मुंढेंवर नेम, गंटावारांचा गेम? सनदी अधिकाऱ्यांमध्येच शीतयुद्ध!

राजेश चरपे
शुक्रवार, 10 जुलै 2020

कोरोनाच्या उपाययोजना आणि त्याचे श्रेय घेण्यासाठी अधिकाऱ्यांमध्ये स्पर्धा आहे. यातूनच पोलिस आयुक्त, जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्त यांच्यात मतभेद निर्माण झाले आहेत. मुंढे सर्वांच्या अधिकारावर अतिक्रमण करीत असल्याच्या तक्रारी आहेत. महापालिका क्षेत्राच्या बाहेर जाऊनही मुंढे परस्पर निर्णय घेत असल्याने नाराजी आहे.

नागपूर : तुकाराम मुंढे आल्यापासून जिल्ह्यातील सनदी अधिकाऱ्यांमध्ये शीतयुद्ध चांगलेच पेटले असून यातूनच महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. गंटावारांचा गेम झाल्याची चर्चा सध्या प्रशासकीय वर्तुळात आहे. महापालिकेतील अनेक अधिकाऱ्यांच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रारी आहेत. आजवर कोणालाचा हात लावण्यात आला नाही. मात्र मुंडे हे गंटावारांना पाठीशी घालीत असल्याने तत्काळ त्यांची फाईल वर काढण्यात आल्याचे बोलले जाते.

कोरोनाच्या उपाययोजना आणि त्याचे श्रेय घेण्यासाठी अधिकाऱ्यांमध्ये स्पर्धा आहे. यातूनच पोलिस आयुक्त, जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्त यांच्यात मतभेद निर्माण झाले आहेत. मुंढे सर्वांच्या अधिकारावर अतिक्रमण करीत असल्याच्या तक्रारी आहेत. महापालिका क्षेत्राच्या बाहेर जाऊनही मुंढे परस्पर निर्णय घेत असल्याने नाराजी आहे.

मुंढे कोणत्याही अधिकाऱ्याला विश्‍वासात घेत नाहीत. जिल्हाधिकाऱ्यांच्याही अधिकारावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. दारू दुकान सुरू करणे आणि बंद करण्यावरून दोन्ही अधिकाऱ्यांमध्ये वाद उफाळून आला होता. पहिल्या टप्प्यात आयुक्त मुंढेंच्या निर्णयामुळे पोलिस प्रशासनाची चांगलीच अडचण झाली. याची तक्रार पोलिस आयुक्तांपर्यंत पोहोचली. सनदी अधिकाऱ्यांच्या शीतयुद्धात पोलिस आयुक्तांची एंट्री झाली. काही मुंढेंच्या कार्यशैलीचे समर्थक होते. त्यामुळे महायुद्धाप्रमाणे दोन गट पडल्याची चर्चा रंगली.

मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी जिल्हा परिषदेला सभेकरीता भट सभागृह देण्यास नकार दिला. यामुळे जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरेंसह जि.प. सीईओ योगेश कुंभेजकरही नाराज झाले. महानगर पालिकेत सत्तापक्ष विरुद्ध महापालिका आयुक्त असा संघर्ष शिगेला पोहोचला आहे. यातूनच आयुक्त मुंढे यांच्यावर गैरव्यवहार केल्याची तक्रार सत्ताधाऱ्यांनी पोलिसांकडे केली. सत्ताधाऱ्यांकडून विरोध होणाऱ्या अधिकाऱ्यांना मुंढेनी समर्थन दिले. जि.प. त असतानाही त्यांची कार्यशैली अशाच प्रकारची असल्याचे सांगण्यात येते.

त्यामुळेच महापौरांच्या आदेशानंतरही आयुक्त मुंढे यांनी डॉ. गंटावारांचे निलंबन केले नाही. तर दुसरीकडे एसीबीने जुन्या तक्रारीच्या आधारे डॉ. गंटावार यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. डॉ. गंटावार यांच्याकडे ज्ञात स्त्रोतापेक्षा अधिकची संपत्ती आहे. अनेक वर्षांपासून गंटावार महापालिकेत कार्यरत आहेत. मात्र त्यांना फारसे कोणी ओळखत नव्हते. मुंढे आल्यापासून ते अचानक प्रकाशझोतात आले.

 सविस्तर वाचा - भयंकर! एकविसाव्या शतकातही बालविवाह, बालकल्याण समितीमुळे वाचली अल्पवयीन मुलगी

महापौरांनी सभागृहात दिलेले निलंबनाचे आदेश, मुंढेंनी निलंबनास दिलेला नकार हा वाद सुरू असतानाच एसीबीने गंटावारांच्या घरावर धाड टाकली. त्यावरून मुंढेंना कोंडीत टाकण्यासाठीच एसबीने आपले अस्र उगारल्याचे बोलले जाते.

संपादन - स्वाती हुद्दार

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Cold war in administration