दांडीबहाद्दर पोलिस कर्मचाऱ्यांना आयुक्तांचा दणका; अधिकाऱ्यांशी करायचे सेटिंग

अनिल कांबळे 
Tuesday, 13 October 2020

अनेकांनी काम करण्याचा कंटाळा करीत आजारी सुट्या टाकल्या होत्या. तसेच काही महाभागांनी ड्युटी रायटर किंवा मुख्यालयातील अधिकाऱ्यांनी ‘मॅनेज’ करीत थेट ड्युटीवर हजर न राहता पगार घेणे सुरू केले होते.

नागपूर  ः सतत सुटीवर किंवा कर्तव्यावर दांड्या मारणाऱ्या १५ पोलिस कर्मचाऱ्यांवर पोलिस आयुक्तांनी निलंबनाची कारवाई केली.  या कारवाईमुळे कामचुकार पोलिस कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. सुटीवर असलेल्या अनेकांनी ताबडतोब ड्युटी जॉईन केली असून, काहींनी लगेच वरिष्ठांकडे हजेरी लावल्याची माहिती आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शहर पोलिस दलातील अनेक कर्मचारी सुटीवर राहत होते, तर अनेकांनी काम करण्याचा कंटाळा करीत आजारी सुट्या टाकल्या होत्या. तसेच काही महाभागांनी ड्युटी रायटर किंवा मुख्यालयातील अधिकाऱ्यांनी ‘मॅनेज’ करीत थेट ड्युटीवर हजर न राहता पगार घेणे सुरू केले होते.

कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे पोलिस ठाण्यात किंवा कर्तव्यावर नियमित हजर असलेल्या कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण येत होता. ‘मॅनपॉवर’अभावी अनेक कर्मचारी तणावात नोकऱ्या करीत होते. ही बाब नवनियुक्त पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या लक्षात आली. त्यांनी लगेच १० ऑक्टोबरला पोलिस दलातील सतत सुटीवर असलेल्या किंवा दांडी मारणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांची यादी मागितली. 

सविस्तर वाचा - हा स्वतःचे अपयश दुसऱ्याच्या माथी मारण्याचा प्रयत्न; खासदार नवनीत राणांवर गंभीर आरोप 
 

यादीचा अभ्यास करून प्रत्येकाचे सुटीवर असण्याचे कारण आणि सुटीचा कालावधीचा विचार केला. त्यात आढळलेल्या १५ कामचुकार पोलिस कर्मचाऱ्यांना सोमवारी थेट निलंबित करण्याचे आदेश दिले.  या कारवाईमुळे पोलिस दलात एकच खळबळ उडाली असून, अनेकांनी यातून धडा घेतला आहे.
 

जिमखान्यात घेतली मीटिंग

सोमवारी पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी पोलिस जिमखान्यात मीटिंग घेतली.  यामध्ये १२९ पोलिस कर्मचाऱ्यांना बोलविण्यात आले होते. यामध्ये सर्वाधिक पोलिस मुख्यालय, वायरलेस आणि साईड ब्रॅंचला पोस्टिंगला असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांचा समावेश होता. ‘चॉईस पोस्टिंग’ मिळेल अशी सर्वांना आशा होती. तसेच पोलिस दलाला आता आपली गरज असल्यामुळे पोलिस आयुक्तांना चांगलेच धारेवर धरता येईल, अशी अनेकांची इच्छा होती. मात्र, झाले उलटेच. पोलिस आयुक्तांनी कामचुकार कर्मचाऱ्यांची कानउघडणी केली आणि तसेच पोलिस दलाच्या झालेल्या  नुकसानाबाबत माहिती दिली.  त्यानंतर थेट निलंबनाचे आदेश दिले. 
 

‘सेटिंग’ करून मिळते सुटी

शहर पोलिस दलातील काही पोलिस कर्मचारी ड्युटी सोडून भलत्याच धंद्यात गुंतलेले असतात. काही कर्मचारी प्रॉपर्टी डिलिंग करतात तर काहींनी स्वतःचे धंदा-व्यवसाय सुरू केले आहेत. तसेच मुख्यालायतील काही जणांनी थेट वाहतूक, हॉटेल्स आणि ढाबे टाकलेले आहेत. मुख्यालयातील काही अधिकाऱ्याशी सेटिंग करून महिन्याकाठी पगारातील टक्केवारी ठरवून ऑन ड्युटी दाखवत कायमची दांडी मारत असल्याची चर्चा आहे.

संपादन  : अतुल मांगे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Commissioner of Police has suspended the police