्षीच्या तुलनेत यंदा नाले सफाईचा खर्च निम्मा झाल्याचा दावा महापालिका प्रशासनानेच केला आहे. त्यामुळे मागील वर्षी भ्रष्टाचार झाला की यंदा नाले सफाईच्या नावावर अनेक नाल्यांतून केवळ जेसीबी फिरवले, असे अनेक तर्कवितर्क लावण्यात येत आहेत. मागील वर्षी नाले सफाईवर एक कोटी दोन लाख तर यंदा केवळ 43 लाख 79 हजार रुपये खर्च झाले आहेत. 

कोरोनामुळे उद्‌भलेल्या लॉकडाउनचा फायदा घेत नागपूर महानगरपालिकेतर्फे शहरातील नदी व नाले सफाई मोहीम हाती घेण्यात आली. पावसाळ्यापूर्वी शहरातील सर्व नाल्यांची सफाई होत आहेत. शहरातील एकूण 227 नाल्यांपैकी आतापर्यंत 211 नाल्यांची सफाई पूर्ण झाली आहे. उर्वरित 16 नाल्यांपैकी 15 नाल्यांची सफाई सुरू आहे. प्रलंबित एका नाल्याचीही सफाई लवकरच पूर्ण होणार आहे.

हेही वाचा - तर अशा घरांमधून बाहेर काढण्यात येईल; तुकाराम मुंढेचा इशारा

विशेष म्हणजे, नाले सफाईवर यंदा केवळ 43 लाख 79 हजार 280 रुपयांचा निधी प्रस्तावित करण्यात आला आहे. मागील वर्षीच्या खर्चाच्या तुलनेत हा निधी केवळ 43 टक्‍के आहे. मागील वर्षी नाले सफाईसाठी एक कोटी 33 लाख 30 हजार 360 रुपये निधी प्रस्तावित करण्यात आला होता. त्यापैकी एक कोटी दोन लाख 95 हजार 618 रुपये खर्च करण्यात आले होते. अर्थात, मागील वर्षी 227 नाल्यांच्या सफाईसाठी यंदाच्या तुलनेत 59 लाख 16 हजार रुपये अधिक खर्च करण्यात आले. खर्चातील या तफावतीमुळे विविध तर्क वितर्क लावले जात आहे. 

यंदा जी कामे 43 लाख 79 हजारांत होत आहे, त्यासाठी मागील वर्षी एक कोटी दोन लाख कसे खर्च झाले, यावर आता चर्चा सुरू झाली आहे. एवढेच नव्हे तर केवळ 43 लाख 79 हजारांत नाले सफाई शक्‍य नसून काही नाल्यांच्या स्वच्छतेला तर बगल दिली नाही ना, असाही प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. मनपाच्या सहा आणि भाडेतत्त्वावर आठ अशा एकूण 14 जेसीबीद्वारे सफाईचे काम सुरू आहे. याशिवाय मनुष्यबळाद्वारे लहान नाल्यांची सफाई केली जात आहे.

अधिक माहितीसाठी - मोठी बातमी : रस्त्यांवर उद्यापासून दिसणार हा बदल...जाणून घ्या संपूर्ण माहिती

  • एकूण नाले : 227 
  • सफाई झालेले नाले : 211 
झोननिहाय नाल्यांची सफाई     
झोन नाल्यांची संख्या सफाई झालेले नाले
लक्ष्मीनगर 22 20
धरमपेठ 35 30 
हनुमाननगर 14 13
धंतोली 14 14
नेहरूनगर 15 14 
गांधीबाग 51 50 
सतरंजीपुरा 22 22 
लकडगंज 07   06
आशीनगर 18 17 
मंगळवारी 29 25 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Cleaning of two hundred and eleven nalas at half cost