Good News: ऐवजदार सफाई कर्मचाऱ्यांना दिवाळीचे ‘गिफ्ट';  ११ जणांना महापौर, उपमहापौरांच्या हस्ते मिळणार नियुक्तीपत्र

राजेश प्रायकर 
Wednesday, 28 October 2020

महापालिकेच्या स्थापना दिनी २ मार्चला २२०६ ऐवजदार सफाई कर्मचाऱ्यांना स्थायी नियुक्तीचे आदेश देण्यात आले होते. आता दुसऱ्या टप्प्यात ११३८ ऐवजदारांना नियुक्ती आदेश देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. 

नागपूर ः गेली अनेक वर्षे महापालिकेला सेवा देत शहर स्वच्छ ठेवण्याची जबाबदार पार पाडणाऱ्या ऐवजदार सफाई कर्मचाऱ्यांना स्थायी करण्याच्या दुसऱ्या टप्प्यात ११३८ जणांना नियुक्तीपत्र देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. ११ जणांना महापौर संदीप जोशी, उपमहापौर मनीषा कोठे, स्थायी समिती अध्यक्ष पिंटू झलके यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. त्यामुळे या ऐवजदारांना दिवाळीचे ‘गिफ्ट' मिळाल्याची चर्चा महापालिकेत रंगली आहे.

महापालिकेच्या स्थापना दिनी २ मार्चला २२०६ ऐवजदार सफाई कर्मचाऱ्यांना स्थायी नियुक्तीचे आदेश देण्यात आले होते. आता दुसऱ्या टप्प्यात ११३८ ऐवजदारांना नियुक्ती आदेश देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. 

नक्की वाचा - शेपूट नसलेला श्वान बघितला ना? कधी प्रश्न पडला, का कापली असावी शेपूट? हे आहे कारण

सोमवारी महापौर संदीप जोशी, उपमहापौर मनीषा कोठे, स्थायी समिती अध्यक्ष पिंटू झलके यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरूपात दहा झोनमधील ११ ऐवजदार सफाई कर्मचाऱ्यांना स्थायी नियुक्ती आदेश प्रदान करण्यात आले. 

यावेळी सत्तापक्ष नेते संदीप जाधव, आरोग्य अधिकारी डॉ. प्रदीप दासरवार, पशुचिकित्सक अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले, राजेश हाथीबेड, किशोर मोटघरे, राजेश लवारे यांच्यासह दहाही झोनचे विभागीय अधिकारी तसेच आरोग्य निरीक्षक उपस्थित होते. 

लक्ष्मीनगर झोनच्या कुसुम मोटघरे, धरमपेठ झोनच्या रेखा चव्हाण, हनुमाननगर झोनचे शरद गजभिये, धंतोली झोनच्या माधुरी मनपिया, नेहरूनगर झोनचे चंद्रदर्शन रंगारी, गांधीबाग झोनचे विशाल तुर्केल, सतरंजीपुरा झोनचे भक्तपाल नंदेश्वर, लकडगंज झोनचे पृथ्वीराम मेश्राम, आसीनगर झोनचे रुक्मिनी माटे, मंगळवारी झोनच्या नंदा देशपांडे आणि शुद्धोधन घुटके या ११ ऐवजदार सफाई कर्मचाऱ्यांना स्थायी नियुक्ती आदेश प्रदान करण्यात आले. 

हेही वाचा - कठोर मुलीला बाप नको होता; पण, चार लाख मिळविण्यासाठी हवे मृत्यूप्रमाणपत्र

आरोग्याच्या समस्येमुळे अनेक ऐवजदारांचा मृत्यू झाला. त्यांच्या वारसदारांना लाड पागे समितीच्या शिफारशीनुसार नियुक्ती मिळावी यासाठी विधानसभेचे विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विशेष प्रयत्न केले. राज्याचे मुख्यमंत्री असताना फडणवीस यांनी अनेक अडथळे दूर करून ऐवजदारांना स्थायी नियुक्तीचा मार्ग मोकळा करून दिल्याचे महापौरांनी यावेळी सांगितले.

संपादन - अथर्व महांकाळ 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: cleaning Workers will get special gift by government this diwali